भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ४

भौगोलिक आणि भूविवर्तनी विशिष्ट लक्षणे :

            भारत इंडोऑस्ट्रेलियन भूपट्टाच्या उत्तर पश्चिम दिशेला असून तो ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागराचा मोठा भाग आणि इतर काही लहान देशांनी वेढलेला आहे. हे भूपट्ट अवाढव्य अशा युरेशियन भूपट्टावर आदळत असून या भूपट्टाच्या खाली सरकत आहे (आकृती १).

आ. १. भौगोलिक आराखडा आणि भारतातील विवर्तनिय भूपट्ट सीमारेषा

 

एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली अशा पद्धतीने सरकण्याच्या या प्रक्रियेला अधोगमन (Subduction) असे म्हणतात. हे भूपट्ट एकमेकांवर आदळण्यापूर्वी टेथिस नावाच्या समुद्रामुळे हे भूपट्ट दोन तुकड्यांत विभागले गेले होते. पृथ्वीच्या शिलावरणाचा काही पृष्ठभाग महासागरांनी व्यापलेला असून उरलेला भाग हा खंडांनी व्यापलेला आहे. महासागरांच्या खालच्या भूपट्टांमध्ये ते अधिक खोलीवर असल्याने त्यांच्यामध्ये दुसऱ्या भूपट्टाविरूद्ध अभिसरण घडण्याची प्रक्रिया अधिक प्रमाणावर घडते. याउलट, खंड शिलावरणाजवळ असून अधिक तरणशील असल्याने त्यांची पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ राहण्याची शक्यता वाढते. जेव्हा दोन खंड अभिसारित होतात, तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर संकुचित आणि घट्टसर होत जातात. यालाच संकुचन (Shortening) आणि सांदीभवन (Thickening) असे म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिमालय पर्वत आणि तिबेटचा भाग.

भारतातील तीन प्रमुख भूविवर्तनीय उपप्रदेश म्हणजे उत्तरेकडील अफाट हिमालय, गंगा आणि इतर उपनद्यांचा मैदानी प्रदेश आणि द्वीपकल्प (Peninsula). हिमालयात, प्रामुख्याने टेथिस समुद्रात मोठ्या भूगर्भीय कालखंडात साठलेल्या गाळाचा समावेश होतो. खोल जलोढ (Alluvium) असलेले हिंद-गंगा खोरे म्हणजे हिमालयाच्या भारामुळे भूखंडात निर्माण झालेले मोठे गर्त (Great Depression) होय. देशातील द्वीपकल्पाच्या भागात भूतकाळातील हिमालयसदृश समाघातामुळे (Collision) विकृत झालेल्या पुरातन खडकांचा समावेश होतो. जमिनीचे क्षरण (Erosion) किंवा ऊन, पाऊस आणि वारा यांमुळे धूप होऊन अनेक पुरातन खडकांची मुळे उघडी पडतात. परिणामी मूळच्या स्थलाकृती पूर्णपणे बदलून जातात. सामान्यतः खडक अतिशय कठीण असतात, परंतु अपक्षयनामुळे (Weathering)  त्यांचा पृष्ठभाग मृदू होतो. हिमालयीन समाघातापूर्वी, कित्येक दशलक्षवर्षे आधी भारताच्या द्वीपकल्पीय भागाच्या मध्यभागातून लाव्हारस वाहिल्यामुळे बेसॉल्ट खडकांचे थर परसलेले दिसतात. कच्छसारख्या किनारी प्रदेशांमध्ये सागरी गाळ (Deposits) साठलेला दिसून येतो जो कित्येक लक्ष वर्षांपूर्वी या सागराखाली निमज्जन (Submergence) झालेल्या घटनेचा पुरावा होय.

 

भारतात पूर्वी झालेले प्रमुख मोठे भूकंप

गेल्या शतकात भारतात आणि भारताच्या आजुबाजुच्या प्रदेशात अनेक उल्लेखनीय मोठे भूकंप घडून गेले (आकृती २). यातील काही भूकंप गजबजलेल्या आणि नागरी भागात घडून आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्राण आणि इतर हानी झाली. इतर अनेक भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खोल अंतरावर झाल्यामुळे किंवा तुलनेने तुरळक लोकवस्तीच्या भागात झाल्याने त्यांची नोंद घेतली गेली नाही. काही अधिक विध्वंसकारक आणि नजीकच्या काळात झालेल्या भूकंपाची यादी तक्ता १. मध्येदेण्यात आली आहे. हिमालयीन भूपट्ट्याच्या सीमारेषेवर अनेक भूकंप होतात (हे आंतरभूपट्टीय भूकंप होत). परंतु, द्वीपकल्पीय भागात देखील अनेक भूकंप झाले आहेत (ते सर्व भूपट्टांतर्गत भूकंप होत).

 

दिनांक घटना वेळ परिमाण कमाल तीव्रता मृत्यू
१६ जून १८१९ कच्छ ११.०० ८.३ VIII १,५००
१२ जून १८९७ आसाम १७.११ ८.७ XII १,५००
८ फेब्रुवारी १९०० कोईमतूर ०३.११ ६.० X निरंक
४ एप्रिल 1905 कांग्रा ०६.२० ८.६ X १९,०००
१५ जानेवारी १९३४ बिहार-नेपाळ १४.१३ ८.४ X ११,०००
३१ मे १९३५ क्वेट्टा ०३.०३ ७.६ X ३०,०००
१५ ऑगस्ट १९५० आसाम १९.३१ ८.५ X १,५३०
२१ जुलै १९५६ अंजार २१.०२ ७.० IX ११५
१० डिसेंबर १९६७ कोयना ०४.३० ६.५ VIII २००
२३ मार्च १९७० भडोच २०.५६ ५.४ VII ३०
२१ ऑगस्ट १९८८ बिहार-नेपाळ ०४.३९ ६.६ IX १,००४
२० ऑक्टोबर १९९१ उत्तर काशी ०२.५३ ६.६ IX ७६८
३० सप्टेंबर १९९३ किल्लारी (लातूर) ०३.५३ ६.४ IX ७,९२८
२२ मे १९९७ जबलपूर ०४.२२ ६.० VIII ३८
२९ मार्च १९९९ चमोली १२.३५ ६.६ VIII ६३
२६ जानेवारी २००१ भुज ०८.४६ ७.७ X १३,८०५

 

आ. २. भूतकाळातील काही भूकंप

१८९७ ते १९५० या ५३ वर्षांच्या काळात भारतामध्ये चार मोठे भूकंप झाले (M > ८.०); तर अलीकडच्या काळात जानेवारी २००१ मध्ये भुज येथे झालेला भूकंप (M > ७.७) हा देखील तेवढाच भयंकर होता. या प्रत्येक भूकंपामुळे बराच विनाश झाला तसेच मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी देखील झाली. त्यामुळे भूकंपविषयक अभ्यासाला गती मिळाली व भूकंप अभियांत्रिकी ही शाखा प्रगत झाली. उदा., १८१९ मध्ये कच्छच्या भूकंपात १०० किमी. च्या परिसरात साधारणतः ३.० मी. उंचीचा अभूतपूर्व असा जमिनीचा पृष्ठभाग वर उचलला जाऊन उंचवटा निर्माण झाला (त्याला अल्लाबंद असे नाव देण्यात आले). तसेच १८९७ च्या आसाममधील भूकंपामुळे ५०० किमी. त्रिज्येच्या अंतरावरील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; या अनुभवांमुळे भूकंपाच्या तीव्रतेच्या मापनाच्या श्रेणीची I-X पासून I-ХІІ अशी सुधारणा करण्यात आली. १९३४ च्या बिहार-नेपाळ भूकंपादरम्यान अतीव द्रवीभवनामुळे (Extensive Liquefaction) जमिनीच्या ३०० किमी. च्या (ज्याला Slump Belt असे देखील म्हणतात) पट्ट्यातील अनेक बांधकामे वाहून गेली.

भूकंपामुळे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या मुख्यत्वे भूकंप घडतानाची वेळ आणि वर्षाचा कालावधी यावर अवलंबून असते. थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या घरांच्या आत असतात. अशावेळी भूकंप झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते.

भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (Seismic Zones) :

            भारतातील विविध ठिकाणी आढळून येणाऱ्या वैविध्यपूर्ण भूगर्भशास्त्रीय रचनेमुळे विविध ठिकाणी घडून येणाऱ्या विध्वंसकारक भूकंपाची शक्यता वेगवेगळी आहे. त्यामुळेच अशी ठिकाणे ओळखण्यासाठी भूकंपीय क्षेत्रदर्शक नकाशांची गरज भासते. भारतात पूर्वी झालेल्या विध्वंसकारी भूकंपांच्या तीव्रतेवर आधारित असलेला सन १९७० चा भूकंपीय क्षेत्रे दर्शविणारा नकाशा – I, II, III, IV आणि V अशा ५ भागांमध्ये विभागण्यात आला आहे (आकृती ३). या क्षेत्रांमध्ये संभाव्य भूकंपाच्या हादऱ्यांची अधिकतम परिवर्तित मेरकाल्ली (MM) तीव्रता अनुक्रमे V किंवा त्यापेक्षा कमी, VI, VII, VIII आणि IX किंवा त्यापेक्षा जास्त असते. हिमालयाच्या सीमेवरील उत्तर आणि उत्तरपूर्वेकडील काही भाग आणि पश्चिमेकडील कच्छचा भाग यांचे क्षेत्र V मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.

आ. ३. भारतातील भूकंपक्षेत्र नकाशा १९७०.

देशातील भूगर्भशास्त्र, भूकंपविवर्तनिकी (Seismotectonics) आणि भूकंपीय हालचालींच्या अधिक आकलनामुळे भूकंपीय क्षेत्रांच्या नकाशात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. १९६२ मध्ये भारतीय मानक संस्थेने भूकंपीय क्षेत्र नकाशा प्रथम प्रकाशित केला. या नकाशामध्ये प्रथम १९६७ मध्ये आणि नंतर १९७० मध्ये सुधारणा करण्यात आली. हा नकाशा पुनश्च २००२ मध्ये सुधारित रीत्या प्रकाशित करण्यात आला असून, आता त्यात I, II, III आणि V अशा चारच भूकंप क्षेत्रांचा समावेश आहे (आकृती ४). १९७० सालच्या मूळच्या नकाशाच्या आवृत्तीमधील भूकंप क्षेत्र  I प्रदेश, भूकंप क्षेत्र II च्या प्रदेशांमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत. तसेच भारताच्या द्वीपकल्पीय भागामध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. उदा., चेन्नईचा भाग आता सन १९७० च्या तुलनेत क्षेत्र II मधून भूकंपक्षेत्र III मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु २००२ मधील हा भूकंपक्षेत्रीय नकाशादेखील देशातील भूकंपाच्या संभाव्य धोक्यांचा अंतिम निर्देशक मानता येणार नाही. त्यात भविष्यामध्ये इतर घडामोडींवर आधारित काळानुरूप बदल करणे उचित ठरेल.

साधारणपणे, राष्ट्रीय भूकंपक्षेत्र नकाशा म्हणजे देशातील भूकंप क्षेत्रांचा एक विस्तृत निदर्शक आहे. परंतु देशातील प्रत्येक स्थळावरील मृदेतील बदल आणि स्थानिक भूगर्भशास्त्र या बाबी या नकाशावर दाखविणे शक्य नाही. म्हणूनच कुठल्याही मोठ्या प्रकल्पासाठी — मोठे धरण किंवा अणुऊर्जा वीज प्रकल्प इ.— भूकंपाच्या संभाव्य धोक्यांचा प्रत्यक्ष त्याठिकाणी विशिष्ट प्रकारे अभ्यास करणे आवश्यक ठरते. तसेच मोठ्या शहरी योजना राबविताना महानगरांची छोट्या छोट्या क्षेत्रांत विभागणी (Microzonation) केल्यामुळे भूगर्भातील स्थानीय बदल तसेच स्थानिक मृदेचा प्रकार इ. बाबींची माहिती मिळविणे सोपे होते.

 

संदर्भ :

  • IITK – BMTPC भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ४

                     

           

This Post Has 2 Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा