चंद्रगुप्त, पहिला : (कार. इ.स. ३१८ ‒ ३३५). गुप्त साम्राज्याच्या भक्कम पायाचा रचयिता म्हणून पहिला चंद्रगुप्त ओळखला जातो. कुशाण राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात अर्जुनयान, मालव, यैधेय, शिबी, कुणींद, कुलूत आणि औदुंबर अशी गणराज्ये तसेच कौसंबी, नाग, वाकाटक आणि अहिच्छत्र इत्यादी गणराज्ये अस्तित्वात आली. सन २९५ मध्ये ‘महाराज’ श्रीगुप्त याने एका छोट्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. पाच वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीनंतर त्याचा मुलगा चंद्रगुप्त गादीवर आला. त्याने मगधाचा बराच प्रदेश आणि साकेत ही राज्ये काबीज करून गंगा नदीच्या खोऱ्यातील संपूर्ण प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. लिच्छवी गणराज्याच्या कुमारदेवी या राजकन्येबरोबर त्याचा विवाह झाल्यामुळे चंद्रगुप्ताला राज्यविस्तारात लिच्छवी राज्याची मदत झाली. त्यापुढे त्याने औध, बिहार, कोसल आणि प्रयागचा परिसर आपल्या राज्यात सम्मिलित केला. मौर्य साम्राज्यानंतर गंगा-यमुना नद्यांच्या खोऱ्यात आणि नेपाळच्या सीमेपर्यंत चंद्रगुप्ताचे साम्राज्य पसरले होते. परंतु पाटलिपुत्र ही मगध राजधानी तो आपल्या आधिपत्याखाली आणू शकला नाही. २० फेब्रुवारी ३२० पासून त्याने नवीन वर्षगणना सुरू केली. त्याने आपली बायको कुमारदेवी हिच्या नावाची नाणी पाडली. चंद्रगुप्ताने ‘महाराजाधिराज’ ही उपाधी ग्रहण केली होती. स्वतःच्या कारकिर्दीनंतर आपल्या मुलांमध्ये राज्यरोहणासाठी स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांच्यात सगळ्यात पराक्रमी असलेल्या समुद्रगुप्तावर राज्यकारभार सोपवून त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारला.
संदर्भ :
- Thaper, Romila, History of India, vol.1, New Delhi, 1966.
- कदम, य. ना. समग्र भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००३.
समीक्षक – सु. र. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.