पूर्व विदर्भाच्या झाडीबोली भागातील लोकरंजनाचा प्रकार . ‘गाथासप्तशतीया ग्रंथात ‘खडीगंमत’ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करुन पुरुष लुगडी नेसून फाल्गुन मासात जनरंजन करीत असत, असा उल्लेख ‘गाथासप्तशती‘त आहे. खडा तमाशा ,संगीत खडा तमाशा किंवा राष्ट्रीय खडा तमाशा या व्यावसायिक नावांनी हा रंजनप्रकार अलीकडे ओळखला जातो. विदर्भात सातशे वर्षांपासून लोकरंजनाचे कार्य या लोकनाट्याद्वारा केले जात आहे . दंडार हे विदर्भातील एक लोकनाट्य. या लोकनाट्यातूनच खडी गंमत हा लोकनाट्यप्रकार उदयास आला असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. दंडारीत नाचणारी सात-आठ मुले आणि विविध सोंगे घेणारे कलावंत यामुळे दंडारीत लोककलावंतांची संख्या वाढत असे. या संख्या विस्तारामुळे सात ते आठ कलावंतांनीच सादरीकरण करावे या हेतूतून खडी गंमत उदयास आल्याचे सर्वसंमत मत आहे.

खडीगंमत सादर करणारे मुख्यपात्र जे असते त्यास गमत्या असे म्हणतात. ‘गमत्या’ म्हणजे ‘गमज्या’ मारणारा. ‘गमज्या’ म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण बडबड करणारा. खडी गंमत यशस्वी करावयाची सारी भिस्त त्याच्यावरच असते. दुसरे महत्वाचे पात्र म्हणजे शाहीर हे होय. त्यानंतरचा क्रमांक अर्थातच नाच्याचा लागतो. नाच्या हा पुरुषच असतो. दंडारीप्रमाणेंच खडीगंमत या लोकरंजनप्रकारातही स्त्रियांचा सहभाग नाही. एखादा गोंडस तरुण मुलगा नाच्याचे काम करतो. छान चकचकीत साडी नेसून आणि चेहरा रंगवून तो सजतो. या लोककलाप्रकारात नाच्या हे एकमेव पात्र रंगभूषा व वेशभूषा केलेले असते. अन्य व्यक्ती आपल्या साध्याच पोषाखात असतात. कधीकधी एकाऐवजी दोन नाचे ठेवले जातात. या शिवाय ढोलक वाजविणारा ढोलक्या, चोनके वाजविणारा चोनक्या आणि टाळ वाजविणारा टाळकरी हे झिलकरी असतात. शाहिराला साथ देणारा व री ओढणारा अन्य एक सहकारी असतो. तशी पात्रांच्या बाबतीत खडीमंगत अल्पव्ययाचे तत्त्व पाळताना दिसते. आताशा त्यांच्यात क्लॅरोनेटचा समावेश करण्यात येतो. तरी रंगमंचावरील संख्या आठ-नऊच्यावर जात नाही.

दंडारीप्रमाणे खडी गंमत ही गण गाऊन सुरु होते. याप्रसंगी नाचाला परवानगी नसते. गण ही गणपतीची स्तुती असली तरी त्याच्यात शंकर, पार्वती, कार्तिकेय आदींचा उल्लेख असतो. गण संपताच गौळण सादर केली जाते. यात नाचाला  चांगलाच वाव असतो. नाचाच्या  विविध विभ्रमातून प्रेक्षकांना आकर्षित केले जाते. मथुरेला जाणाऱ्या  गौळणी आणि पेंद्या व आपल्या सवंगड्यासह त्यांना अडविणारा श्रीकृष्ण खडीगंमतच्या गवळणीमध्ये सादर होतात. गोंधळ ,तमाशा या अन्य लोकनाट्याप्रमाणे खडीगंमतही गवळण सादर करुन आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवीत असते. गवळण गाताना राधेने कृष्णावर रुसणे हे आलेच. याकरिता खडी गंमत रुसवा हा स्वतंत्र रचनाप्रकार वापरते, तर कृष्णाला शेवटी शरणागती पत्करताना गौळण सरण हा रचनाप्रकार वापरते. गवळणीचा शेवट सरण किंवा ‘शरण’ या वेगळ्या पद्य प्रकाराने होतो. रस्ता अडविणाऱ्या श्रीकृष्णाला अथवा त्याच्या सवंगड्यांना गोपिकांनी केलेली विनवणी म्हणजे ‘सरण’. गवळण गातांना ‘रुसवा’ हा एक अन्य रचनाप्रकार आढळून येतो. आपल्या नवऱ्याशी  किंवा खोडी काढणाऱ्या कृष्णाशी गोपिकेने धरलेला अबोला म्हणजे ‘रुसवा’ हे स्वतंत्र नाव देण्याचा पायंडा केवळ खडी गंमत लोकनाट्याने पाडलेला दिसून येतो.

https://youtu.be/INQTCo8fsYk

पूर्वरंगात गण व गवळण यांचा समावेश होतो. उत्तररंगात छिटा व दोहा, धुमाळी व पोवाडा यांचा समावेश होतो. भरतवाक्याने खडी गंमतीचा उत्तररंग रंगतो. त्यामुळे खडीगंमत पाहण्यास आलेला प्रेक्षक उत्तररंगाचीच वाट पाहत असतो. खडीगंमत अधिक आकर्षक होत असतांना कलगी व तुरा या दोन घटाण्याच्या द्वंद्वात्मक कार्यक्रमांमुळे मास दुय्यम असा झाडी शब्द खडीगंमत वापरते. यात सवाल-जवाब प्रामुख्याने असतात. शिवाय छिटा हा स्वतंत्र प्रकार वापरला जातो. चार ओळीचा ‘दोहा’ यास फार महत्त्व असते. ‘जवाबी दोहा’ हा त्याचाच एक प्रकार असतो. झगडा हा अन्य रचना प्रकार ऐकायला मिळतो. जवाबी झगडा ‘जोड झगडा’ हे त्याचे अन्य प्रकार असतात. खडी गंमत गद्याला अत्यल्प स्थान देते. कडव्याच्या एका लावणीत प्रश्न असतो दुसरी उत्तराची लावणी तेवढ्याच विस्ताराने गायली जाते. तर कधी एकत्र उत्तर सादर केले जाते. खडी मंगत गद्याला अत्यल्प स्थान देते. या लोकरंजन प्रकारात गायनालाच विशेष महत्व आहे. ‘धुमाळी व पोवाडा’ हे दोन अन्य रचनाप्रकार खडीगंमत वापरत असते. यातील धुमाळी हा शब्द परंपरागत संगीतातील असला तरी झोपेंची डुलकी येत असलेल्या आपल्या मायबाप प्रेक्षकाला खडबडून जागे करण्याचे सत्कार्य ही धुमाळी इमानेइतबारे करीत असते. कोणतीही महत्वाची लावणी सादर करण्यापूर्वी शाहीर आपल्या अत्युच्च् स्वरात धुमाळीचा सूर लावतो. तिचा वेग हळूहळू वाढत जातो आणि समोरचा प्रेक्षक ताजातवाणा होऊन बसतो. पोवाडा हा प्रकार जसा दंडार स्वीकारते तसाच खडीगंमत देखील त्याला आपला मानते. परंपरागत वीरसपूर्ण अशा गीतप्रकारापेक्षा हा पोवाडा भिन्न असतो. तास-दोनतास चालणारे वर्णनपर असे ते  दीर्घकाव्य् असते. सत्यवान-सावित्री, चिलिया बाळ, भक्तधृव, अभिमन्यूवध अशा पौराणिक कथानकांपासून तर टिळकांचा पोवाडा, गांधीवधाचा पोवाडा अशा विषयांवरही या ग्रामीण कलावंतांनी पोवाडे रचले आहेत. देवदेवतांचे आणि गुरूंचे स्मरण करून रात्री उशिरा भारतवाक्य गाऊन  खडीगंमत संपते. विदर्भातील  या लोकप्रिय रंजनप्रकाराचा समारोप सूर्याच्या प्रार्थनेने होतो .

‘तमाशा ‘ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. विदर्भातील बुलढाण्यापासून गोंदियापर्यंत खडीगंमत सादर केली जाते. घरोघरी फिरणारी खडीगंमत ही दंडार नावाने ओळखली जाते. खडीगंमत आणि दंडार या विदर्भातील लोककला प्रकारांवर हरिश्चंद्र बोरकर आणि हिरामण लांजे यांनी संशोधन केलेले आहे. खडीगंमत सादर करणाऱ्या कलावंतांना विदर्भात शाहीर म्हणूनच संबोधले जाते. खडीगंमत ही पुरुषप्रधान लोककला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा