वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये होणारी अनियंत्रित वाढ आणि पैशांच्या मूल्याची वेगवान घसरण यांमुळे अर्थव्यवस्थेत जी परिस्थिती उद्भवते, त्यास अतिवेगवान चलनवाढ म्हणतात. देशात एखाद्या वस्तूचे जेवढे उत्पादन होईल, तेवढेच उत्पादन खरेदी केले जाते किंवा वापरात येत असते. जेव्हा विदेशातून एखाद्या वस्तूची आपल्या देशात आयात केली जाते, तेव्हा त्या वस्तूच्या आयात खर्चाएवढीच दुसरी वस्तू त्या देशाला निर्यात करावी लागते. तात्पर्य, उत्पादित केलेल्या एखाद्या वस्तूपेक्षा जास्त वस्तू वापरता येत नाही. जेव्हा एखाद्या वस्तूला तिच्या उत्पादनापेक्षा अधिक मागणी असते, तेव्हा चलनवाढ किंवा महागाईची सुरुवात होत असते.

चलनवाढीच्या वेगावरून चलनवाढीला वेगवेगळी नावे दिली आहेत. प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ फिलीप कॅगन यांनी १९५६ मध्ये प्रकाशित आपल्या मॉनेटरी डायनॅमिक ऑफ हायपरइनफ्लेसन या पुस्तकात सर्वप्रथम अतिवेगवान चलनवाढीची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, ʿज्यावेळी चलनवाढीचा वेग महिन्याला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असतो, त्यावेळी त्या चलनवाढीस ‘अतिवेगवान चलनवाढ’ असे संबोधतातʾ. त्यांची ही संकल्पना व्यापकपणे स्वीकारलेली आढळते. त्यानंतर प्रोफेसर हॅन्क आणि प्रोफेसर क्रूस यांनी जगातील ५६ अतिवेगवान चलनवाढीच्या नोंदी आपल्या ʿवर्ल्ड हायपरइनफ्लेशनʾ या २०१२ मधील अभ्यासात केलेली आहे. त्यात त्यांनी अतिवेगवान चलनवाढीच्या मासिक वेगावरून देशांची क्रमवारी केली असून चलनवाढीची कालमर्यादा, मासिक चलनवाढीचा वेग, दिवसागणिक चलनवाढीचा वेग व किमती दुप्पट होण्यासाठी लागणारा वेग हे प्रश्न मांडले आहेत.

अतिवेगवान चलनवाढ ही प्रामुख्याने ऑगस्ट १९२२ ते डिसेंबर १९२३ या कालावधीत जर्मनीचा पहिल्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर जास्त अभ्यासली जाऊन तेथे अस्तित्वात आली. पराभवानंतर जर्मनीला त्यावेळच्या अस्तित्वात असलेल्या परदेशी चलनात विजेत्या देशांना नुकसान भरपाई द्यावी लागली. ज्यावेळी चलन बाजारात जर्मन मार्क (जर्मनीचे चलन) परदेशी चलनासाठी मोठ्या प्रमाणात विकावे लागले, त्यावेळी ‘मार्क’चे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन होऊन अतिवेगवान चलनवाढीस सुरुवात झाली. त्या काळात किमती महिन्याला २९,५०० टक्याने म्हणजेच दिवसाला जवळजवळ २०.९ टक्याने वाढत होत्या आणि प्रत्येक ३.७ दिवसांमागे किमती दुप्पट होत होत्या.

दुसर्‍या महायुद्धानंतर आगस्ट १९४५ ते जुलै १९४६ च्या दरम्यान हंगेरीमध्येसुद्धा मोठ्याप्रमाणात अतिवेगवान चलनवाढ दिसून आली; कारण युद्धामुळे देशाची मोठी आर्थिक हानी झाली, तसेच मोठ्या प्रमाणात भरपाई द्यावी लागली होती. इतिहासात नोंद झालेली ही ‘अतिवेगवान चलनवाढ‘सर्वांत वाईट चलनवाढींपैकी एक होती. या कालावधीत हंगेरीमध्ये वस्तूंच्या किमती महिन्याला ४.१९x१०१६ म्हणजेच जवळजवळ  (४१९००००००००००००००) टक्याने, म्हणजेच दिवसाला २०७ टक्याने वाढत होत्या. याचाच अर्थ, प्रत्येक १५ तासाला किमती दुप्पट होत होत्या. त्यामुळे हंगेरी शासनाने पेंगो हे चलन रद्द करून फोरिंट हे नवीन चलन चलनात आणले.

अलीकडच्या काळात म्हणजे मार्च २००७ ते मध्ये नोव्हेंबर २००८ च्या दरम्यान ऱ्होडेशिया (झिंबाब्वे) मध्येही अतिवेगवान चलनवाढ पाहायला मिळाली. या काळात ऱ्होडेशियामध्ये वस्तूंच्या किमती महिन्याला ७.९६x१०१०% (७९००००००००) टक्याने, म्हणजेच दिवसाला जवळजवळ ९८ टक्यांनी वाढत होत्या. म्हणजेच ऱ्होडेशियामध्ये या काळात प्रत्येक २४.७ तासाला किमती दुप्पट होत होत्या.

युद्ध, गृहयुद्ध, राजकीय अशांती, केंद्रशासित अर्थव्यवस्थेचे बाजाराभिमुखीकरण इत्यादी कारणांमुळे एका बाजूला देशातील संसाधनांचा विनाश होतो, तर दुसर्‍या बाजूला सरकारी खर्चात प्रचंड वाढ होते. हा प्रचंड खर्च भागविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात पैशाची (कागदी चलनाची) निर्मिती करते. त्यामुळे वस्तूंच्या मागणीत प्रचंड वाढ होते. वस्तूंच्या उत्पादन व पुरवठ्यामध्ये, त्यांच्या मागणीच्या तुलनेत बाजारात तुटवडा निर्माण होतो; त्यामुळे मोठ्याप्रमाणात किंमतवाढीस सुरुवात होते.

देशातील राजकीय व आर्थिक अस्थिरतेमुळे वस्तूंच्या भविष्यातील उपलब्धतेसंदर्भात लोकांमध्ये अनिश्चितता वाढते. त्यामुळे लोक बाजारातील वस्तू मिळेल ती किंमत देऊन त्याचा साठा करण्यास सुरुवात करतात. त्यातूनच अतिवेगवान चलनवाढीस सुरुवात होते. म्हणजेच, सतत वाढणार्‍या वस्तूंच्या किमती व त्यांच्या भविष्यातील उपलब्धतेबद्दल लोकांमध्ये असणारी साशंकता या दोन गोष्टींमुळे लोक मिळेल ती किंमत देऊन वस्तूंचा साठा करू लागतात. यामुळे एक तर किंमतवाढ चालू राहते आणि दुसरे, किंमतवाढीमुळे देशातील चलनाचे मूल्य सतत खालावत जाते. हे नुकसान टाळण्यासाठी नागरिक पैसा मिळाला की, लगेचच त्या पैशांची वस्तू घेतात. त्यामुळे पैशाच्या अभिसरणाचा (व्होलॉसिटा ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी) वेग वाढून पैशांच्या पुरवठ्यात आणखीनच वाढ होऊन किमती अजून जोरात वाढू लागतात.

वस्तूंच्या वाढणार्‍या प्रत्येक किमतीबरोबर देशातील चलनाची किंमत त्याप्रमाणात कमी कमी होत जाते. यामुळे सतत वेगाने घसरणार्‍या चलनाच्या मूल्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वास उडतो आणि पैशांच्या वापराऐवजी ते थेट वस्तूंचीच देवाण-घेवाण (वस्तूविनिमय) सुरू करतात. दुसरे, ज्यावेळी देशाच्या चलनाचे वास्तव मूल्य वेगाने खालावत जाते, त्यावेळी बरेचशे श्रीमंत लोक विदेशी चलन मिळविण्याचा किंवा साठविण्याचा प्रयत्न करतात; कारण विदेशी चलनाचे मूल्य देशातील चलनाच्या मूल्यापेक्षा तुलनेने स्थिर असते; मात्र त्यामुळे आपल्या चलनाचे परकीय चलनबाजारात फारच अवमूल्यन होते.

अतिवेगवान चलनवाढीवर योग्य आर्थिक व वित्तीय सुधारणांद्वारे नियंत्रण आणता येते. अतिवेगवान चलनवाढीमुळे लोकांचा चलनावरील विश्वास उडत असल्यामुळे ते चलन स्वीकारण्यास तयार नसतात. असे होऊ नये यासाठी सरकारद्वारे लोकांचा चलनावरील विश्वास पुनर्स्थापित करणे गरजेचे असते. त्यासाठी नि:श्चलीकरण करून ‘नवीन चलनाची’ निर्मिती करायला पाहिजे. यामुळे (१) लोकांचा पैशावरील विश्वास वाढतो. (२) पैशांची वेगवान वाढ थांबविण्याची वचनबद्धता सरकारकडून अप्रत्यक्षरित्या मिळते. (३) अर्थसंकल्पात समतोल आणण्याची वचनबद्धताही सरकारकडून मिळते. (४) लोकांची सट्टेबाजी करण्याची प्रवृत्ती कमी होते.

संदर्भ :

  • Cagan, P., The Monetary Dynamics of Hyperinflation, Chicago University press, 1956.
  • https://www.cato.org/sites/cato.org/files/pubs/pdf/workingpaper-8.pdf
  • https://www.econlib.org/library/Enc/Hyperinflation.html

समीक्षक : संतोष दास्ताने


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.