झाइस, कार्ल : (११ सप्टेबर १८१६ — ३ डिसेंबर १८८८). जर्मन वैज्ञानिक उपकरण निर्माता आणि व्यावसायिक. त्यांनी १८८० मध्ये गोलीय व वर्णविपथनरहित भिंगे वापरून आधुनिक सूक्ष्मदर्शीला पूर्ण रूप दिले, त्यामुळे सूक्ष्मजंतूंची ओळख पटविणे सहज शक्य झाले. त्यांनी अर्न्स्ट ॲबे यांच्यासह प्रकाशीय उपकरणांना उपयुक्त काचेचे व उत्तम प्रतीच्या भिंगांचे उत्पादन करण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्यात.
झाइस यांचा जन्म वायमार, जर्मनी येथे झाला. एकोणीसाव्या शतकाच्या कालखंडात वायमार हे कारागिरांचे शहर होते. त्यांचे वडील ऑगस्ट झाइस हे लाकडाचे कातीव काम करीत. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी आपल्या सर्व मुलांना विल्हेल्म अर्नस्ट जिमनॅशियम हायस्कूलमध्ये प्रवेशित केले, परंतु हा अभ्यासक्रम त्यांना अर्धवट सोडावा लागला. एका अपघातात त्यांना वंक्षण अंतर्गळाचा (हार्निया) त्रास झाल्याने सतत अंतर्गळ पट्टा वापरावा लागत असे. परंतु तांत्रिक अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी वायमार येथील तंत्र शाळेत प्रवेश घेतला. पुढे ते येना येथे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले (१८३४). फ्रेडरिक कॉर्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना येना विद्यापीठातर्फे चार वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यातील शेवटची दोन वर्षे त्यांनी मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे विज्ञान आणि गणित विषय अध्यापनात घालविली. १८३८—४५ मधील यांच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांनी हेक्टर रोसलर यांच्याकडे काम केले असावे, असे अनुमान आहे.
झाइस यांना अनेक वर्षांनंतर वैज्ञानिक उपकरणे, उत्पादन आणि यांत्रिक व प्रकाशीय (ऑप्टीकल) उपकरणे बनवण्यासाठी कर्मशाळा उघडण्याची परवानगी येना प्रशासनाकडून मिळाली (१८४६). या कर्मशाळेत दूरदर्शी (टेलिस्कोप), भौतिक आणि रसायन वैज्ञानिक उपकरणे दुरुस्ती, तापमापी, हवेच्या दाबाची उपकरणे, वजन करण्यासाठी आधुनिक तराजू(बॅलन्स), वितळलेल्या काचेत हवा फुंकून केलेली उपकरणे इ. उत्पादने तयार होत असे. त्यांनी सर्वप्रथम साधे सूक्ष्मदर्शी बनवण्यास प्रारंभ केला (१८४७). प्रकाशकीय उपकरणांमधील सुधारणा या प्रकाशीय सिद्धांतांवर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांनी १८६६ मध्ये अर्न्स्ट ॲबे या येना विद्यापीठातील भौतिकशास्त्र आणि गणिताच्या प्राध्यापकासह संशोधन-सहकार्यास सुरुवात केली. त्यांनी ऑटो शॉट या रसायनशास्त्रज्ञालाही या कामात सहभागी करून घेतले. या तिघांनी मिळून स्थापन केलेल्या काच कारखान्यात शॉट यांनी सु. १०० प्रकारची नवीन प्रकाशीय काच आणि अनेक प्रकारची उष्णतारोधक काच विकसित केली.
झाइस यांना वेना विद्यापीठाद्वारे मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. १८८६ मध्ये त्यांच्या सत्तराव्या वाढदिवशी त्यांना ऑर्डर ऑफ व्हाइट फालकन पदवी देऊन गौरविण्यात आले. तीन महिन्यात लागोपाठ आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात त्यांचे येना येथे निधन झाले.
झाइस यांच्या निधनानंतर ॲबे यांनी झाइस ही कंपनी आणि काच निर्मिती प्रकल्पातील आपला वाटा कार्ल झाइस संस्थेला दान केला. तर शॉट यांच्या निधनानंतर (१९३५) काच निर्मिती प्रकल्पातील त्यांचा वाटाही या संस्थेमध्ये समाविष्ट करण्यात आला.
कळीचे शब्द : #सूक्ष्मदर्शी #दूरदर्शक भिंग #सूक्ष्मदर्श भिंग #संयुक्त सूक्ष्मदर्शी
संदर्भ :
- https://www.zeiss.com/corporate/int/about-zeiss/history/carl-zeiss.html
- https://en.wikipedia.org/wiki/Carl_Zeiss#/media/File:Microscope_Ze
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
