मोरार साहेब : (जन्म इ. स. १७५८ – मृत्यू इ. स. १८४९). रवीभाण संप्रदायाचे कवी. पूर्वाश्रमातील थराद (राजस्थान) येथील राजपुत्र मानसिंहजी वाघेला. रवीसाहेबांच्या वाणीने प्रभावित होऊन इ. स. १७७९ मध्ये ते त्यांचे शिष्य झाले. प्रेमलक्षणाभक्ती, आत्मबोध, ज्ञानबोध, वैराग्य-उपदेश, राम-कृष्ण-शिव महिमागान इ. विविध विषयांवरील १६५ पेक्षा आधिक पदांची रचना हे त्यांचे महत्त्वपूर्ण सर्जन. प्रचलित दृष्टांत, विविध अलंकारांचा विनियोग, वेगवेगळ्या रागातील सुगेय बांधणी अशा त्यांच्या पदातील सोरठी-गुजराती, हिंदी, अरबी-फार्सी शब्दांच्या मिश्रणाचा भाषापोत अतिशय अनोखा ,विलक्षण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. पदांव्यतिरिक्त प्रेमलक्षणा भक्ती महती सांगणारी बारमासी, दशाश्वरी छंदातील ४३ कडीची चिंतामणी, चोपाई आणि भुजंगातील २४ कडीची गुरूमहिमा  इ. त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत.

संदर्भ

  • मेघाणी, झवेरचंद (संपा), सोरठी संतवाणी, इ. स. १९४७.
  •  मोती, मंछाराम, रविभाण संप्रदायनी वाणी, संवत् १९८९.