अग्निजन्य प्रकारचा खडक. राजस्थानमधील सिरोही शहराजवळ तो आढळतो. त्याचे आणि सिरोही गाळाचे खडक हे दोन भिन्न प्रकारचे खडक स्पष्टपणे ओळखता येतात. सु. ९०० दशलक्ष वर्षांपूर्वी निओप्रोटिरोझोइक काळात ते निर्माण झाले. त्यावर सिरोही गटातील गाळाचे खडक सु. ८५० दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाले आणि ८२० दशलक्ष वर्षांपूर्वी ते विरूपित व रूपांतरित झाले. या ग्रॅनाइटच्या स्फटिकीकरणाचा काळ साधारणपणे ८९० ते ८६० दशलक्ष वर्षांपूर्वी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याच्या भौगोलिक विस्तारानुसार पूर्व एरिनपुरा आणि पश्चिम एरिनपुरा ग्रॅनाइट असे दोन प्रकार पडतात.

(१) पूर्व एरिनपुरा ग्रॅनाइट : यात नाइसोज प्रकारची पट्टेदार रचना खडकाच्या पृष्ठभागावर दिसून येते. हे खडक दक्षिण दिल्ली वलीपट्ट्याच्या (फोल्ड बेल्ट) समांतर दिशेत पसरलेले आहेत.
(२) पश्चिम एरिनपुरा ग्रॅनाइट : यात अग्निजन्य प्रकारची रचना दिसून येते. एरिनपुरा रापाकिवी ग्रॅनाइट हे जाडसर कणांपासून तयार झालेले (Coarse grained) खडक असून त्यात अल्कली फेल्डस्पारचे मोठे स्फटिक आढळतात. या शिवाय त्यात क्वार्टझ आणि प्लॅजिओक्लेज फेल्डस्पारदेखील आढळून येतात. अल्प प्रमाणात हॉर्नब्लेंड व बायोटाइटसारखी खनिजे असतात.
भू-रासायनिक स्वरूप : एरिनपुरा ग्रॅनाइट भू-रासायनिक दृष्ट्या एकसंध असून ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असणारे ‘एस’ टाईप ग्रॅनाइट या वर्गात मोडतात. हे खडक पुरातन आर्चियन कवचाचा काही भाग वितळण्यातून तयार झालेले आहेत असे मानले जाते. भूसंरचनिक दृष्टया हे खडक महत्त्वपूर्ण असून ते उत्तर-पश्चिम भारतातील निओप्रोटिरोझोइक मलानी अग्निजन्य खडक समूहातील (Malani Igneous Suite) सुरुवातीच्या काळात तयार झालेले आहेत. हे ग्रॅनाइट रोडीनिया या महाखंडाच्या विघटनाशी संबंधित ९०० ते ७०० दशलक्ष वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाचे भूगर्भीय साक्षीदार आहेत.
किरणोत्सारी घटक : एरिनपुरा ग्रॅनाइटमध्ये युरेनियम (U) सरासरी ४.७७ पीपीएम आणि थोरियम (Th) सरासरी ३३.५५ पीपीएम या प्रमाणात आढळतात; जे जगातील ग्रॅनाइटच्या सरासरी मूल्यांपेक्षा जास्त आहेत. थोडक्यात, एरिनपुरा ग्रॅनाइट हे राजस्थानच्या भूगर्भीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे खडक असून ते भारतीय द्वीपकल्पाच्या निओप्रोटिरोझोइक टेक्टोनिक उत्क्रांतीचे साक्षीदार आहेत.
संदर्भ : Origin and evolution of the Erinpura Granites, NW India: Evidence from geochemistry and Sr Nd isotopes- Devsamridhi Arora et al.- Lithos by Elsevier, Vol-532-533. समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
