आधुनिक काळातील एक धार्मिक आंदोलन. ‘थिऑसʼ आणि ‘सोफियाʼ या दोन ग्रीक शब्दांपासून ‘थिऑसॉफीʼ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ईश्वरविषयक ज्ञान असा आहे. धर्माची दोन प्रमुख रूपे आहेत : एक बाह्य व दुसरे आंतरिक. धर्माचे बाह्य रूप म्हणजे कर्मकांड आणि आंतरिक रूप म्हणजे ईश्वराचे ज्ञान. हे ज्ञान साक्षात ज्ञान ह्या स्वरूपात अभिप्रेत आहे. सर्व उच्च धर्मांमध्ये ईश्वराचे ज्ञान किंवा त्याचा साक्षात्कार ह्या अंगाला महत्त्व आहे. थिऑसॉफीमध्ये ईश्वरविषयक ज्ञान हे कोणत्याही धर्माच्या द्वारा किंवा धार्मिक संघटनेबाहेरही केवळ वैयक्तिक प्रयत्नांच्या साहाय्याने प्राप्त होऊ शकते, असे मानले आहे. व्यक्ती ही ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वतःचे ज्ञान, आत्मज्ञान म्हणजेच ईश्वराचे ज्ञान. ईश्वर हा सर्वव्यापी असून पुन्हा त्यापलीकडेही आहे. सर्व भूतमात्र हा ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वाभाविकपणेच त्यात बंधुभाव असतो, असे थिऑसॉफी मानते. त्यामुळे ईश्वराचे ज्ञान करून घेणे आणि आपण व आपल्याभोवतीचे विश्व एकच आहे, असा साक्षात्कार होणे हा थिऑसॉफीचा गाभा आहे. ज्यांना ईश्वराचे ज्ञान झाले आहे किंवा जे ते मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ‘थिऑसॉफिस्टʼ ही संज्ञा लावली जाते.

थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना १७ नोव्हेंबर १८७५ रोजी न्यूयॉर्क येथे झाली. विख्यात रशियन विदुषी हेलेना प्यिट्रॉव्हन्य ब्लॉव्हॅटस्की (१८३१–९१) आणि अमेरिकन लष्करी अधिकारी कर्नल हेन्री स्टील ऑलकट (१८३२–१९०७) हे या संस्थेचे संस्थापक. अमेरिकेत स्थापन झालेल्या या संस्थेचा प्रसार मात्र भारतात झाला. भारतातील आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिल्यावरून ब्लॉव्हॅटस्की आणि ऑलकट १८७९ साली मुंबईस आले. मुंबईत झालेल्या त्यांच्या सत्कारसमारंभात ऑलकटने शिक्षणसुधारणा आणि संस्कृत विद्येचा पुनरुद्धार असा दुहेरी कार्यक्रम लोकांपुढे मांडला. त्याच वेळी भारतीय समाजाचे राष्ट्रीय पातळीवर संघटन करून ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रचाराला पायबंद घालण्याची निकडही त्यांनी स्पष्ट केली. पुढे १८८२ साली या संस्थेचे कार्यालय मद्रास प्रांतातील अड्यार येथे स्थापन झाले. १८९५ मध्ये सोसायटीच्या राष्ट्रीय शाखेचे कार्यालय वाराणसी येथे स्थापन करण्यात आले. ऑलकटच्या मृत्युनंतर सोसायटीचे अध्यक्षपद विख्यात थिऑसॉफिस्ट श्रीमती ॲनी बेझंट (१८४७–१९३३) यांच्याकडे आले आणि त्यांनी ते अखेरपर्यंत सांभाळले. बेझंट या जन्माने आयरिश असल्या तरी, त्या भारताला आपली मातृभूमी मानीत. तेजस्वी प्रज्ञा, प्रभावी वक्तृत्व आणि भारताच्या सर्वांगीण उद्धाराची तळमळ या गुणांमुळे भारतीय जनमानसावर त्यांचा विलक्षण प्रभाव पडला आणि त्यायोगे थिऑसॉफीच्या आंदोलनाचीही प्रगती साधली गेली. बेझंट यांच्यानंतर जॉर्ज अरुंडेल, सी. जिनराजदास, नीलकंठ श्रीराम, जे. बी. एस. कोट्स, राधा बर्नेर आदींनी या सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. तिमोथी बॉइड हे सोसायटीचे विद्यमान (२०१४) अध्यक्ष आहेत.

सोसायटीची प्रमुख तत्त्वे :

१. जात धर्म, वर्ण ह्यांसारखे भेद बाजूला ठेवून मानवजातीच्या बंधुत्वाचे एक केंद्रस्थान तयार करणे.
२. धर्म, तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे ह्यांच्या तौलनिक अध्ययनास प्रोत्साहन देणे.
३. अज्ञात सृष्टिनियम व मनुष्याच्या अंतरंगातील शक्ती ह्यांचे संशोधन करणे.
४. सेवा, सहिष्णुता, आत्मविश्वास व समभाव या गुणांनी युक्त असा मानवसमाज निर्माण करणे.
५. बंधुत्वावर आधारित सर्वांची एक संघटना स्थापना करणे.
६. ज्या ब्रह्माने मानवाची निर्मिती केली आहे, त्याचीच संत, तत्त्वज्ञ, प्रेषित ही सर्व लेकरे आहेत आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली जगाचे व्यवहार चालू आहेत, याची जाणीव ठेवणे.
७. सत्कर्मातून मानवाला मोक्ष, निर्वाणप्राप्ती होते याची जाणीव ठेवणे.
८. आत्मा कोणतेही लिंगभेद मानीत नाही, स्त्री-पुरुष समान आहेत, असे मानणे.
राष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व ओळखून सोसायटीच्या वतीने गुजरात, आंध्र प्रदेश, वाराणसी येथे शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली. संस्थेचे अड्यार येथील ग्रंथालय जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालयांपैकी एक समजले जाते. त्यात प्राचीन हस्तलिखिते आणि उत्तमोत्तम मुद्रित ग्रंथ आहेत. विविध ग्रंथ, नियतकालिके यांतून सोसायटीचा प्रसार करण्यात येतो. जगातील विविध देशांत संस्थेच्या शाखा असून सत्यशोधनाची इच्छा असणाऱ्या कुणाही व्यक्तीला थिऑसॉफिकल सोसायटीचे सभासद होता येते. ‘सत्यान्नास्ति परो धर्म:ʼ (सत्यापरता नाही धर्म) असे सोसायटीचे ब्रीद असून ते तिच्या बोधचिन्हातही दर्शविले आहे. त्यामुळेच सभासदांना वैयक्तिक मतस्वातंत्र्य असते.

थिऑसॉफी हा एखादा स्वतंत्र धर्म नाही; ती एक सर्वधर्मसमावेशक विचारसरणी आहे. भारतात थिऑसॉफीचा प्रवेश झाला, त्या वेळी येथे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या धर्मांचा संघर्ष सुरू होता. थिऑसॉफीमुळे हा संघर्ष टळू शकला नाही अथवा त्याची तीव्रता कमी झाली असेही नाही; परंतु या तिन्ही धर्मांतील काही व्यक्तींना थिऑसॉफीने प्रभावित केले. धार्मिक कट्टरपणात मानवतेची हानी असून धर्मसमन्वयानेच माणसाचे खरे कल्याण होऊ शकेल, असा विश्वास थिऑसॉफीने त्यांच्या ठायी निर्माण केला. थिऑसॉफीच्या विविध उद्दिष्टांपैकी परलोकसंशोधनावर अनेकांचा विश्वास नसला, तरी विश्वबंधुत्व व धर्मसमन्वय ही दोन उद्दिष्टे जगातील सर्व विचारवंतांना प्रिय झालेली आहेत. भारतीय संस्कृतीच्या वैभवाची जोपासना, सामाजिक सुधारणा व भारतीय स्वातंत्र्यचळवळ यांत सोसायटीचे मोठे योगदान आहे. आजही शेकडो शाखांमधून या सोसायटीचे कार्य चालू आहे.

संदर्भ :

  • Besant, Annie, The Ancient Wisdom : An Outline of Theosophical Teachings, London, 1897.
  • ग्रोवर, बी. एल.; बेल्हेकर, एन. जे. आधुनिक भारताचा इतिहास, नवी दिल्ली, २००७.

समीक्षक – अरुणचंद्र पाठक

प्रतिक्रिया व्यक्त करा