जाधव, सिद्राम : (२१ जून १९२२–४ फेब्रुवारी १९९१). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुंद्रीवादक. त्यांचे संपूर्ण नाव सिद्राम भीमण्णा जाधव असे होते. त्यांचा जन्म सोलापूरजवळील अहिरवाडी येथे झाला. त्यांचे वडील भीमण्णा जाधव हे शेतमजुरीबरोबरच पारंपरिक सनई-वादनाचा व्यवसाय करीत असत. जाधव घराण्यात पणजोबा, आजोबा आणि वडील या पिढ्यांपासून सनईवादनाची परंपरा जोपासली गेली होती. गावातील धार्मिक समारंभ, विवाहप्रसंग आणि वाजंत्री वादनाची जबाबदारी परंपरेने या घराण्याकडे होती. या सांगीतिक परंपरेतच सिद्राम जाधव यांची जडणघडण झाली.
सिद्राम जाधव यांचे मोठे बंधू बाबुराव जाधव यांनी सुंद्री या सुशिर वाद्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. हातमाग उद्योगात वापरल्या जाणाऱ्या लाकडी बॉबीन या नळीला आठ छिद्रे पाडून, त्यास फुंकणी व ताडपत्रीच्या पात्या जोडून त्यांनी एक नवीन वाद्य विकसित केले. या वाद्यातून निर्माण होणाऱ्या मधुर नादामुळे त्यास प्रारंभी सुंदर बॉबीन असे संबोधले जाऊ लागले. पुढे २७ फेब्रुवारी १९३६ रोजी अक्कलकोट संस्थानचे राजे फत्तेसिंह यांच्या राज्यारोहण समारंभात या वाद्याचे सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी राजांनी या वाद्याला सुंद्री हे नाव दिल्याची परंपरागत माहिती प्रचलित आहे. पुढे हे वाद्य ‘शहनाईची धाकटी बहीण’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
बाबुराव जाधव यांच्या निधनानंतर सिद्राम जाधव यांनी सुंद्रीवादनाची परंपरा समर्थपणे पुढे नेली. त्यांनी घराण्यातील वादनपरंपरा आत्मसात करून सुंद्रीवादनाला स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्या वादनात सुरेलपणा, रागदारी संगीताचे ज्ञान आणि भावसंपन्नता यांचा उत्कृष्ट संगम आढळतो. तिलक कामोद, भूप, मालकंस, पहाडी, यमन, बागेश्री आणि भैरवी हे राग ते विशेष कौशल्याने सादर करीत असत. त्यांच्या सुंद्रीवादनास त्यांचे बंधू लक्ष्मण जाधव तबल्याची समर्थ साथ देत असत.
सिद्राम जाधव यांनी सुंद्रीवादनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. लोकप्रिय गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते आकाशवाणीचे ‘अ’ श्रेणीचे कलाकार म्हणून मान्यता पावले. त्यांनी भारतभर तसेच परदेशांतही सुंद्रीवादनाचे कार्यक्रम सादर केले. त्यांचे कार्यक्रम आकाशवाणी आणि बीबीसी (लंडन) वरून प्रसारित झाले. एच. एम. व्ही. कंपनीने त्यांच्या वादनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांच्या कलाप्रतिभेचा गौरव म्हणून १९५४ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना रौप्यचषक प्रदान करण्यात आला. पुढे १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ‘सुंद्रीसम्राट’ ही पदवी देऊन गौरविले. सिद्राम जाधव यांनी सुंद्रीवादनाचा इतिहास, रचना आणि परंपरा यांचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्यही केले. सुंद्री या वाद्याला सोलापूरपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात त्यांना दिले जाते. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबीयांनी ही परंपरा जतन केली आहे. त्यांच्या चौथ्या पिढीतील पं. चिदानंद जाधव यांनी सुंद्रीसम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ स्थापन केले असून, पाचवी पिढीही सुंद्रीवादनाच्या जतन व संवर्धनाचे कार्य करीत आहे.
सुंद्रीवादनाच्या परंपरेला अभिजात स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या या प्रतिभासंपन्न कलावंताचे वृद्धापकाळाने निधन झाले.
संदर्भ : क्षेत्र संशोधन
समीक्षण : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
