नाझी जर्मनीतील ज्यूविरोधी आणि वंशवादी कायदे. जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर (२० एप्रिल १८८९–३० एप्रिल १९४५) याच्या नेतृत्वाखालील नाझी पक्षाने १५ सप्टेंबर १९३५ रोजी न्यूरेंबर्ग येथे जर्मन संसदेमध्ये (राइक्सटॅगमध्ये) हे कायदे संमत केले. जर्मन लोक हे आर्य वंशाचे आणि उच्च संस्कृतीचे प्रवर्तक आहेत आणि ज्यू हे संस्कृतीचे विध्वंसक आहेत, असा नवा सिद्धांत त्यांनी मांडला. जर्मन वंश व त्याचे पावित्र्य टिकविणे, वृद्धिंगत करणे आणि ज्यूविरोध (अँटी-सेमिटीक) हे या कायद्याचे मुख्य उद्देश होते. या नव-वंशश्रेष्ठत्व सिद्धांतास व कायद्यास तेथील चर्चने प्रखर विरोध केला;  तथापि नाझी पक्षाने जुलूम-जबरदस्तीने तो लादण्याचा प्रयत्न केला.

इसवी सन १९३३ च्या जानेवारीत अध्यक्ष पॉल फॉन हिंडेनबुर्खने हिटलरला चॅन्सलरपदी नेमले. जर्मन संघराज्याच्या मध्यवर्ती संसदेत नाझी पक्षाचे बहुमत आले होते. संसद व हिंडेनबुर्ख यांच्याकडून हिटलरने एक जादा कायदा (इनॅबलिंग ॲक्ट) संमत करून घेतला व त्या बळावर नाझी राजवट सुरू केली. १४ जुलै १९३३ रोजी एका वटहुकमाने नाझीशिवाय इतर पक्षांवर बंदी घालण्यात आली. नाझी राजवटीचा प्रारंभ हिंसेने व दहशतवादाने झाला आणि विशेष कायद्यांद्वारा ज्यूंना सर्व अधिकार नाकारण्यात आले.

नाझी जर्मनीने जर्मन संसदेमध्ये (राइक्सटॅगमध्ये) एकमताने खालील कायदे स्वीकारल्याचे जाहीर केले : १. ज्यूंना जर्मन नागरिकत्वापासून वंचित करून फक्त राज्याच्या प्रजाजनाचा दर्जा किंवा पदनाम दिले. यामागे जर्मन वंशाचे संरक्षण आणि जर्मन मानसन्मान हे तत्त्व होते.  २. जर्मन वंश आणि त्याचा सन्मान करण्याच्या हेतूने आर्यन (जर्मन मूळ नागरिक) आणि ज्यू यांमधील विवाहास व विवाहबाह्य संबंधांवर प्रतिबंध घालण्यात आला. एखाद्या ज्यूने या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याला प्रदीर्घ काळाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली.  ३. आर्यन लोकांनी जिथे ज्यूंची वसती आहे, तेथून केव्हाही स्थलांतर करावे.  ४. १४ नोव्हेंबर १९३५ च्या हुकूमनाम्यात हे कायदे अधिक स्पष्ट करण्यात येऊन ज्यू कोणाला म्हणावयाचे, याची व्याख्या निश्चित करण्यात आली (त्यानुसार एकतरी ज्यू आजी-आजोबा असणे) आणि त्यानंतर कोणत्याही ज्यूला जर्मन नागरिकत्व पूर्णतः नाकारण्यात आले. केवळ शुद्ध जर्मन रक्ताच्या लोकांनाच नागरिकत्वाचे अधिकार मिळतील, असे घोषित करण्यात आले. ५. ज्यूंना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला, त्यांना जर्मनीच्या लष्करात भरती होणे, कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे यांपासून वंचित करण्यात आले; तसेच सार्वजनिक कार्यालयातील पदांपासून त्यांना दूर ठेवण्यात आले. ६. ज्यूंच्या घरकामासाठी जर्मन वंशाच्या महिलांना, विशेषतः पंचेचाळीस वर्षांखालील महिलांना, नेमण्यास बंदी घालण्यात आली.

काही मर्यादेपर्यंत न्यूरेंबर्ग कायद्यांनी ज्यूंना धर्मस्वातंत्र्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक देवघेव (आर्थिक व्यवहार) यांना परवानगी दिली होती. परंतु नंतर पॅरिस येथे हर्शेल ग्रून्सपॅन या पोलिश-ज्यू निर्वासिताने ७ नोव्हेंबर १९३८ रोजी जर्मन मुत्सद्दी अर्न्स्ट एदुआर्ट फोन रॅथ (१९०९–३८) याचा खून केला. त्यानंतर ज्यूंच्या संदर्भातील कायदे अधिक कडक करण्यात आले. त्यांच्या वारसाहक्कांवर निर्बंध घातले गेले, मोठ्या प्रमाणात दरडोई कर लादण्यात आला, कोणताही व्यवसाय करण्यास, पत्रकारिता करण्यास बंदी घालण्यात आली. त्यांची पारपत्रे काढून घेण्यात आली व ज्यूंच्या पारपत्रावर लाल रंगात ‘जेʼ असा शिक्का मारण्यात आला आणि त्यांना ज्यूधारक (ज्यूविश) नावे लावण्याची सक्ती करण्यात आली. एखाद्या व्यक्तीने यांपैकी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यास तिच्या सर्व समुदायाला जबाबदार धरून शिक्षा करण्यात येईल किंवा दंड केला जाईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली. त्यांच्या वसाहतींना मर्यादेचे बंधन घातले, तसेच ते आर्यन समाजाहून भिन्न आहेत हे दर्शविण्यासाठी त्यांच्या कपड्यांवर ज्यूंची विशिष्ट निशाणी (Star of David) उमटविण्यात आला. ज्यू समाजाचा विधिवत दर्जा हिरावून घेण्यात आला आणि त्यांना वैद्यकीय सेवेतूनही दूर करण्यात आले.

अशा प्रकारे न्यूरेंबर्ग कायदे आणि नाझी तात्त्विक धोरण यांनुसार ज्यूंना जर्मनीत पूर्णतः बहिष्कृत करण्यात आले. पुढे हे कायदे फॅसिस्ट इटलीमध्ये तसेच जर्मनीच्या उपराष्ट्रांत (मांडलिक किंवा वसाहतिक राष्ट्रांत) कार्यवाहीत आणून दुसऱ्या महायुद्धकाळात हिटलरने ज्यूहटाव मोहीम अत्यंत क्रूरपणे राबविली. हिटलरच्या व्यक्तिगत वैफल्यभावनेतून निर्माण झालेल्या या ज्यूविरोधी धोरणामुळे लक्षावधी ज्यूंचा बळी गेला.

संदर्भ :

  •  Mahajan, V. D. History of Modern Europe Since – 1789, New Delhi, 1983.
  •  Michalczyk John J. Nazi Law : From Nuremberg to Nuremberg, New York, 2017.
  •  Newman, Amy Ed., The Nuremberg Laws : Instistutionalized Anti-Semitism, San Diego, 1999.
  •  Stowell, Gordon Ed., The New Universal Encyclopedia, Vol. 2, Nottingham, 1959.
  •  Welch, David,  Modern European History 1871-2000, London, 1999.

 

समीक्षक – अरुणचंद्र पाठक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content