कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेच्या अंतर्गत येणारे उपनिषद. हे उपनिषद काठकोपनिषद म्हणूनही ओळखले जाते. हे दशोपनिषदांमधील अतिशय महत्त्वाचे उपनिषद मानले जात असून मुक्तिकोपनिषदामध्ये निर्दिष्ट केलेल्या १०८ उपनिषदांमध्ये हे तृतीय क्रमांकाचे म्हणून गौरविले आहे. हे उपनिषद आशयगर्भ आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने संपन्न आहे. वैशंपायन हे कृष्ण यजुर्वेदाचे आद्य प्रवर्तक ऋषी. त्यांच्या प्रमुख आणि कर्तृत्ववान शिष्यांपैकी एक कठऋषी मानले जातात. त्यांच्या नावानेच प्रस्तुत उपनिषद ओळखले जाते.

कठोपनिषदाची भाषा अतिशय सुबोध, सरळ आणि रसाळ आहे. नचिकेताच्या कथेच्या अनुषंगाने, यम-नचिकेत संवादाच्या आधारे ब्रह्मविद्येचे वैशिष्ट्यपूर्ण विवेचन या उपनिषदामध्ये आले आहे. आचार्य वाजश्रवस (उद्दालक) म्हणजे नचिकेत्याचा पिता हा कर्मकाण्डात्मक धर्माचा प्रतिनिधी, तर नचिकेतस् हा तत्त्वज्ञानात्मक जिज्ञासेचा प्रतिनिधी होता. नचिकेतस् या नावाचा अर्थ ‘जो जाणत नाही तो’ असा होतो (न+कित्). ‘मी हे जाणत नाही’ या अज्ञानाची ज्याला जाणीव होते, त्याच्याच मनामध्ये ज्ञानविषयक जिज्ञासा उत्पन्न होते.

नचिकेताविषयीच्या कथेनुसार यमाने दिलेल्या तीन वरांपैकी एका वराद्वारे नचिकेत्याने यमाकडून ब्रह्मविद्या आणि योगविधी प्राप्त करून घेतले. तिसर्‍या वराने मृत्यूनंतरचे ज्ञान मागितले. यमाने वेगवेगळ्या मार्गांनी मृत्यूनंतरचे ज्ञान मिळविण्यापासून नचिकेत्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा निर्धार पाहून अखेरीस हे गूढरम्य तत्त्वज्ञान यमाने त्याला समजाविले.

या उपनिषदामध्ये श्रेयस आणि प्रेयस यांतील फरक स्पष्ट केला आहे. श्रेयस म्हणजे शाश्वत कल्याण, नित्य पारमार्थिक आत्मज्ञान, तर प्रेयस म्हणजे इंद्रियांना प्रिय असे ऐहिक, अनित्य गोष्टींपासून मिळणारे सुख, क्षणिक असे कल्याण होय.

जीवात्मा आणि परमात्मा यांच्या स्वरूपाविषयीही या उपनिषदामध्ये विवेचन आले आहे. अविनाशी, सर्वश्रेष्ठ , सर्व भूतमात्रा आणि वस्तुमात्रांचे आश्रयस्थान असलेल्या अशा ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान झाले असता ब्रह्मलोकी स्थान प्राप्त होते. हे ब्रह्मतत्त्व म्हणजेच सूक्ष्मतम आणि महत्तम असा आत्मा, प्राणिमात्रांच्या हृदयाकाशामध्ये निवास करतो. या आत्म्याचे वर्णन करताना आत्मा हा इंद्रिये, मन आणि बुद्धी यांपेक्षा श्रेष्ठ आहे, असा उल्लेख या उपनिषदात आढळतो.

भगवद्गीतेमधील प्रसिध्द रथरूपकाचे मूळही कठोपनिषदामध्ये आहे. शरीर म्हणजे रथ, जीवात्माहारथी, परमात्माप्राप्ती हे ध्येय, इंद्रिये हे रथाला जोडलेले अश्व, बुद्धी म्हणजे सारथी,  तर मन म्हणजे लगाम. आयुष्याच्या प्रवासामध्ये लगामाच्या साहाय्याने घोड्यांना ताब्यात ठेवून धन्याला इष्ट स्थळी पोचविण्याची हुशार सारथ्याची भूमिका बुद्धी बजाविते, असे या उपनिषदात वर्णन आहे.

शरीरामध्ये असूनही शरीररहित, सर्वव्यापी अशा या आत्म्याचे ज्ञान झाले असता ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. केवळ कुणी सांगितल्याने, बुद्धीने किंवा पुष्कळ विचाराने आत्म्याचे ज्ञान होऊ शकत नाही, तर स्वतः आत्माच स्वतःविषयीचे ज्ञान प्रकट करतो. त्यासाठी केवळ आत्म्याचे चिंतन करणे आवश्यक आहे, असा आत्मज्ञानाचा मार्ग कठोपानिषदात सांगितला आहे.

त्यासाठी आपल्या इंद्रियांवर विजय, नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. केवळ सूक्ष्म विचार करणा‍र्‍यांना ते साध्य होते. श्रेष्ठ आचार्यांकडे जाऊन ही क्षमता प्राप्त करता येते. पण हा मार्ग वस्त‍र्‍याच्या तीक्ष्ण धारेप्रमाणे असतो. पंचज्ञानेंद्रिये, अंत:करण आणि बुद्धी यांच्यासह आत्म्याच्या अर्थात ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होणे, म्हणजे योग होय. सर्व इच्छांचा त्याग केल्यानंतर, सर्व विद्याग्रंथी स्फुरल्यानंतर, संशय नाश पावल्यानंतर साधकला अमरत्व प्राप्त होते.

शुद्ध चैतन्य ब्रह्मरूपी मूळ असलेल्या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकातून संसाराचे वर्णन कठोपनिषदामध्ये केले आहे. ज्यामधून प्राण गेला असता मनुष्य अमरत्व प्राप्त करतो, त्या सुषुम्ना नाडीचे महत्त्व, अंगुष्ठमात्र पुरुषाचा-आत्म्याचा हृदयातील शाश्वत निवास हे कठोपनिषदामध्ये चर्चिले गेलेले तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आहेत.

संदर्भ :

  • Ranade, R. D. A Constructive Survey of UpanishadicPhilosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
  • दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापुर, २०१५.
  • सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.

समीक्षक – भाग्यलता पाटस्कर

This Post Has One Comment

Suyog muli साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.