तेजोबिंदू उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदांतर्गत येणारे उपनिषद् असून तेजोबिंदूवर केलेले ध्यान, सच्चिदानंदरूप परमतत्त्व, विदेहमुक्तीचा साक्षात्कार इत्यादी मुद्यांची चर्चा याच्या सहा अध्यायांमधून ४६३ पद्यांतून केलेली दिसून येते. हे उपनिषद् अद्वैत वेदांत दर्शनाला अनुसरते. साधकाला अखंड एकरस ब्रह्मभावाची प्राप्ती करवून देणे हे या उपनिषदाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये कार्त्तिकेय आणि शिव, निदाघ आणि ऋभु यांच्या संवादांच्या माध्यमातून वरील विविध मुद्यांचे विवेचन आले आहे.

पहिल्या अध्यायाचा प्रारंभ तेजोबिंदूच्या वर्णनाने होतो. तेजोबिंदू ही संज्ञा या उपनिषदात निर्गुण निराकार ब्रह्म/आत्मा या अर्थाने आली आहे. विश्वाचा आत्मा असलेला, हृदयात स्थित असा हा तेजोबिंदू अणूच्या आकाराचा आहे. तो शंकराशी संबद्ध व शांत, सूक्ष्म आणि स्थूल असून या दोहोंच्या पलीकडेही आहे. मुनी आणि बुद्धिमान व्यक्तींसाठी एकमेव ध्यानविषय असलेला हा तेजोबिंदू दुष्प्राप्य (दुर्लभ), अव्यय (क्षीण न होणारा) आणि असाध्य असा आहे, असे वर्णन यात येते. त्यानंतर हंस या मुनिविशेषाची लक्षणे दिली आहेत. त्यापुढे विष्णूच्या परमपदाचे अर्थात परब्रह्माचे वर्णन केले आहे. याच अध्यायात योगांगांचीही सविस्तर चर्चा येते.

दुसऱ्या अध्यायात कुमार कार्त्तिकेयाने व्यक्त केलेले अखंड एकरस चिन्मात्राचे स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आणि शिवाने केलेले त्यावरील विवेचन आले आहे. जगत्, जीव आणि आत्मतत्त्व, मंत्र, शास्त्र, वेद, व्रत, क्रिया, ज्ञान, जल, भूमी, आकाश, ब्रह्म, ब्रह्मा, हरी, रुद्र, शिव, गुरू, देह, मन, चित्त, सुख, माता, पिता, भ्राता, पती, शिर, गोत्र, घर, चंद्रमा, तारांगण, सूर्य, क्षेत्र व पृथ्वी अशा अनेक पदार्थांचा उल्लेख करून शिव सांगतात की, हे सर्व सूक्ष्म किंवा स्थूल पदार्थ अखंड एकरस चिन्मात्रापासून भिन्न नाहीत. चित् म्हणजे चैतन्य आणि चिन्मात्र म्हणजे केवळ चैतन्यस्वरूप ब्रह्म. हे सत्य जाणणाऱ्याला मुक्ती मिळते.

तिसऱ्या अध्यायात कुमार कार्त्तिकेयाच्या विनंतीवरून शिवाने स्वत:चे परब्रह्मस्वरूप विशद करून सांगितले आहे. ‘अहं ब्रह्मास्मि|’ या मंत्राचे माहात्म्य सांगत शिवाने इतरसर्व मंत्र सोडून या मंत्राचा जप केल्यास साधकाला नि:संशय मोक्षप्राप्ती होते असे प्रतिपादन केले आहे.

चवथ्या अध्यायात कुमाराने जीवन्मुक्त आणि विदेहमुक्त यांच्याबद्दल विचारणा केली आहे. ‘जो मी स्वत: परमात्मस्वरूप निर्गुण परात्पर आहे असे जाणून आत्मस्वरूपात स्थिर राहतो तो जीवन्मुक्त’ आणि ‘जो नित्य ब्रह्ममय असतो, षड्रिपूंच्या आणि सांसारिक चेष्टांच्या पलीकडे गेलेला असतो, तो विदेहमुक्त’ अशी या दोघांची लक्षणे शिवाने दिली आहेत. पुढे विदेहमुक्तीविषयी विस्तृत विवेचन आले आहे.

पाचव्या अध्यायात ऋभु आणि निदाघ यांच्या संवादामधून आत्मतत्त्व आणि अनात्मतत्त्व यांचे विवेचन येते. ज्याला काही कारण नाही आणि ज्याचे काही कार्य नाही; जे तेजोरूप, आनंदमय आहे ते आत्मतत्त्व आहे. वास्तविक अनात्म असे काही या विश्वात नाहीच, परंतु आत्मतत्त्वाचे वर्णन करताना ते व्यावहारिक पातळीवर ज्यापासून भिन्न आहे त्याला उद्देशून अनात्मतत्त्व ही संज्ञा योजली आहे. सर्व मूर्त आणि अमूर्त गोष्टी कल्पनेचा विलास असून संपूर्ण जग, दु:ख, वृद्धावस्था, संकल्प, जीव, चित्त, अहंकार, पंचमहाभूते, बारा आदित्य यांच्यापासून मन भिन्न नाही असे ऋभु सांगतात.

सहाव्या अध्यायात याच विषयाला पुढे नेत या विश्वातील प्रत्येक गोष्ट केवळ सच्चिदानंदरूप ब्रह्म आहे, क्रियांचे भेद, त्यांच्या कर्त्यांचे भेद, गुणभेद, लिंगभेद, देशभेद, कालभेद, पाच कोश, पाच देवता, सहा विकार, सहा ऋतू हे सगळे भेद काल्पनिक आहेत असे प्रतिपादन ऋभु करतात.

ग्रंथाच्या शेवटी ‘हे ज्ञान साक्षात् शिवाकडून आचार्य शंकरांना मिळाले आणि त्यामुळे ते अत्यंत गोपनीय आहे आणि केवळ गुरूभक्त शिष्यांना ते जाणून घेण्याचा अधिकार आहे. गुरूने योग्य पारख करून आस्तिक वृत्तीच्या, कृतज्ञ आणि सत्शील असलेल्या भक्तांना हे ज्ञान द्यावे’ असे सांगून ग्रंथकार या उपनिषदाचा उपसंहार करतात.

प्रस्तुत उपनिषद्काराने पातंजल योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगांमध्ये त्याग, देशकालानुसार पाळलेले मौन, मूलबंध, देहसाम्य, स्थितीचे नैरंतर्य आणि आत्मध्यान या आणखी काही योगांगांचा समावेश केला आहे. म्हणून योग तत्त्वज्ञानात या उपनिषदाला महत्त्वाचे स्थान दिले जाते.

पहा : यजुर्वेद.

संदर्भ :

• परमहंस स्वामी अनन्त भारती, योग उपनिषद् संग्रह (योग प्रभाकरभाष्य), प्रथम भाग, चौखम्भा ओरीयन्टालिया, दिल्ली, २०१५.

   समीक्षक : कला आचार्य