तुलनात्मक पुनर्रचना पद्धती : ऐतिहासिक भाषाविज्ञानात भाषांमध्ये काळानुसार होणाऱ्या बदलांचा अभ्यास होतो. भाषांमधील काही विशेष प्रकारच्या शब्दांतील ध्वनीविषयक आणि अर्थविषयक साम्यांचा अभ्यास करून ही साम्ये ज्या मूळ भाषेमुळे आली तिची पुनर्रचना करणे हे ऐतिहासिक भाषाविज्ञानाचे एक प्रमुख अंग आहे. हे करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते तिला तुलनात्मकपुनर्रचना पद्धती असे म्हणतात. उदाहरणार्थ:

अ.क्र  मागधी प्राकृत  पाली  महाराष्ट्री प्राकृत अर्थ
1 अबलं अपरं अवरं बाकीचे
2 दिबं दिपं दिवं दिवा
3 हस्तं ह्त्थं ह्त्थ हात
4 लोगं लोकं लोअ जग
5 णलं णरं णरं नर/माणूस
6 णिस्फलं णिफ्फलं णिफ्फलं निष्फळ
7 पस्खलदी पक्ख्लती पक्खलई अडखळला
8 पिदा पिता पिआ पिता/वडील
9 पुस्पं पुप्फं पुप्फं फुल
10 शुस्कं सुक्खं सुक्खं सुके/कोरडे

 

मागधी              प्राकृत                              पाली 

-ब-, -ग-, -द- ~     -प-, -क-, -त-            अबलं~अपरं, दिबं~दिपं,लोगं~लोकं, पिदा~पिता

[ब], [ग], [द] हे सघोष स्फोट ध्वनी आहेत. [प], [क], [त] हे अघोष स्फोट ध्वनी आहेत. दोन स्वरांच्या मध्ये येणारा अघोष ध्वनी सघोष होण्याची शक्यता जास्त असते. स्वर हे सघोष असतात. महाराष्ट्री प्राकृतमधीलअवरं आणि दिवं यांत स्फोट ध्वनी घर्षक ध्वनी मध्ये बदलण्याचे प्रमाणही जास्त असते (ग्रीमचा नियम/कायदा).यावरून असे म्हणता येईल की

१. मूळ ध्वनी हे अघोष स्फोट असावेत. हे ध्वनी पुनर्रचित दाखविण्यासाठी  त्यांच्याआधी ‘*’ हे चिन्ह वापरतात- *प, *क, *त. २.हे *प, *क, *त पालीमध्ये तसेच राहिले. मागधी प्राकृतमध्ये[ब], [ग], [द] झाले. महाराष्ट्री प्राकृतमधील अवरं आणि दिवं यांत मूळ*प चे [व] मध्ये परिवर्तन झाले, मूळ *क, *त हे लोअ आणि पिआ मध्ये लोप पावले.अशाच प्रकारे रूपांमध्ये आणि अर्थामध्ये साधर्म्य दर्शविण्याऱ्याशब्दांमधील प्रमाणबद्ध बदलांचे निरिक्षण करून ध्वनी परिवर्तनाचे नियम लावून मूळ ध्वनींची आणि त्यावरून मूळ शब्दांची पुनर्रचना करता येते. असे पुनर्रचन ध्वनींच्या पातळीबरोबरच रूपांच्या, वाक्यांच्या आणि अर्थाच्या पातळ्यांवरही केले जाते.

पहा : ऐतिहासिक भाषाविज्ञान, ध्वनिपरिवर्तन

संदर्भ :

  • Hock, Hans, Principles of Historical Linguistics,Mouton de gruyter ,Berlin,1986.

#Internal reconstruction method, #Historical linguistics.