गायकवाड, शंकरराव :  (१८८० – १७ मार्च १९७१). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सनईवादक. त्यांचे पूर्ण नाव शंकरराव शामराव गायकवाड असे होते. त्यांचा जन्म पुणे येथे सनई व सुंद्री वादनाची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली सनईवादनास प्रारंभ केला. त्यांचे औपचारिक शिक्षण अल्प झाले असले, तरी त्यांचा ओढा लहानपणापासूनच संगीताकडे होता. त्यांनी संपूर्ण आयुष्य सनईवादनाच्या साधनेत व्यतीत केले. प्रारंभी त्यांनी पारंपरिक धुनी, लावण्या आणि विविध प्रकारचे टप्पे वाजविण्यात प्राविण्य मिळविले. त्यामुळे सनईवादनातील बारकावे त्यांनी आत्मसात केले.  सनईवादनात प्रावीण्य मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण रियाज आवश्यक असल्याचा काकांनी  दिलेला उपदेश त्यांनी आयुष्यभर पाळला. वयाच्या विसाव्या वर्षी शेट वसंतजी खेमजी सभागृहातील आपल्या पहिल्याच सार्वजनिक मैफलीत त्यांनी सनईवरील प्रभुत्व सिद्ध केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीने यशाची उंच शिखरे गाठली. अक्कलकोट येथील गायक शिवभक्तबुवा यांनी त्यांना रागसंगीताचे शिक्षण दिले. त्यांच्या प्रगतीने प्रभावित होऊन त्यांच्या चुलत्यांनी त्यांना गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्याकडे ठुमरी आणि ख्याल या गायनप्रकारांचे शिक्षण घेण्यासाठी पाठविले. या प्रशिक्षणामुळे त्यांनी रागसंगीतावर विशेष प्रभुत्व मिळविले आणि त्यांच्या सनईवादनात गायकीचे सर्व अंग प्रभावीपणे अवतरले.

महाराष्ट्रात सनईवर शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रीय संगीत सादर करण्याचा मान शंकररावांना दिला जातो. नामवंत गुरूंकडून मिळालेल्या तालीमेमुळे त्यांच्या वादनात रागदारी संगीताची समृद्ध परंपरा प्रकर्षाने दिसून येत असे. त्यांच्या प्रेरणेने अनेक सनईवादकांनी शास्त्रीय संगीत सनईवर सादर करण्यास प्रारंभ केला. शुभप्रसंगी येणाऱ्या लोकांवर शास्त्रीय संगीताचे संस्कार व्हावेत, या हेतूने ते सनईवर नाट्यगीतेही सादर करीत असत. राग यमन, शुद्ध सारंग आणि मालकंस हे राग ते विशेष आवडीने वाजवत असत. त्यांच्या मते, या रागांशिवाय शुभप्रसंगाला पूर्णत्व प्राप्त होत नसे. त्यामुळे त्या काळात शंकररावांचे सनईवादन आणि शुभप्रसंग हे समीकरणच बनले होते. त्यांच्या प्रभावी वादनामुळे श्रोते अनेकदा त्यांना रोख बक्षिसेही देत असत. मारवाडी समाजातील विवाहसमारंभांत त्यांना आमंत्रित करण्यासाठी विशेष स्पर्धा असे. त्यांच्या संचात शंकरराव सनईवर, गणपत मामा संबळवादनावर आणि बबन हार्मोनियमवर असत. या संचाचे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय ठरत. एका विवाहसमारंभात त्यांनी गोड सारंग रागाने कार्यक्रमाची सुरुवात केली. श्रोत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘चंद्रिका ही जणू…’ हे नाट्यगीत सनईवर सादर केले. त्यास उत्स्फूर्त दाद मिळाली आणि काही रसिकांनी त्यांना रोख बक्षिसेही दिली. लग्नसमारंभांत व्याही आणि विहिणी यांच्यासाठी ते सनईवर एक विशेष गीत सादर करीत असत. ‘सावकाश जेवा, काय लागेल ते मागून घ्या, आमचे जेवण गोड मानून घ्या’ अशा आशयाचे हे गीत सनईवर वाजविण्याचे कौशल्य केवळ त्यांच्याचकडे असल्याचे मानले जाते.

शंकररावांच्या सनईवादनाची कीर्ती महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतातही पसरली होती. त्यांनी देशातील अनेक नामवंत संगीतसभांत शास्त्रीय सनईवादनाचे कार्यक्रम सादर केले. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवात शेवटच्या चार दिवसांच्या सनईवादनाची जबाबदारी त्यांच्याकडे नियमितपणे असे. एकदा दगडूशेठ गणेशोत्सवात त्यांच्या सनईवादनाच्या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली असताना, तेथून जात असलेल्या म्हैसूर संस्थानच्या राजांचे लक्ष त्या गर्दीकडे गेले. चौकशीअंती त्यांनी शंकररावांचे वादन ऐकले आणि त्यांना म्हैसूरच्या दसरा महोत्सवासाठी निमंत्रित केले. हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आणि पुढील सुमारे १२ ते १५ वर्षे त्यांचा संपूर्ण संच म्हैसूरच्या दसरा महोत्सवात नियमितपणे सादरीकरण करीत राहिला. शंकररावांनी भारतातील अनेक प्रमुख शहरांत आपली कला सादर केली. एच. एम. व्ही. कंपनीने १९३७ ते १९३९ या काळात त्यांच्या जौनपुरी, मुलतानी, भीमपलास, मालकंस, तिलककामोद, दरबारी कानडा आणि बागेश्री या रागांच्या तसेच काही धुनी, नाट्यपदे आणि भजनांच्या नऊ-दहा ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. या ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय ठरल्या. बीबीसी आणि सिलोन रेडिओवरही त्यांचे प्रसारण होत असे. फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधी यांच्यासमोर सनईवादन केले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील शनिवारवाड्यावर सनईवादन करण्याचा मानही त्यांना मिळाला. तसेच पुणे आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन त्यांच्या सनईवादनाने झाले.

त्यांच्या कार्यामुळे सनईला स्वतंत्र आणि प्रतिष्ठित वाद्य म्हणून मान्यता मिळाली. विविध संगीतसंस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. पुणे महानगरपालिकेने १९५४ ते १९६९ या काळात त्यांचा विशेष सन्मान केला. पुणे संगीत शिक्षक संघाने विख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. आयुष्यभर सनईवर अपार प्रेम करणाऱ्या शंकररावांनी सनईचा मूळ बाज अबाधित राखला आणि सनईप्रेमी रसिकवर्ग निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ : क्षेत्र संशोधन

समीक्षण : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.