कृष्ण यजुर्वेदाच्या श्वेताश्वतर शाखेचे हे उपनिषद शैव आणि योगमताचा पुरस्कार करण्यासाठीच रचल्यासारखे वाटते. गुरुदेव रानडे यांच्या मते सांख्य आणि वेदान्त ही दोन दर्शने पूर्ण वेगळी झालेली नसताना रचले गेलेले हे उपनिषद असावे, असे दिसते.
सहा अध्यायांच्या या उपनिषदाच्या प्रथम अध्यायामध्ये आत्मवादाचाही समावेश असलेल्या समकालीन तत्त्वज्ञानाच्या शाखांवर तर्कशुद्ध अशी टीका दिसते. या अध्यायाचे महत्त्वाचे उद्दिष्ट शैव मताचे श्रेष्ठत्व प्रतिपादित करणॆ हे आहे. योगदर्शन, सांख्यदर्शन आणि शैवमत यांचा सर्वाधिक प्रभाव प्रस्तुत उपनिषदावर आहे. परमात्मा त्रिकालाबाधित असून तोच विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे. आपल्या चमत्कारिक अशा शक्तीने तो अखिल विश्वातील भूतमात्रांचे नियमन करतो. या उपनिषदात ज्ञानमार्गाबरोबरच भक्तिमार्गाचा प्रथम उल्लेख येतो. ही भक्ती शिवाची आहे. शिवाय योगविद्येचाही उपदेश यामध्ये केलेला दिसतो. ज्याची परमेश्वरावर आणि त्याचप्रमाणॆ गुरूच्या ठिकाणी भक्ती आहे, अशा महात्मा पुरुषाच्या हृदयातच हे (ईश्वरविषयक) रहस्यमय अर्थ प्रकाशित होतात. या उपनिषदात माया म्हणजे प्रकृती व मायी म्हणजे परमेश्वर, असे म्हटले आहे. द्वैतवादास आधारभूत असलेली काही वाक्ये यामध्ये सापडतात. भोक्ता, भोग्य व प्रेरक असे हे ब्रह्म त्रिविध असल्याचेही यात म्हटले आहे.
परमात्मा आणि जीवात्मा यांच्यातील द्वैत दाखवणारा, मुण्डकोपनिषदामध्ये दिसणारा प्रसिद्ध मंत्र याही उपनिषदामध्ये दिसतो. शरीररूपी वृक्षावर असलेला पुरुषरूपी पक्षी कर्मानुसार आलेली फळे चाखतो व दुःख भोगतो; पण मुक्त झालेल्या दुसर्याला जेव्हा पाहतो, तेव्हा शोकमुक्त होऊन आत्मस्वरूप प्राप्त करतो. त्यातील ईश्वर हा अद्वितीय परमात्मा सर्व देहांमध्ये गूढ आहे. तो सर्वव्यापी, सर्वांचा अंतरात्मा, सर्व कर्मांचा अध्यक्ष,सर्व भूतांचा आश्रय, साक्षी, निर्गुण, शुद्ध व चिद्रूप आहे. अशा परमात्म्याचा अनुभव घेणारे शाश्वत सुख प्राप्त करून घेतात. या ज्ञानाने अक्षय अशी शक्ती प्राप्त होते.
संदर्भ :
- Ranade, R. D. A Constructive Survey of Upanishadic Philosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
- दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापुर, २०१५.
- बापटशास्त्री, विष्णु वा. सुबोध उपनिषत्संग्रह (भाग दुसरा), डोंबिवली, २००७.
- सिद्धेश्वरशास्त्री, चित्राव, उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.
- http://vedicheritage.gov.in/upanishads/ shwetashwataropanishad/
समीक्षक – भाग्यलता पाटस्कर