म्यूलीस, कॅरी बँक्स (२८ डिसेंबर १९४४ ७ ऑगस्ट २०१९). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. पॉलिमरेज (बहुवारिकन विकर) शृंखला विक्रियेच्या (PCR; पीसीआर) शोधाबद्दल त्यांना १९९३ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जॉर्ज एलवुड स्मिथ यांच्यासह विभागून देण्यात आले. पीसीआर तंत्रामुळे अगदी कमी वेळात डीएनएच्या विशिष्ट क्रमाचे (तुकड्याचे किंवा भागाचे) अब्जावधी वेळा नक्कल प्रत तयार करता येणे शक्य झाले.
म्यूलीस यांचा जन्म अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायनाच्या लनोअर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ड्रेहर हायस्कूल येथे झाले. त्यांनी रसायनशास्त्रातील पदवी अटलांटा येथील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून प्राप्त केली (१९६६). त्यांनी बर्केले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात पीएच.डी. पदवी संपादन केली (१९७३). त्यानंतर त्यांनी शास्त्रविषयाला अलविदा करून दोन वर्षे बेकरीचा व्यवसाय केला. पुढे त्यांनी सिटस कॉर्पोरेशन या जैवतंत्रज्ञान कंपनीत नोकरीसुद्धा स्वीकारली (१९७९). पीसीआर तंत्रज्ञानाच्या संकल्पनेसाठी १०,००० डॉलर्सचा बोनस मिळाल्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली. अर्थातच पीसीआर तंत्रज्ञानाचे हक्क सिटस कंपनीकडे होते. तसेच ते हक्क पुढे कंपनीने नंतर ३०० दशलक्ष डॉलर्सना विकले. पुढे म्यूलीस यांनी सॅन डिएगो (कॅलिफोर्निया) येथील ‘झायट्रोनिक्स, इंक.’ (Xytronyx, Inc.) मध्ये रेणवीय जीवशास्त्र विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले; त्यानंतर त्यांनी स्वतंत्र सल्लागार म्हणून कामही केले (१९८६ – ८८).
म्यूलीस यांनी १९८३ मध्ये पीसीआर तंत्र विकसित केले. पीसीआर तंत्रात पुढीलप्रमाणे चार घटकांचा वापर करण्यात आला : १. रूपद डीएनए (टेम्पलेट डीएनए), ज्या डीएनएची नक्कल करावयाची आहे, तो दुहेरी धाग्यांचा भाग. २. ऑलिगोन्यूक्लिओटाइड चेतक (ऑलिगोन्यूक्लिओटाइड प्रायमर; एकेरी धाग्याचे डीएनएचे छोटे भाग असतात आणि त्यातील प्रत्येक भाग रूपद डीएनएच्या एका धाग्यावरील विशिष्ट लहान क्रमाशी पूरक असतो), ३. न्यूक्लिओटाइड्स (डीएनएची रचना करणारे रासायनिक घटक), ४. पॉलिमरेज विकर (मुक्त न्यूक्लिओटाइड्स यांना योग्य क्रमाने जोडून रूपद डीएनएची प्रत तयार करतात). या घटकांना उष्णता दिली जाते, त्यामुळे रूपद डीएनएचे दोन धागे वेगळे होतात. त्यानंतर हे मिश्रण थंड केले जाते, ज्यामुळे चेतक (प्रायमर) रूपद धाग्यांवरील पूरक जागांना जोडते. नंतर पॉलिमरेज विकर चेतकांच्या टोकाशी न्यूक्लिओटाइड्स जोडून रूपद धाग्यांची नक्कल प्रत तयार करण्यास सुरुवात करते आणि परिणामी दुहेरी धाग्यांच्या डीएनएचे रेणू तयार होतात. या तंत्राचा वापर वैद्यकीय निदानामध्ये, तसेच दात्र-पेशी पांडुरोग (सिकल सेल ॲनिमिया) आणि हंटिंग्टन कंप यांसारख्या जनुकीय विकारांसाठी रुग्णांची तपासणी करण्यासाठीही करण्यात येतो. प्राचीन प्रजातींच्या जीवाश्म अवशेषांच्या डीएनएच्या अभ्यासासाठी, तसेच गुन्हेगारीच्या ठिकाणी सापडलेल्या रक्त, वीर्य किंवा केसांच्या लडींच्या खुणांवरून गुन्हेगार किंवा पीडितांची ओळख पटवण्यासाठी न्यायवैद्यक-शास्त्रज्ञ या तंत्रज्ञानाचा वापर करतात. डीएनए क्रमनिर्धारणामध्येही हे तंत्र एक महत्त्वाचे साधन आहे.
म्यूलीस यांना नोबेल पारितोषिकाशिवाय विल्यम ॲलन पदक (१९९०), रॉबर्ट कॉख पारितोषिक (१९९२) व जपान पारितोषिक (१९९३) या पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘डान्सिंग नेकेड इन द माइंड फील्ड’ (१९९७) या नावाने लिहिले आहे.
म्यूलीस यांचे न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #पॉलीमरेज चेन रिॲक्शन
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/chemistry/1993/mullis/facts/
- https://www.the-scientist.com/news-opinion/kary-mullis–inventor-of-the-pcr-technique–dies-66256
- https://www.britannica.com/biography/Kary-Mullis
समीक्षक : रंजन गर्गे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
