वीरगासे : कर्नाटकातील शैव लोकनृत्य. या नृत्याला कन्नडमध्ये वीरगासे कुनिथा असेही म्हटले जाते, हे कर्नाटकातील धार्मिक आशयाने समृद्ध लोकनृत्य आहे. कर्नाटकाच्या लोककलांमध्ये या नृत्याला विशेष स्थान आहे, त्यात नृत्य, संगीत, धार्मिक विधी, मौखिक कथन, वीरभाव, वेशभूषा आणि सामुदायिक श्रद्धा यांचा विलक्षण समन्वय आहे. हे नृत्य करमणुकीसाठी सादर होणारे नृत्य नसून शैव-वीरशैव धार्मिक परंपरेशी निगडित असलेले ते विधिनिष्ठ लोकनाट्यात्मक नृत्य आहे. वीरगासेमध्ये भगवान शिवाचे उग्र योद्धारूप मानल्या जाणाऱ्या वीरभद्राच्या शौर्याचे, क्रोधाचे, धर्मरक्षणाचे आणि दैवी सामर्थ्याचे प्रतीकात्मक दर्शन त्यात घडविले जाते.
कर्नाटकातील शिवमोगा, चिक्कमगळूरू, चित्रदुर्ग, धारवाड, बल्लारी, तुमकूर आणि आसपासच्या भागांत या नृत्याची परंपरा विशेषतः आढळते. कालांतराने हे नृत्य राज्यातील इतर भागांतही पोहोचले आहे. मंदिरोत्सव, जत्रा, देवांच्या मिरवणुका, श्रावण-कार्तिक महिन्यांतील धार्मिक कार्यक्रम, विवाह, गृहप्रवेश आणि काही वीरशैव-लिंगायत कुटुंबांतील महत्त्वाचे संस्कार यांमध्ये वीरगासे सादर केले जाते. त्यामुळे हे लोकनृत्य लोकजीवनातील सांस्कृतिक स्मृती, धार्मिक निष्ठा आणि सामुदायिक एकात्मतेचे जिवंत माध्यम ठरते.
‘वीरगासे’ या शब्दात ‘वीर’ आणि ‘गासे’ किंवा ‘कासे’ असे दोन घटक मानले जातात. लोकपरंपरेत या नावाचा संबंध वीरभद्राच्या वीरत्वाशी, तसेच नृत्यकऱ्यांच्या विशिष्ट पोशाखाशी जोडला जातो. विविध प्रदेशांत व कलाकारपरंपरांत या नृत्याच्या नावात आणि सादरीकरणात थोडेफार बदल दिसून येतात. वीरगासे हे मुख्यतः सामूहिक नृत्य आहे. नृत्यसंघात दोन कलाकारांपासून अनेक कलाकारांपर्यंत सहभाग असू शकतो. काही ठिकाणी सहा, आठ किंवा अधिक कलाकार एकत्र नृत्य करतात. नृत्याच्या मध्यवर्ती भागात प्रमुख कलाकार, कथनकर्ता किंवा सूत्रधार वीरभद्राची कथा सांगतो; इतर नर्तक संगीताच्या ठेक्यावर युद्धात्मक हालचाली, उड्या, गिरक्या, तलवारीचे संकेत आणि आवेशपूर्ण अंगविक्षेप करतात. त्यामुळे वीरगासे हे शुद्ध नृत्य नसून कथन, अभिनय, धार्मिक प्रतीक आणि लयबद्ध देहभाषा यांचे मिश्र लोककलारूप आहे.
वीरगासेचा प्रमुख आधार दक्षयज्ञाच्या पुराणकथेवर आहे. या कथेनुसार दक्ष प्रजापतीने आयोजित केलेल्या यज्ञात शिवाचा अपमान झाला. शिवपत्नी सतीला वडिलांकडून झालेला पतीचा अपमान सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात देहत्याग केला. या घटनेमुळे शिव अत्यंत क्रुद्ध झाले. त्यांच्या रौद्रतेतून वीरभद्राचा उदय झाला. वीरभद्राने दक्षाच्या यज्ञस्थळी जाऊन यज्ञाचा विध्वंस केला आणि शिवाच्या अपमानाचा प्रतिकार केला. ही कथा विविध पुराण परंपरांत वेगवेगळ्या रूपांत सांगितली जाते. वीरगासेच्या सादरीकरणात वीरभद्र ही केवळ पुराणातील व्यक्तीरेखा राहत नाही; तो न्यायासाठी उभा राहणारा, अन्यायाचा प्रतिकार करणारा आणि धर्माची प्रतिष्ठा राखणारा वीर म्हणून प्रस्तुत केला जातो. नृत्यातील तलवार, उग्र मुखमुद्रा, जोरदार पदन्यास, वेगवान गोल फिरकी, आक्रमक शरीरभाषा आणि ढोलवाद्यांचा दणदणाट यांद्वारे वीरभद्राच्या रौद्र आणि वीर रसांचा अनुभव प्रेक्षकांना मिळतो. दक्षयज्ञाची पुराणकथा लोकजीवनात नैतिक आशयानेही स्वीकारली गेली आहे. शिवाचा अपमान, सतीचे दुःख, वीरभद्राचा उद्रेक आणि दक्षयज्ञाचा विध्वंस या कथेतून सन्मान, निष्ठा, अन्यायाविरुद्ध प्रतिकार आणि दैवी न्याय या कल्पना व्यक्त होतात. म्हणूनच वीरगासे हे लोकनृत्य धार्मिक श्रद्धेसोबत सामूहिक नैतिकतेचेही दर्शन घडवते.
वीरगासेचा संबंध कर्नाटकातील शैव आणि विशेषतः वीरशैव-लिंगायत धार्मिक परंपरेशी घनिष्ठ आहे. पारंपरिकरीत्या या नृत्याचे कलाकार ‘लिंगदेवरू’ म्हणून ओळखले जातात. काही भागांत जंगम किंवा धार्मिक सेवेतील विशिष्ट कलाकारवर्ग या नृत्याशी निगडित दिसतो. या कलाकारांचा नृत्याशी संबंध केवळ व्यावसायिक नसून धार्मिक आणि सांस्कृतिकही असतो. वीरशैव-लिंगायत परंपरेत शिवभक्ती, लिंगधारणा, विभूती, रुद्राक्ष, जंगमसेवा आणि धार्मिक समानतेच्या कल्पनांना महत्त्व आहे. वीरगासेच्या वेशभूषेत आणि सादरीकरणात यांचा स्पष्ट प्रभाव दिसतो.
वीरगासेची वेशभूषा हे या नृत्याचे एक महत्त्वाचे आणि आकर्षक वैशिष्ट्य आहे. पारंपरिक सादरीकरणात नर्तक डोक्यावर पांढरा किंवा कावी रंगाचा पगडीसदृश फेटा बांधतात. शरीरावर भगवा, कावी, लाल किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र असते. काही कलाकार अंगावर कावी रंगाचा झगा किंवा अंगरखा घालतात, तर कमरेभोवती विशिष्ट पट्टा, कासे किंवा सजावटीचा पोशाख बांधतात. पायांत घुंगरू अथवा नूपूर असतात, ज्यामुळे पदन्यासाला लयबद्ध ध्वनी मिळतो. गळ्यात रुद्राक्षमाळ, नागाभरण, लिंगाचे चिन्ह किंवा वीरभद्राशी संबंधित प्रतीकात्मक अलंकार वापरले जातात. काही कलाकार छातीवर लहान लाकडी फलक, प्रतिमा किंवा वीरभद्राचे प्रतीक धारण करतात. कपाळावर, कानांवर आणि डोळ्यांच्या भोवती विभूती लावली जाते. विभूती ही शिवभक्ती, वैराग्य आणि मृत्युभान यांचे प्रतीक मानली जाते. नागाभरण हे शिवाशी जोडलेले प्रतीक आहे; तर रुद्राक्षमाळ शैव परंपरेतील भक्ती आणि साधनेचे चिन्ह आहे. या सर्वांमधून शैव श्रद्धेचे दर्शन होते. नर्तकाच्या एका हातात तलवार असते, तर दुसऱ्या हातात वीरभद्राचा प्रतिकात्मक फलक, ध्वज किंवा धार्मिक वस्तू असू शकते. तलवार हे युद्ध, प्रतिकार आणि संरक्षण यांचे प्रतीक आहे. तिचा वापर प्रत्यक्ष युद्धासाठी नव्हे, तर नृत्याच्या अंगविक्षेपांतून वीरत्व व्यक्त करण्यासाठी केला जातो. काही सादरीकरणांत त्रिशूलासारखी प्रतीकेही दिसतात. त्यामुळे नर्तकाची संपूर्ण प्रतिमा ही वीरभद्राच्या दैवी, उग्र आणि युद्धशील रूपाची लोककलात्मक अभिव्यक्ती बनते.
वीरगासेचा मुख्य प्रभाव त्याच्या तीव्र आणि गतिमान लयीत आहे. या नृत्यासाठी करडी, चमाळे, संबळ, डिम्मू, ताळ, झांज, मौरी किंवा सनईसदृश वाद्यांचा वापर स्थानिक परंपरेनुसार केला जातो. काही ठिकाणी तामटे किंवा इतर तालवाद्यांचा समावेश असतो. या वाद्यांचा आवाज केवळ संगीताची साथ देत नाही, तर नर्तकांच्या देहभाषेला, हालचालींच्या वेगाला आणि नाट्यमयतेला नियंत्रित करतो. तालाच्या आरंभी नृत्याची गती तुलनेने संयत असू शकते. हळूहळू ढोल आणि झांजांचा वेग वाढतो. त्या वेळी नर्तक जोरदार उड्या मारतात, पुढे-मागे झेप घेतात, मंडलाकार फिरतात आणि तलवारींचे संकेत करतात. तालाचा उच्चबिंदू गाठल्यावर नर्तकांच्या हालचाली अधिक तीव्र होतात. प्रेक्षकांमध्येही या लयीमुळे उत्साह आणि भक्तिभाव निर्माण होतो. या नृत्यात शास्त्रीय नृत्यांप्रमाणे निश्चित हस्तमुद्रांची औपचारिक प्रणाली नसली, तरी त्यात स्पष्ट नृत्यरचना दिसते. पदन्यास, उड्या, गोलाकार फिरकी, वेगवान प्रवेश, झेप, तलवार फिरविणे आणि एकसंध समूहचाल या त्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी आहेत. नर्तक बहुधा एका रांगेत, वर्तुळात किंवा अर्धवर्तुळात उभे राहून नृत्य करतात. प्रमुख नर्तकाचा प्रवेश आवेशपूर्ण असतो. त्याची मुद्रा, डोळ्यांचा रोख, पावलांची ताकद आणि हातातील तलवार वीरभाव जागवतात. वीरगासेतील मुखमुद्रांमध्ये रौद्र, वीर आणि भक्तीभाव यांचे मिश्रण आढळते. रौद्रभावातून शिवाच्या क्रोधाचे आणि वीरभद्राच्या आक्रमकतेचे दर्शन घडते; तर भक्तीभावातून नर्तकांचा देवाशी असलेला संबंध व्यक्त होतो. काही वेळा नृत्याच्या वेळी कलाकार आवेशाने घोष करतात, देवाचे नामस्मरण करतात किंवा वीरभद्राच्या पराक्रमाचे वर्णन करतात.
वीरगासेची एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे कथनपरंपरा. नृत्याच्या दरम्यान काही कलाकार वीरभद्र, शिव, सती, दक्ष आणि इतर देवतांशी संबंधित कथा, स्तुती, संवाद किंवा आवेशपूर्ण निवेदन करतात. या कथनाला काही भागांत ‘ओडपू’ किंवा ‘ओडबू’ असे म्हटले जाते. ही भाषा बहुधा स्थानिक कन्नड बोलीत असते आणि तिच्यात धार्मिक पदे, वीरवर्णने, आवाहने आणि लोकसाहित्याचा प्रभाव असतो. ओडपू नृत्याच्या भावनात्मक उंचीला वाढवते. प्रेक्षकांना नृत्यामागील पुराणकथा समजते; तसेच नर्तक आणि प्रेक्षक यांच्यात भक्तीपूर्ण संवाद निर्माण होतो.
वीरगासे हे नृत्य ग्रामीण कर्नाटकातील धार्मिक जीवनाशी जोडलेले आहे. जत्रा, देवमिरवणूक, मंदिरातील वार्षिक उत्सव, विवाह किंवा घरगुती धार्मिक विधी या प्रसंगी या नृत्याचे आयोजन केले जाते. आधुनिक काळात वीरगासेच्या स्वरूपात काही बदल दिसतात. पूर्वी धार्मिक विधी आणि मंदिरकेंद्रित कार्यक्रम यांमध्ये सादर होणारे हे नृत्य आता सांस्कृतिक महोत्सव, पर्यटन कार्यक्रम, शासकीय लोककला मेळावे, दूरचित्रवाणी आणि सामाजिक माध्यमांवरही दिसू लागले आहे. हे कर्नाटकाच्या लोकसांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण शैव वीरनृत्य आहे. त्यात पुराणकथा, भक्ती, युद्धात्मक नृत्यभाषा, तालवाद्यांचा दणदणाट, रंगीबेरंगी वेशभूषा आणि सामुदायिक धार्मिक सहभाग यांचा संगम दिसतो. हे नृत्य कर्नाटकातील ग्रामीण धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याच वेळी ते लोकसाहित्य, लोकनाट्य, नृत्य, संगीत आणि सामाजिक स्मृती यांचा अभ्यास करण्यासाठीही महत्त्वाचे साधन आहे.
संदर्भ :
• Massey, Reginald and Jamila, Massey, The Dances of India: A General Survey and Dancers’ Guide, Tricolour Books, 1989.
• Massey, Reginald, India’s Dances: Their History, Technique, and Repertoire, Abhinav Publications, 2004.
• Veeragase Dance, Karnataka Janapada Academy, Bengaluru.
समीक्षक : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
