पाली तिपिटकातील एक ग्रंथ. ‘विनय’ म्हणजे भिक्षुसंघाच्या अनुशासनाचे नियम, तर ‘पिटक’ म्हणजे पेटी किंवा संग्रह. विनय पिटक म्हणजे बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी यांच्या आचारसंहितेचा, शिस्तीचा आणि संघजीवनाच्या नियमांचा संग्रह आहे. बौद्ध संघाची एकता, पवित्रता, सुव्यवस्था आणि दीर्घायुष्य टिकवण्यासाठी बुद्धांनी हे नियम निश्चित केले.

विनय पिटकाचा मुख्य विषय शील किंवा नैतिक आचारसंहिता हा आहे. यात भिक्षू-भिक्षुणींच्या वर्तनाचे नियम, पातिमोक्ख, दैनंदिन जीवनपद्धती, वर्षावासाचे नियम, निवासाची व्यवस्था, भिक्षा स्वीकारण्याचे नियम, तक्रार निवारण, अपराधांचे वर्गीकरण, कायदेशीर प्रक्रिया, तसेच वैद्यकीय सुविधांविषयीची माहिती मिळते, म्हणूनच विनय पिटक हा केवळ धार्मिक नियमांचा संग्रह नसून, तो बौद्ध संघाच्या संस्थात्मक जीवनाचा मूलाधार आहे. परंपरेनुसार विनय पिटकात १६९ ‘भाणवार’ असल्याचे सांगितले जाते. एक भाणवार म्हणजे सुमारे आठ हजार शब्दांचा समूह होय. या मोजणीनुसार विनय पिटकात साधारण १,३२,००० शब्द आहेत. थेरवाद परंपरेतील विनय पिटक पाली भाषेत उपलब्ध आहे; परंतु याशिवाय संस्कृत, चिनी आणि तिबेटी भाषांमध्येही विविध बौद्ध पंथांचे स्वतंत्र विनयग्रंथ उपलब्ध आहेत. यावरून विनय परंपरेचे व्यापक स्वरूप स्पष्ट होते.विनय पिटक हा ग्रंथ तो गौतम बुद्ध यांच्या प्रत्यक्ष उपदेशांवर आधारित आहे. बुद्धांनी भिक्षू आणि भिक्षुणींच्या जीवनात घडणाऱ्या ठराविक घटना किंवा प्रसंगांच्या अनुषंगाने अनुशासनाचे नियम ठरवले. बुद्धांनी स्वतः हे नियम लिखित स्वरूपात मांडले नाहीत. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्या बौद्ध संगीतीमध्ये या नियमांचे संकलन करण्यात आले. या वेळी उपाली थेरांनी विनयाशी संबंधित सर्व नियमांचे स्मरणपूर्वक विवरण केले. उपाली हे विनयाचे प्रमुख जाणकार मानले जात असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरूनच विनय पिटकाची रचना निश्चित झाली. यामुळे विनय पिटक हा बुद्धांनी दिलेल्या नियमांचा आणि भिक्षुसंघाने केलेल्या संकलनाचा एक सुसंगत आणि प्रामाणिक असा ग्रंथ आहे.

विनय पिटकाचे मुख्यतः तीन भाग आहेत:                                                                                         

  • सुत्तविभंग : सुत्तविभंग हा विनय पिटकाचा पहिला भाग असून तो पातिमोक्खातील नियमांचे सविस्तर स्पष्टीकरण करतो. यात नियमांचा उगम, त्यामागील प्रसंग, शब्दशः विश्लेषण, अपवाद आणि त्यांचा उपयोग स्पष्ट केला जातो. थेरवाद परंपरेनुसार भिक्षूंसाठी २२७ नियम आणि भिक्षुणींसाठी ३११ नियम सांगितले आहेत. सुत्तविभंगाचे दोन प्रमुख भाग आहेत. १. पाराजिक २. पाचित्तिय या विभागांत नियम मांडताना प्रथम प्रसंगकथा दिली जाते, नंतर नियम, त्यानंतर आवश्यक असल्यास अतिरिक्त अट, मग त्या नियमाचे शब्दशः स्पष्टीकरण  आणि शेवटी ‘कोणत्या प्रसंगी दोष लागत नाही’ हे सांगितले जाते. सुत्तविभंगाचे आणखी दोन विभाग करता येतात— १. भिक्खुविभंग २. भिक्खुणीविभंग पहिल्या विभागात भिक्षूंशी संबंधित नियम, तर दुसऱ्या विभागात भिक्षुणींशी संबंधित नियम दिलेले आहेत.
  • खन्धक : विनय पिटकाचा दुसरा भाग खन्धक असून त्याचे दोन उपभाग आहेत— १.महावग्ग २. चुल्लवग्ग  ‘खन्धक’ म्हणजे विभाग. या भागात बौद्ध संघाच्या कार्यपद्धतीसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. महावग्गात दहा खन्धक, तर चुल्लवग्गात बारा खन्धक आहेत.महावग्गात बुद्धांचे ‘ज्ञानप्राप्ती’, ‘प्रथम धर्मचक्र प्रवर्तन’, ‘धर्मप्रसार’, ‘भिक्षुसंघाची स्थापना’, ‘उपोसथ’, ‘वर्षावास’, ‘पवारणा’ इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांचे वर्णन आहे. तर चुल्लवग्गात दैनंदिन कार्यपद्धती, विविध अपराध, भिक्षूंची कर्तव्ये, विहारांची उभारणी, निवासव्यवस्थेचा विस्तार, मठीय संरचना इत्यादींची माहिती मिळते. तसेच चुल्लवग्गाच्या शेवटच्या दोन खन्धकांत पहिल्या दोन बौद्ध संगीतींचा उल्लेख येतो. त्यामुळे खन्धक विभाग बौद्ध संघाच्या संघटनात्मक आणि ऐतिहासिक अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरतो.
  • परिवार : विनय पिटकाचा तिसरा आणि अंतिम भाग परिवार किंवा परिवारपाठ या नावाने ओळखला जातो. यात २५ भाणवार असून हा ग्रंथ विनय पिटकाचा एक प्रकारचा संक्षिप्त मार्गदर्शक मानला जातो. यामध्ये सुत्तविभंग आणि खन्धक या दोन्ही भागांतील विषयांचे पुनरावलोकनात्मक स्वरूपात संकलन केलेले आहे.परिवाराची शैली इतर दोन भागांपेक्षा वेगळी आहे. यात सुरुवात प्रश्नोत्तरांनी होते. बुद्ध किंवा इतर व्यक्तींचा थेट उल्लेख न करता विषयांची मांडणी केली जाते. हा ग्रंथ विशेषतः अभ्यास, स्मरण आणि अध्यापनासाठी सोयीचा आहे. म्हणूनच तो विनय पिटकाचे साररूप मानला जातो. यात विनय परंपरेतील प्रमुख आचार्यांची परंपरासुद्धा सूचित केलेली आढळते.अनेक अंगांनी विनय पिटकाचे महत्त्व अधोरेखित करता येते.१. तो बौद्ध संघाच्या शिस्तबद्ध जीवनाचा पाया आहे.२. तो भिक्षू-भिक्षुणींच्या नैतिकतेचे संरक्षण करतो.३.संघाच्या एकतेसाठी, मतभेदांच्या निवारणासाठी आणि संघजीवनाच्या सातत्यासाठी विनय आवश्यक आहे. ४. बौद्धमठीय जीवन, प्राचीन भारतीय समाज, संघरचना आणि धार्मिक व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासासाठी विनय पिटक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाचा आहे. विनयाशिवाय संघ टिकू शकत नाही, ही भावना बौद्ध परंपरेत  स्पष्टपणे व्यक्त झालेली दिसते. बौद्ध संघासाठी विनय आवश्यक आहे. म्हणून विनय पिटक हे तिपिटकातील केवळ नियम पुस्तक नसून, बौद्ध संघाच्या आदर्श वनपद्धतीचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे. एकूणच, विनय पिटक हा बौद्ध धर्मातील शिस्त, नैतिकता आणि संघटन भिक्षू आणि भिक्षुणी यांच्या शुद्ध, संयमी आणि अनुशासित जीवनासाठी विनय पिटक अनिवार्य आहे. त्यामुळे बौद्ध धर्माच्या अभ्यासात विनय पिटकाला अत्यंत मानाचे स्थान आहे.

संदर्भ :

  • Hazra, Kanai Lal, ‘Pali Language and Literature: A Systematic Survey and Historical study’. K.Print World, New Delhi.110015 . 1994
  • Hinüber, Oskar von., ‘A Handbook of Pāli Literature.’  Berlin: Walter de Gruyter,
  • Rhys Davids, T. W., trans. ‘Vinaya Texts’. Oxford: Clarendon Press,Study. New Delhi: D K Print world, 1994.                                                                                                                                                                                                                                                                                        समीक्षक : सतीश पवार

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.