भाषिक ध्वनींच्या वर्गीकरणातील एक तत्त्व. ‘घोष’ हा शब्द निरनिराळ्या संदर्भात विविध अर्थांनी वापरला जातो. भाषेच्या संदर्भात मोठा आवाज, गर्जना अशा अर्थांनी हा शब्द उपयोगात येतो. ‘घोषत्व’ हे भाषेतील ध्वनींमध्ये वेगळेपणा निर्माण करणारे उच्चारणाचे एक वैशिष्ट्य आहे. मानवी मुखावाटे उत्पन्न होणारे ध्वनी हे मुख्यत्वे श्वासोच्छ्वासासाठी नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या हवेच्या प्रवाहावर अवलंबून असतात. वागींद्रियामध्ये विविध तऱ्हांच्या हालचाली करून ध्वनी निर्माण केले जातात. श्वसनेंद्रिये, मुखातील विविध स्नायू आणि कूर्चायुक्त अवयव (cartilage) यांचा या स्वननिर्मितीमध्ये सहभाग असतो. भाषेतील बहुसंख्य ध्वनी हे हवा बाहेर टाकताना (बहि:श्वसित) निर्माण होतात. या प्रक्रियेत हवा फुप्फुसातून श्वासनलिकेत येते. तेथून घसा किंवा ग्रसनी (pharynx) मध्ये येण्याआधी ती स्वरयंत्रामधून प्रवास करते. स्वरयंत्रामध्ये दोन्ही बाजूंस असणाऱ्या घोषवलिकांमुळे (vocal folds) त्याचे प्रवेशद्वार झाकले जाते. हवेच्या प्रवाहात कंपने निर्माण करू शकणाऱ्या या भागांना स्वरतंत्री (vocal cords) असेही म्हणतात.

स्वरयंत्रातील घोषवलिकांच्या स्थितीवर निर्माण होणाऱ्या ध्वनींचे स्वरूप अवलंबून असते. घोषवलिका सैल स्थितीत, एकमेकींपासून दूर असतात, तेव्हा हवा स्नायूंना न घासता, सहज बाहेर पडते. श्वासोच्छ्वासाची नियमित क्रिया चालू असताना ही स्थिती असते. काही वेळा घोषवलिका दूर, निष्कंप असतानाच, वागींद्रियातील अन्य हालचालींमुळे ध्वनी निर्माण होतात. या कंपनविरहीत ध्वनींना ‘अघोष ध्वनी’ (voiceless) म्हटले जाते. घोषवलिका किंचित ताणलेल्या किंवा आवळलेल्या असताना त्या एकमेकींजवळ येतात, तेव्हा त्यांच्यामधील पोकळी आकुंचित होते. अशा स्थितीत हवा तेथील स्नायूंना घासत बाहेर पडल्यामुळे त्या कंप पावतात. घोषवलिकांची ही हालचाल अत्यंत वेगाने होते. गळ्यावर हलकेच बोट ठेवल्यास ती कंपने सहजपणे जाणवतात. यावेळी बाहेर पडणारे ध्वनीही कंपनयुक्त असतात, त्यांना ‘सघोष’ किंवा ‘घोष ध्वनी’ (voiced) म्हणतात.

मराठी व्यंजनांमध्ये  क्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, त्, थ्, प्, फ्  हे अघोष ध्वनी आहेत. तर ग्, घ्, ज्, झ्, ड्, ढ्, द्, ध्, ब्, भ् हे सघोष आहेत. बहुसंख्य स्पर्श (स्फोटस्वन), घर्षक व स्पर्शसंघर्षी व्यंजनांच्या अघोष व सघोष अशा जोड्या आढळतात. काही प्रकारच्या ध्वनींच्या बाबतीत मात्र अशा जोड्या न मिळता, अघोष किंवा सघोष असे एकाच प्रकारचे ध्वनी मिळतात. उदा. अनुनासिके, स्वर, अर्धस्वर, र् सारखा कंपित ध्वनी हे सर्व सघोष आहेत.

बहुसंख्य स्पर्शध्वनी अघोष-सघोष या दोन्ही प्रकारचे असले तरी, कंठद्वारीय स्पर्शध्वनींमध्ये मात्र कंपनयुक्तता नसल्यामुळे ते अघोष असतात. त्यांची निर्मिती कंठद्वारापाशी घोषवलिकांनी हवा किंचित काळ पूर्णत: अडवून व एकदम बाहेर टाकून केली जाते. कंपने निर्माण व्हावीत अशी स्थितीच त्या प्रयत्नात येत नाही. घोषवलिका आवळून निष्कंप स्थितीत असताना, त्यांच्यातील अंतर अगदी कमी ठेवल्यास कुजबुजीचे ध्वनी (whisper) निर्माण होतात. त्यावेळी अघोष ध्वनींचे नित्याप्रमाणे उच्चारण होते व सघोष ध्वनी केवळ हवेच्या दाबाच्या जोरावर, कंपनविरहीत उच्चारले जातात.

घोषवलिकांच्या हालचाली कमीअधिक प्रमाणात होतात, त्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनींमध्ये भिन्नता आढळते. अघोष व सघोष या भेदाचा ध्वनीच्या अन्य विशेषांशीही संबंध जाणवतो. त्यामुळे विविध भाषांमधील घोषत्व या विशेषाचा आविष्कार भिन्न आढळतो. काही भाषांमध्ये ते स्वतंत्र ध्वनी विशद करणारे स्वनिमिक तत्त्व म्हणून आढळते, तर काही भाषांमध्ये त्याची मर्यादित ध्वनींबाबतच दखल घेतली जाते. त्यामुळे, सर्व भाषांमध्ये हा भेद सारखाच महत्त्वाचा नसतो. उदा., तमिळ या द्राविड कुळातल्या भाषेमध्ये, सघोष व्यंजने शब्दारंभी येत नाहीत, तिथे अघोष व्यंजनेच असतात. लेखनातही सघोष ध्वनींसाठी स्वतंत्र चिन्हे नाहीत. मात्र स्वरांच्या सान्निध्यात त्यांचा उच्चार सघोष होतो. अर्थात, तेथे सघोष-अघोष उच्चारणे ही स्वनांतरे ठरतात. सघोष उच्चारणही सर्वत्र सारखे नसते. त्यातील सूक्ष्म फरक अभ्यासकांच्याच लक्षात येऊ शकतो.

घोषत्व या वैशिष्ट्याची दखल प्राचीन भारतीय भाषाभ्यासकांनीही घेतलेली आहे. पाणिनी यांनी घोष व अघोष ध्वनींमधल्या भेदाचे विवेचन केल्याचे आढळते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कंठद्वारातील हालचालींचे यंत्राद्वारे चित्रण आणि सूक्ष्म निरीक्षण शक्य झाले आहे. जगातील विविध भाषांमधल्या उच्चारणांची अचूक ध्वनिमुद्रणे उपलब्ध आहेत. तसेच विविध माध्यमांमध्ये उपयोजनाच्या शक्यताही वाढलेल्या आहेत. त्यामुळे आज या विषयाचा अभ्यास विविध दिशांनी विस्तारताना दिसतो.

पाहा: ध्वनिविचार, वर्णविचार, स्वरयंत्र

संदर्भ:

  • काळे, कल्याण, सोमण, अंजली (संपादक), ‘आधुनिक भाषाविज्ञान (संरचनावादी, सामान्य आणि सामाजिक)’, प्रतिमा प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती, २००३.
  • Trask, R.L., Key Concepts In Language And Linguistics, Routledge, 2005.
  • https://www.britannica.com/topic/speech-language, Accessed 8 April, 2026.

समीक्षक : रेणुका ओझरकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.