व्हिटकर, रोम्युलस अर्ल : (२३ मे १९४३).

भारतीय उभयसृपशास्त्रज्ञ (Herpetologist) आणि वन्यजीव संवर्धक. सर्वजण त्यांना ‘रोम’ या नावाने ओळखतात. ते मद्रास स्नेक पार्क, द अंदमान ॲण्ड निकोबार इन‌्व्हायरन्मेंट ट्रस्ट (The Andaman and Nicobar Environment Trust; ANET) आणि मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्टचे (Madras Crocodile Bank Trust) संस्थापक आहेत.

व्हिटकर यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. न्यूयॉर्कमध्ये सोडून दिलेले आपले शिक्षण कोडईकानल येथील आंतरराष्ट्रीय स्कूल, तमिळनाडू येथे त्यांनी पुन्हा सुरू केले. पुढील शिक्षण वायोमिंग युनिव्हर्सिटी (Wyoming University), लॅरमी अमेरिका येथे केले. त्यानंतर त्यांनी यू.एस.सैन्यदलात प्रवेश करून जपानमध्ये वैद्यकीय विद्यार्थी म्हणून काम सुरू केले. १९६३ ते १९६५ पर्यंत मैमी सर्पालयात त्यांचे गुरू बिल हास्ट यांच्याबरोबर त्यांनी काम केले. मर्चंट नेव्हीच्या अल्पशा कारकीर्दीने त्यांना पुन्हा भारतात आणले. पॅसिफिक वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून वन्यजीव व्यवस्थापन या विषयाची बी.एस्सी. पदवी त्यांनी संपादन केली (१९८६). त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले असून ते सध्या तमिळनाडूतील चिंगलपुट शहरामध्ये राहतात. ते परवानाधारक रेडिओ ऑपरेटर आहेत.

सापांच्या व्यापारावरील बंदीमुळे इरूला जातीच्या आदिवासींवर बेरोजगारीची वेळ आली होती. हे लोक सापांना पकडण्यात पारंगत होते. व्हिटकर यांनी या लोकांचे पुनर्वसन केले, त्यांना सापाचे विष काढण्याच्या कामात सहभागी करून घेतले, या विषाचा वापर सर्पविषरोधी औषधे (Antivenom drugs) तयार करण्यासाठी झाला. घरीयाल (Gharial) या नामशेष होत असलेल्या मगरींच्या प्रजातीचे पुनरुत्पादन आणि संवर्धन करण्याच्या कामामध्ये ते मदत करतात. मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांच्या प्रदेशांचा समावेश करून निर्माण केलेली १६०० चौ.किमी. व्याप्ती असलेल्या राष्ट्रीय चंबळ उद्यान यात ते सहभागी होते. या राष्ट्रीय उद्यानात चंबळ नदीच्या पात्रामध्ये घरीयालांचे (Gharial) संगोपन व संवर्धन केले जाते. या प्रकल्पाचे व्हिटकर यांनी पुष्कळ वर्षे समर्थन केले. विनावेतन सन्माननीय सल्लागार म्हणून देशा-परदेशांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी काम केले.

व्हिटकर हे बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सल्लागार समिती आणि संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत. तसेच ते अमेरिकेतील द सोसायटी फॉर द स्टडी ऑफ अँफिबियन्स ॲण्ड रेपटाइल्स (The Society for the Study of Amphibians and Reptiles) चे समन्वयक, तर इरूला आदिवासी समाज कल्याणकारी समिती (Irula Tribal Women’s’ Welfare Society), विज्ञान आणि शिक्षण समिती नवी दिल्ली (Centre for Science and Education, New Delhi), पर्यावरण शिक्षण केंद्र अहमदाबाद (Centre for Environment Education, Ahmedabad) इत्यादींचे सभासद आहेत. त्यांनी १९९६ साली नॅशनल जिऑग्राफिक वाहिनीतर्फे द किंग अँड आय (The King and I) नावाचा वन्यजीव माहितीपट काढला. जागातील सर्वांत विषारी साप असलेल्या कोब्रा या सापच्या नैसर्गिक इतिहासरावर तो माहितीपट होता. त्यांच्या या माहितीपटाला १९९८ साली एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००५ साली निसर्ग संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय नेतृत्वासाठी त्यांना व्हिटले पुरस्कार (Whitley Award) देण्यात आले. पुरस्काराच्या रकमेमधून त्यांनी किंग कोब्राच्या संशोधनासाठी कर्नाटकात अगुंबे पर्जन्यवन संशोधन केंद्र स्थापन केले. भारतामधील पर्जन्यवनांच्या संशोधनाच्या केद्रांचे जाळे तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमासाठी त्यांची २००८ साली रोलेक्स ॲवार्ड फॉर एंटर्पप्राइजेसचे  (Rolex Award for enterprizes) सह-विजेते म्हणून निवड करण्यात आली.

संदर्भ :

समीक्षक – मोहन मद्वाण्णा

#भारतातील महत्त्वाच्या सर्प व मगरींचे संवर्धन,  #संशोधन आणि संग्रहालय.

प्रतिक्रिया व्यक्त करा