नरम पोलादात (Mild steel) १ ते २.५ वजनी टक्के इतक्या प्रमाणात तांबे, फॉस्फरस, क्रोमियम आणि सिलिकॉन मिसळल्यास (Alloying) वातावरणी अपक्षयी पोलाद (Weathering steel) तयार होते. या पोलादाचे शरण सामर्थ्य (Yield strength) नरम पोलादापेक्षा जास्त असते. सामान्य नरम पोलाद पाणी आणि हवा यांच्या संपर्कात आल्यास लेपिडोक्रोसाईट(Lepidocrocite) प्रकारचे ऑक्सिहायड्रॉक्साइडे तयार होतात. बहुरुपी परिवर्तनामुळे (Allotropical transformation) गंजणे किवां संक्षरणा (Wet corrosion) सुरूवातीस तयार होणारे लेपिडोक्रोसाइटचे रुपांतर गोथाइटमध्ये होते. नरम पोलादावरील ऑक्सिहायड्रॉक्साइडच्या आवरणमध्ये सातत्य नसल्यामुळे किंवा त्यात भेगा असल्यामुळे गंजाची अभिक्रिया होत राहते. वातावरणी अपक्षयी पोलादामध्ये मात्र तांबे, फॉस्फरस, क्रोमियम आणि सिलिकॉनचा समावेश असल्यामुळे ऑक्सिहायड्रॉक्साइडचे अखंडित आवरण तयार होवून गंजाची अभिक्रिया बंद पडते.

ऑक्सिहायड्रॉक्साइडचे अखंडित आवरण तयार होण्यास १८ महिने ते ३ वर्षे इतका कालावधी लागू शकतो. हे पोलाद नरम पोलादापेक्षा ७५ % जास्त गंज प्रतिबंधक असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारच्या आवरणची (Painting) गरज भासत नाही. परिणामी रंगातील घातक पदार्थांमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळता येते. १९३३ साली अमेरिकेत या प्रकारच्या पोलादाचा (USS Cor-Ten) वापर रेल्वेकरिता करण्यात आला. आर्थिक दृष्ट्याही वातावरणी अपक्षयी पोलाद फायदेशीर आहे. या प्रकारच्या पोलादाचा उपयोग करून तयार केलेल्या सांगाड्याची किमत परंपरागत पोलादाच्या सांगाड्यापेक्षा २ ते १० % पर्यन्त  कमी असते. सध्या या प्रकारच्या पोलादाचा वापर पूल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. पण अशा पोलादाच्या उपयोगा करिता हवेतील क्लोराइडचे प्रमाण ०.०५ मिग्रॅ. पेक्षा/दिवस पेक्षा जास्त असू नये. याशिवाय समुद्रकिनारी आणि ज्या ठिकाणी वातावरणातील आद्रतेचे प्रमाण जास्त आहे (> ६०%) अशा प्रदेशात वातावरणी अपक्षयी पोलाद वापरता येत नाही.

 

संदर्भ :

  • Saha, Jayanta Kumar. Corrosion of constructional steels in marine and industrial environment, Springer India, New Delhi-  2013.
  • Balasubramaniyam R., Delhi Iron Pillar – New Insights, Indian Institute of Advanced Study, Shimla and Aryan Books International, New Delhi, 2002.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा