अगस्त्य हरितकी हे आयुर्वेदातील श्रेष्ठ रसायन कल्प असून महर्षी अगस्त्य यांनी प्रतिपादित केलेले एक अवलेह कल्प आहे. हे औषध मुख्यत: प्राणवह स्रोतस (श्वसनासंबंधीच्या) विकारांमध्ये जसे की कास (खोकला), श्वास (दम), हिक्का (उचकी), क्षय इत्यादी विकारांमध्ये उपयोगी आहे.
घटक : अगस्त्य हरितकीमध्ये मुख्य घटक हरितकी (हिरडा) असतो. याव्यतिरिक्त यामध्ये दशमूल, कवचबीज, शंखपुष्पी, कपूरकाचरी, बला, गजपिंपळी, आघाडा, पिंपळमूळ, चित्रक, भारंगी, पुष्करमूळ या ओषधीही असतात. यांवर विविध प्रक्रिया करून गायीचे तूप, तीळाचे तेल, गूळ, पिंपळी चूर्ण व मध इत्यादींचे मिश्रण करून हा अवलेह सिद्ध करतात. दररोज दोन हिरडे या अवलेहाबरोबर चावून खावयाचे असतात.
लाभ : अगस्त्य हरितकी हे रसायन जुनाट खोकला, कफ आणि घशातील खवखव दूर करण्यास मदत करते. तसेच बद्धकोष्ठता (Constipation) दूर करते, पचनशक्ती सुधारते आणि भूक वाढवते. या रसायनामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. दमा (Asthma), श्वसननलिका दाह (Bronchitis), सुषिशोथ (Sinusitis / Rhinitis), मूळव्याध (Piles), विषमज्वर (Typhoid) या विकारांमध्ये हे रसायन अत्यंत लाभदायक आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच हे रसायन बलवर्धक असून याच्या सेवणाने त्वचेचा वर्ण सुधारण्यास मदत होते. आधुनिक संशोधनानुसार हरितकीमध्ये शरीरातील ताण कमी करणारे गुणधर्म तसेच सौम्य रेचक गुणधर्म आढळतात. हरितकीमध्ये गॅलिक अम्ल (Gallic acid) आणि चेब्युलिनिक अम्लासारखे (Chebulinic acid) शक्तिशाली प्रतिऑक्सिडीकारक घटक (Antioxidants) असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त मूलके (Free Radicals) निष्प्रभावी करतात. अगस्त्य हरितकी रसायनाच्या नियमित सेवनाने शरीराला ‘रसायन’ प्रभाव (Rejuvenation; शरीराचे वय वाढण्याची प्रक्रिया मंदावणे, पेशींचे रक्षण करणे आणि दीर्घायुष्य मिळवून देणारे गुणधर्म) मिळतो.
मात्रा : सामान्यत: प्रौढांमध्ये ५ ते १० ग्रॅ. (एक किंवा दोन छोटे चमचे) आणि लहान मुलांमध्ये एक छोटा चमचा सकाळी आणि संध्याकाळी जेवणाअगोदर किंवा जेवणानंतर कोमट पाणी किंवा दुधासोबत घेण्याचा सल्ला वैद्यांमार्फत दिला जातो. लहान मुलांना हे औषध मधासोबतही देतात.
औषध सेवन करताना घ्यावयाची काळजी : प्रत्येक रुग्णाची प्रकृती, त्याच्या आजाराचे स्वरूप, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास (Medical history) हा वेगवेगळा असतो. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानुसारच या औषधाचे सेवन करावे. तसेच मधुमेह किंवा इतर तीव्र आजार असल्यास, उष्ण प्रकृती असल्यास तसेच गर्भवतींमध्ये वैद्यकीय सल्ल्यानेच हे औषध घ्यावे. याच्या अतिसेवनाने ओटी पोटात दुखणे, मळमळणे, जुलाब होणे इ. लक्षणे आढळतात.
पहा : अवलेह, आयुर्वेदिक औषधे सेवन करताना घ्यावयाची काळजी, हिरडा (पूर्वप्रकाशित नोंद).
संदर्भ :
- चरक संहिता, चरक चिकित्सास्थान (कास चिकित्सा), अध्याय १८, श्लोक ५७-६२.
- भेषज्य रत्नावली, अध्याय १८, श्लोक १७३-१७८.
समीक्षक : कौस्तुभ चौंडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
