उत्पादन घटकांव्यतिरिक्त ज्ञानाची उपलब्धता, विपुलता, दर्जा, आणि सजगता यांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्थेची वाढ अथवा वृद्धी म्हणजे ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था. सध्याचे एकविसावे शतक हे ज्ञानकेंद्रित समाजाचे किंवा अर्थव्यवस्थेचे
मानले जाते. ज्ञानावर प्रभुत्व म्हणजे जगावर प्रभुत्व, असा अर्थ यातून अभिप्रेत आहे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था ही संकल्पना १९९० च्या दशकात उदयास आली. सशक्त बुद्धी असणारी व्यक्ती जुलूम, अत्याचार, वेठबिगारी, पिळवणूक, व्यक्तीक्लेश, भेदभाव यांचा सामना समर्थपणे करू शकतो; तसेच तो स्वत:चे आणि कुटुबाचे राहणीमान बदलू शकतो. एकविसाव्या शतकात ज्ञान ही वस्तू झाली असून ते मिळविण्यासाठी किंमत मोजावी लागत आहे. वस्तू व सेवांच्या बाजाराप्रमाणे ज्ञानाचे हस्तांतरण होताना दिसते. दुसऱ्यांचे ज्ञान किंवा कौशल्याचा वापर करण्यासाठी किंमत मोजावी लागते, त्यास संपदा अथवा स्वामित्व मूल्य असे म्हणतात.
आताच्या उद्योगांमध्ये बौद्धिक कौशल्यांना फार महत्त्व असून त्याचा वापर करून वस्तू व सेवा निर्माण केल्या जातात. अतिउच्च कौशल्ये किंवा उच्च ज्ञानपातळी असणाऱ्या मनुष्यबळाचा आणि सल्लागारांच्या सेवेचा उपयोग करून वस्तू व सेवांची निर्मिती केली जात असेल, तर त्या अर्थव्यवस्थेला ज्ञान अर्थव्यवस्था म्हणता येईल. जगात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर यंत्राचे आणि जुजबी किंवा मध्यम पातळीचे कौशल्य वापरून उत्पादन घेतले जात होते. सन १९८० च्या दशकात उच्च कौशल्यधारक अभियंता, संशोधक, व्यवस्थापक यांनी स्वयंचलित तंत्रज्ञानाचा पाया घातला. त्यामुळे अखंड व अविरतपणे आकर्षक व सुबक वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. सन १९८५ मध्ये माहिती तंत्रज्ञान व माहितीशास्त्राचा उदय, प्रसार आणि विस्तार झाल्यामुळे ज्ञान अर्थव्यवस्थेचे महत्त्व वाढतच गेले. सन १९९० च्या दशकामध्ये आंतरजाल, उपग्रह, वर्ल्ड वाईड वेब, विविध सामाजिक माध्यमे इत्यादींमुळे माहिती सहज उपलब्ध होत असल्यामुळे ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचा पाया व तिची व्याप्ती वाढण्यास मदत झाली आहे.
ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था ही संज्ञा लोकप्रिय होण्याअगोदर त्याचा उल्लेख सर्वप्रथम अमेरिकन अर्थतज्ज्ञ फ्रीज मॅकलूप यांनी ज्ञान हे इतर उत्पादनांच्या साधनासारखेच महत्त्वाचे साधन असल्याचे म्हटले होते. उत्पादनाची साधने उत्पादन प्रक्रियेत वापरत असताना त्यांच्या मालकाला किंवा स्वत:ला (व्यवस्थापकाला) उत्पादन घटक म्हणून आर्थिक मोबदला द्यावा लागतो. त्याच प्रमाणे ज्ञानधारकाला आर्थिक मोबदला देणे इष्ट ठरते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ फ्रेडरिक विन्झ्लो टेलर यांनी आपल्या ‘शास्त्रीय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे’ यात ज्ञान हा एक महत्त्वाचा उत्पादन घटक किंवा तत्त्व असल्याचे म्हटले. बाजारपेठेचे ज्ञान, उत्पादन पद्धतीचे ज्ञान, विपणन, जाहिरातीचे एकत्रीकरण, नवीन तंत्रज्ञान, व्यवस्थापन ज्ञान किंवा कौशल्ये, नवीन उत्पादनांचा शोध आणि तदनंतर त्याचे उत्पादन यात त्यांनी ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. औद्योगिक उत्पादकता आणि क्षमता वाढण्यासाठी त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे सांगितली असून व्यवस्थापकामध्ये आस्थापनाबरोबरच कल्पकता आणि दूरदृष्टी असावी लागते. खरेतर या बाबी उच्चतम ज्ञानाची पातळी व भान यांचा एक भाग असतात.
ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था ही संज्ञा लोकप्रिय करण्याचे श्रेय अमेरिकेतील विपणनशास्त्राचे प्रख्यात लेखक व सल्लागार पीटर ड्रकर यांना जाते. त्यांच्या १९६६ मधील द इफेक्टिव्ह एक्सक्युटिव्ह या पुस्तकात त्यांनी भौतिक कामगार आणि बौद्धिक कामगार असा भेद करताना भौतिक कामगार यंत्राबरोबर काम करून वस्तू व सेवा निर्माण करतो, तर बौद्धिक कामगार स्वत:ची बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, विवेकशक्ती यांचा वापर करून उत्पादन करतो अथवा उत्पादन पद्धती शोधत, असे म्हटले आहे.
औद्योगिक क्रांतीनंतर स्वयंचलित तंत्रज्ञानाचा प्रवास १९६० ते १९८० पर्यंत चालू होता. त्यात संगणकप्रणीत आणि नियंत्रण आज्ञावली या तंत्रांची भर पडली असून यालाच ज्ञानक्रांती, ‘ज्ञानावर आधारलेली अर्थव्यवस्था’ असे संबोधले जातात. सन १९९० नंतर वेगाने वाढणाऱ्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत विशेष कौशल्यधारक मनुष्यबळाला मागणी वाढत आहे. यात संगणक जाणकार व त्यातील तज्ज्ञ, आकडेवारीचे जतन करणारे व विश्लेषक, संशोधक, सल्लागार, स्वामित्व अधिकार प्राप्त संशोधक, नावलौकिक मिळविलेले तंत्रज्ञ, एकस्व, स्वामित्व हक्कदार, रासायनिक व औषधी अभियंता व त्यांचे तंत्रज्ञ, परमाणु तंत्रज्ञ, उपग्रह तंत्रज्ञ, पद्धती व उत्पादन तंत्रज्ञ यांचा समावेश होतो. मायकेल पोर्टर यांच्या मते, आजची अर्थव्यवस्था प्रचंड गतिशील असून तुलनात्मक फायदा यापेक्षा स्पर्धात्मक फायदा यावर ती जास्त निर्भर होत जात असून उपलब्ध उत्पादन आदानांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी नवोन्मेषाची कास धरावी लागते. नवोन्मेष करणाऱ्या मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढत जाईल, असे ते भाकीत करतात. आज जगात, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियंताशास्त्र, आणि गणित (स्टेम) अभ्यासक्रमांना जास्त मागणी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अती हुशार व कौशल्यधारक मनुष्यबळाचा पर्याप्त वापर करून विशिष्ट व अतिविशेषी उत्पादन करणारे प्रदेश, वसाहती, शहरे किंवा विभाग नावारूपाला आले आहेत. उदा., अमेरिकेतील सिलिकॅान व्हॅली, जर्मनीतील म्यूनिक शहरातील विमान व वाहन उद्योग, दक्षिण कोरियाच्या सोल (सेऊल) शहरातील जहाजबांधणी उद्योग, भारतातील हैदराबाद येथील जैवतंत्रज्ञान उद्योग इत्यादी. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाचा पद्धतशीर वापर केला जात असल्यामुळे परदेश स्थानिकीकरणाच्या निर्बंधावर मात करण्याबरोबर स्वस्तात तंत्रज्ञ मिळणे, उत्पादनखर्च वाचविणे, कामगार-मालक संघर्ष टाळणे सहज शक्य झाले आहे.
‘ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था’ या संकल्पनेला जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर अधिक बळकटी प्राप्त झाल्याचे दिसून येते. अनेक विकसित आणि औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांनी मुक्त व्यापार हाच विकासाचा मार्ग असे मानल्याने गॅट कराराचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेत झाले; मात्र त्यासाठी आदाने, तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, कच्चामाल इत्यादींची मुक्तपणे देवाणघेवाण होऊ द्यावी असे ठरविण्यात आले. जगातील विकसनशील आणि अविकसित देश तंत्रज्ञान चोरतात, उत्पादन पद्धतीची नक्कल करतात, हुबेहूब वस्तू व उत्पादने बनवितात यांमुळे संशोधन करणाऱ्या आणि संशोधनात करोडो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या राष्ट्रांचे, त्यांच्या कंपन्याचे प्रचंड नुकसान होते. म्हणून संबधित देशांनी किंवा वापरकर्त्या उद्योगसमूहांनी स्वामित्व किंमत चुकती करावी, असा करार झाला. त्यानुसार व्यापारसंबधित बौद्धिक संपदा अधिकार (ट्रिप्स), व्यापारी गुंतवणूक संबधित उपाययोजना (ट्रिम्स) अस्तित्वात आले. या करारामुळे ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
अतिउच्च तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञ, संशोधन, प्रयोगशाळा, प्रयोगशीलता, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, अतिजलद आकडेवारी वहन व त्याचा सुरक्षित साठा, आकडेवारी विश्लेषक, शास्त्रज्ञ या सर्व बाबी ज्ञानावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे आधारस्तंभ बनले आहेत. म्हणून जगातील सर्वच विद्यापीठे, सरकारे आणि उद्योग समूह हे ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचा पाठपुरावा करीत आहेत.
संदर्भ :
- Drucker, Peter, The Age of Discontinuity, New Brunswick, 1969.
- Drucker, Peter, The Effective Executive, USA, 1966.
- Fritz, Machlup, The Production and Distribution of Knowledge in United States, Princeton, 1962.
- Taylor, Frederick, The Principals of Scientific Management, Haper and Brothers Publishers, 1919.
समीक्षक : संतोष दास्ताने
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
