प्रतिलेखन म्हणजे भाषिक ध्वनींचे विशिष्ट चिन्हव्यवस्थेच्या साहाय्याने केलेले शास्त्रशुद्ध लिखित रूपांतर होय. एखाद्या विशिष्ट भाषेतील ध्वनींच्या सखोल आणि पद्धतशीर ध्वनिवैज्ञानिक अभ्यासासाठी प्रतिलेखन ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. भाषाशास्त्रातील ‘सामान्य ध्वनिविचार’ या शाखेत, जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील ध्वनींचा भाषानिरपेक्ष शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी प्रतिलेखनाचा प्रामुख्याने वापर केला जातो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत वेगवेगळ्या भाषांचे उच्चार नोंदवण्यासाठी संशोधक आपापल्या सोयीनुसार चिन्हे वापरत असत, त्यामुळे अभ्यासात एकवाक्यता येत नव्हती. या समस्येवर मात करण्यासाठी १८८६ मध्ये ‘इंटरनॅशनल फोनेटिक असोसिएशन’ची (International Phonetic Association) स्थापना झाली. या संस्थेने १८८८ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमाला’ (International Phonetic Alphabet – IPA) विकसित केली. ही जगातील सर्वाधिक स्वीकारली गेलेली प्रतिलेखन पद्धती आहे. यामध्ये मानवी मुखातून निघणाऱ्या प्रत्येक संभाव्य ध्वनीसाठी एक विशिष्ट चिन्ह निश्चित करण्यात आले आहे. लिपी असणाऱ्या भाषांबरोबरच मौखिक स्वरूपातच केवळ असणाऱ्या भाषांचा अभ्यास करण्यासाठी प्रतिलेखनाचा वापर अधिक प्रभावीपणे केला जातो. विविध भाषांमध्ये एकाच लिपीचिन्हाचा उच्चार भिन्न असू शकतो, तसेच एकाच ध्वनीचे लेखन वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते. या कारणामुळे ध्वनी आणि लिपी यांमध्ये काही प्रमाणात विसंगती आढळते. प्रतिलेखन ही पद्धत या विसंगतीवर मात करून भाषणातील प्रत्यक्ष ध्वनिरूपे वस्तुनिष्ठ पद्धतीने नोंदविण्याचे साधन ठरते. त्यामुळे भाषेच्या ध्वनिव्यवस्थेचा अभ्यास अधिक अचूकपणे करता येतो.

मराठीसह भारतीय भाषांच्या अभ्यासात प्रतिलेखनाची उपयुक्तता विशेषत्वाने अधोरेखित होते. मराठीतील अनुस्वारांचा उच्चार पुढील व्यंजनानुसार बदलत असतो. उदा., ‘अंक’ /əŋk/ आणि ‘संत’ /sən̪t̪/ या शब्दांमधील सूक्ष्म उच्चारभेद प्रतिलेखनाद्वारे स्पष्टपणे मांडता येतात. देवनागरी लिपी तुलनेने ध्वनिविचाराशी सुसंगत असल्याने ध्वन्यात्मक लिपी मानली जाते. असे असले तरीही प्रत्यक्ष बोलींमध्ये अनेक सूक्ष्म उच्चारभेद आढळतात. मराठीत च, ज या अक्षरांचे दोन प्रकारचे उच्चार होतात: दंतमूलीय आणि तालव्य. उदा., ‘चाकर’, ‘जातो’ या शब्दांमधील ‘च’ आणि ‘ज’ यांचे उच्चार दंतमूलीय आहेत. तर ‘चहा’, ‘जग’ यांमधील उच्चार तालव्य आहेत. प्रतिलेखनामध्ये दंतमूलीय ‘च’ उच्चारासाठी [ t̪s ] आणि तालव्य ‘च’ साठी [ ʈʃ ] हे चिन्ह वापरले जाते. प्रतिलेखानात हा फरक स्पष्टपणे नोंदवता येतो. भारतीय भाषांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दंत्य आणि मूर्धन्य ध्वनींमधील भेद. मराठीत ‘ताक’ (त – दंत्य) आणि ‘टाक’ ( ट – मूर्धन्य) यामुळे अर्थ बदलतो. प्रतिलेखनात दंत्यसाठी [ t̪ ] आणि मूर्धन्यसाठी [ ʈ ] हे चिन्ह वापरले जाते. त्याचप्रमाणे दंत्य न [ n̪ ] आणि मूर्धन्य ण [ ɳ ] किंवा दंत्य ल [ l̪ ] आणि मूर्धन्य ळ [ ɭ ] यांसारखे भेदही मराठीत आढळतात. हा आंतरभाषिक फरक प्रतिलेखनाद्वारे अचूकपणे मांडता येतो. बोलीभाषाशास्त्र, समाजभाषाशास्त्र तसेच क्षेत्रीय भाषिक सर्वेक्षणांमध्ये भाषिक माहिती नोंदविताना संशोधक प्रतिलेखनाचा व्यापक वापर करतात. राज्य मराठी विकास संस्था आणि डेक्कन कॉलेज, पुणे यांनी संयुक्तपणे केलेल्या ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन’ या प्रकल्पामध्ये मराठीच्या बोलींमधील भाषिक नमुन्यांचे प्रतिलेखन केले आहे.

प्रतिलेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये:

१. अचूकता: लिपीच्या मर्यादा ओलांडून प्रत्यक्ष भाषणातील सूक्ष्म ध्वन्यात्मक भेद प्रतिलेखनाद्वारे अचूकपणे नोंदवता येतात. उदा., एखाद्या भाषेतील अल्पप्राण [ p ] आणि महाप्राण [ pʰ ] या दोन ध्वनींमधील सूक्ष्म उच्चारभेद प्रतिलेखनात अचूकपणे स्पष्ट करता येतो.

२. एकवाक्यता : प्रतिलेखन पद्धतीत चिन्ह आणि ध्वनी यांच्यात एकवाक्यता असते. एका विशिष्ट चिन्हाचा अर्थ नेहमी एकच विशिष्ट ध्वनी असा संकेतबद्ध असतो आणि एका ध्वनीसाठी एकापेक्षा जास्त चिन्हे वापरली जात नाहीत. त्यामुळे जगभरातील भाषाशास्त्रज्ञांना कोणत्याही भाषेच्या उच्चारांचे आकलन समान पद्धतीने होते.

३. सार्वत्रिकता: प्रतिलेखन ही कोणत्याही एका भाषेपुरती मर्यादित नसून ती एक आंतरराष्ट्रीय आणि भाषानिरपेक्ष चिन्हव्यवस्था आहे. या पद्धतीच्या साहाय्याने जगातील कोणत्याही देशातील, कोणत्याही भाषेचा किंवा दुर्गम बोलीचा प्रत्यक्ष उच्चार एकाच चिन्हव्यवस्थेत तंतोतंत मांडता येतो.

प्रतिलेखनामध्ये ध्वनिस्तरावरील स्वर, व्यंजने आणि उच्चारातील सूक्ष्म बदल दर्शवणारी पूरक चिन्हे आहेत. तसेच शब्द किंवा वाक्यस्तरावरील आघात, आवाजाचा चढउतार, ध्वनींचा दीर्घ उच्चार यांसारख्या घटकांनाही प्रतिलेखनाद्वारे चिन्हबद्द करता येते.

प्रतिलेखनाचे मुख्य प्रकार: भाषावैज्ञानिक अभ्यासात प्रतिलेखनाचे मुख्य दोन स्तर असतात.

१. ध्वन्यात्मक प्रतिलेखन (Phonetic / Narrow Transcription) : या प्रकारात प्रत्यक्ष उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनीचे अत्यंत तपशीलवार अंकन केले जाते. वक्त्याच्या उच्चारातील वैयक्तिक वैशिष्ट्ये किंवा प्रादेशिक हेल यात टिपले जातात. हे प्रतिलेखन नेहमी चौकोनी कंसात [ ] दिले जाते. उदा., इंग्रजीतील pin या शब्दाचे ध्वन्यात्मक प्रतिलेखन [pʰɪn] असे केले जाते.

२. स्वनिमिक प्रतिलेखन (Phonemic / Broad Transcription) : यामध्ये केवळ त्या ध्वनींची नोंद केली जाते जे भाषेमध्ये अर्थभेद निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. सूक्ष्म उच्चारभेदांकडे दुर्लक्ष करून केवळ मूळ स्वनिमांची नोंद यात होते. हे प्रतिलेखन तिरप्या रेषांत / / दिले जाते. उदा., इंग्रजीतील pin शब्दाचे स्वनिमिक प्रतिलेखन /pɪn/ असे सोप्या पद्धतीने केले जाते.

आधुनिक उपयोजन: आधुनिक काळात प्रतिलेखनाचा वापर मर्यादित न राहता तंत्रज्ञानाशी जोडला गेला आहे.

  • संगणकीय भाषाविज्ञान: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘स्पीच रेकग्निशन’ (उदा. Alexa, Siri) विकसित करताना मानवी आवाज समजून घेण्यासाठी प्रतिलेखनाचा वापर होतो.
  • कोशविद्या: प्रमाणित शब्दकोशात शब्दांच्या लेखनासोबतच त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर समजण्याजोगा उच्चार दर्शवण्यासाठी IPA प्रतिलेखन दिले जाते. परकीय भाषा शिक्षणात हे विशेष उपयुक्त ठरते.
  • वाक्-उपचारशास्त्र: उच्चारदोष, तोतरेपणा किंवा वाचाविकार असलेल्या व्यक्तींच्या उच्चारांचे अचूक विश्लेषण करून उपचार करण्यासाठी तज्ज्ञ ध्वन्यात्मक प्रतिलेखनाचा आधार घेतात.

‘ट्रान्सक्रिप्शन’ ही संज्ञा भाषाशास्त्राव्यतिरिक्त इतर विज्ञानशाखांमध्येही वापरली जाते. उदा., जीवशास्त्रात डी.एन.ए. मधील जनुकीय माहिती आर.एन.ए. मध्ये उतरवण्याच्या प्रक्रियेसाठी ‘ट्रान्सक्रिप्शन’ ही संज्ञा वापरतात. भाषाशास्त्राचा विचार केल्यास, प्रतिलेखन ही संज्ञा ध्वनींच्या लिखित प्रतिनिधित्वासाठी वापरली जाते.

संदर्भ :

  • कालेलकर, ना. गो.,‘ध्वनिविचार’, डेक्कन कॉलेज, पुणे, १९५५.
  • International Phonetic Association, Handbook of the International Phonetic Association, Cambridge University Press, 1999.
  • Ladefoged, Peter and Johnson, Keith, A Course in Phonetics, Cengage Learning, 2015.
  • मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन https://sdml.ac.in/mr

समीक्षक : सोनल कुलकर्णी-जोशी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.