अरविंदासव हे आयुर्वेदातील आसव प्रकारातील द्रवरूप औषध आहे. हे प्रामुख्याने बालकांसाठी शक्तीवर्धक औषध (Tonic) म्हणून उपयुक्त आहे. यास ‘बालपोषक आसव’ असेही म्हणतात.

घटक : या आसवातील मुख्य घटक कमळ (अरविंद) असून याशिवाय यामध्ये मंजिष्ठा, वेलदोडा, दालचिनी, नागरमोथा, अश्वगंधा, शतावरी, मनुका, त्रिफळा (आवळा, हिरडा, बेहडा), ज्येष्ठमध, अनंतमूळ, जटामांसी, वाळा, कचूर, अर्जुन, धायटीची फुले, मोहाची फुले इत्यादी औषधी वनस्पतींचा समावेश असतो. नैसर्गिक किण्वन (Fermentation) प्रक्रियेसाठी मध, गूळ किंवा साखर हे पदार्थ वापरतात. पचनसंस्था मजबूत करण्यासाठी कमळ वनस्पतीचा उपयोग होतो. नैसर्गिक ऊर्जा व पोषणासाठी मनुका वापरल्या जातात. घसादुखी, खोकला व पचनाच्या तक्रारींसाठी ज्येष्ठमध वापरतात. रोगप्रतिकारशक्ती व पचन सुधारण्यासाठी त्रिफळा उपयुक्त आहे.

लाभ : अरविंदासव हे औषध बालकांच्या एकूणच सर्वांगीण वाढीसाठी उपयोगी आहे. बालकांमध्ये पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते. हे औषध अपचन, भूक न लागणे, बद्धकोष्ठता, अतिसार या विकारांमध्ये गुणकारी आहे. मुलांमधील कॅल्शियमची कमतरता दूर करून हाडांना मजबूती देते. या औषधामुळे सर्दी, खोकला आणि दम लागणे यांसारख्या श्वसनाच्या त्रासांमध्ये आराम मिळतो. या औषधाच्या सेवनामुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता वाढते. मुलांच्या मानसिक विकासासाठी हे औषध अत्यंत गुणकारी आहे. मेंदूचे आरोग्य सुधारून आकलनशक्ती (Cognitive skills) वाढवण्यास मदत करते. तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास साहाय्य करते. मुलांमधील चिडचिडेपणा दूर करते. अशक्त आणि कृश बालकांसाठी हे एक उत्तम आयुर्वेदिक पूरक औषध आहे. शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी योग्य दिनचर्या व पौष्टिक आहारासोबत अरविंदासव उपयुक्त मानले जाते.

मात्रा : अरविंदासव साधारणपणे ५ ते १५ मिली (१ ते २ चमचे) तितक्याच कोमट पाण्यात मिसळून जेवणानंतर दिले जाते. कधीकधी गूळ किंवा मधासोबत घेण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु, बालकाचेवय, प्रकृती आणि आरोग्य यानुसारया औषधाची मात्रा बदलते. त्यामुळे या औषधाचे सेवन आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच करावे.

औषध सेवन करताना घ्यावयाची काळजी : मधुमेह किंवा विशेष आजार असलेल्या मुलांमध्ये वैद्यांचा सल्ला आवश्यक आहे. हे औषध स्वत:हून दीर्घकाळ सेवन करू नये. औषधासोबत संतुलित आहार व पुरेशी झोप महत्त्वाची आहे.

पहा : आयुर्वेदिक औषधे सेवन करताना घ्यावयाची काळजी, आसव-अरिष्ट.

संदर्भ:

  • गुणे, गंगाधरशास्त्री, आयुर्वेद औषधी गुणधर्मशास्त्र,  भाग ५, अध्याय ३.
  • भैषज्य रत्नावली, बालरोग अधिकार, अध्याय ७१, श्लोक १६१–१६५.

समीक्षक : कौस्तभ चौंडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.