अमरावती, आंध्र प्रदेश येथील गौतमीपुत्र सातकर्णीचा पुतळा

गौतमीपुत्र सातकर्णी : (कार. इ.स. ६२—८६). सातवाहन वंशातील एक बलाढ्य आणि थोर राजा. त्याला गौतमीपुत्र शतकर्णी असेही म्हटले जाते. सम्राट अशोकानंतर मगध साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि मौर्य घराणे भारताच्या राज्यकारभारातून पडद्याआड झाले. मौर्य घराण्यानंतर शुंग आणि कण्व घराण्यांकडे मगध साम्राज्याची धुरा आली. परंतु तोपर्यंत मगध साम्राज्य आकसले होते आणि परकीयांची सत्ता भारताच्या पश्चिम भागांत स्थिर होऊ लागली होती. आंध्र प्रदेशात सातवाहन राज्य उदयास आले होते. त्याचा विस्तार हळूहळू भारताच्या पश्चिम समुद्रतटापर्यंत थडकला होता. परंतु त्या वेळी शक राजा (व्यवस्थापक) रुद्रदमन याने सातवाहन राजांचा पराभव करून दक्षिण भारताचा मध्य भाग आणि पश्चिम किनारपट्टी ताब्यात घेतली. या पार्श्वभूमीवर गौतमीपुत्र सातकर्णी याचा कार्यकाळ आणि पराक्रम महत्त्वाचा ठरतो.

सातकर्णी सातवाहनांचा राजा झाला तेव्हा फक्त आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग त्याच्या राज्यांत समाविष्ट होता. सातकर्णीने शक राजांचा पराभव करून नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेश काबीज केला. भारताच्या पश्चिम भागातल्या कच्छपासून पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी दरम्यानचा संपूर्ण प्रदेश त्याने जिंकून घेतला. शक, पल्लव आणि ग्रीक (यावन) यांच्यावर विजय मिळवून त्याने दक्षिण भारत निःक्षत्रिय केला असे इतिहासकार मानतात.

सातकर्णीने उच्चवर्णियांना आधार दिला आणि चातुर्वर्ण्य पद्धत आपल्या राज्यात परत स्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत देशांतर्गत तसेच देशाबाहेर भूमार्गे आणि समुद्रमार्गे व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. दक्षिणेत शांतता पसरल्यामुळे व्यापारी आणि कारागीर यांना प्रोत्साहन मिळाले आणि समाज संपन्न झाला. त्यातून कला आणि संस्कृती यांची निर्मिती झाली. शतकर्णी हा धर्म सहिष्णू असल्यामुळे सर्वधर्मभावाची जोपासना झाली. तो विद्वानांचा आश्रयदाता आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखला जातो. त्याच्या कारकिर्दीत समाजव्यवस्था पुनर्गठित झाली असे मानले जाते.

संदर्भ :

  • Thaper, Romila, History of India, Vol.1, New Delhi, 1966.
  • कदम, य. ना. समग्र भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००३.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा