संभाषण विश्लेषण : दैनंदिन सामाजिक जीवनात संभाषणांच्या माध्यमातून समाजघटक एकमेकांशी संवाद कसा साधतात, विचारांचं आदान-प्रदान कसं करतात याचा अभ्यास करणारी भाषावैज्ञानिक पद्धती म्हणजे संभाषण विश्लेषण पद्धती होय.भाषक समाजात भाषा प्रत्यक्ष कशी वापरली जाते यावर भर देणाऱ्या प्रत्यक्ष प्रयोगदर्शी भाषा-अभ्यास प्रणालीशी तिचा निकटचा संबंध आहे. संज्ञापनाचे साधन म्हणून संभाषणे ही सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. चौकशी, विनंती, वादविवाद, मुलाखती, सूचना, व्यापारी करार, व्यावसायिक बोलणी अशी संभाषणाधारित भाषाव्यवहारांची अनेक उदाहरणे देता येतील. म्हणूनच भाषाविज्ञान व समाजशास्त्र या दोन्ही क्षेत्रांचा समन्वय साधू पाहणारी ‘संभाषण-विश्लेषण’ संशोधन पद्धती महत्त्वाची ठरते.
संभाषणे ही दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये घडतात. सहभागी व्यक्तींच्यामध्ये संवाद साधावा या दृष्टीने प्रत्येक समाजात संभाषणांची एक विशिष्ट संरचना असते. त्यांच्यामागे समाजमान्य अशी एक निश्चित व्यवस्था असते. संभाषणांना शिस्तबद्ध व सुसंबद्ध स्वरूप देणारे काही समाजमान्य नियम, रीती-रिवाज किंवा परिपाठ असतात. संज्ञापन यशस्वी होण्यासाठी संभाषणात सामील असणाऱ्या व्यक्तींनी संभाषणांना पायाभूत अशा या नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. संज्ञापन (संदेशप्रेषण व संदेशग्रहणाची प्रक्रिया)यशस्वी करणाऱ्या अशा सामाजिक रीती-रिवाजांचा शोध घेणे हा संभाषण विश्लेषकाचा प्रमुख उद्देश असतो. संभाषण-विश्लेषक पद्धती प्रथम संभाषणांच्या दृक्-श्राव्य नोंदी किंवा नैसर्गिक स्वरूपातील संभाषणांचा अभ्यास करते आणि या सर्व संभाषणांना समान असे काही साचे किंवा आकृतिबंध आहेत का, संभाषणाचे काही स्थिर, सर्वमान्य परिपाठ आहेत का याचा भाषावैज्ञानिक पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न करते.
संभाषणांवर आजपर्यंत झालेल्या भाषावैज्ञानिक संशोधनातून संभाषण विश्लेषणाची चार महत्त्वाची क्षेत्रे (domains) निश्चित करण्यात आली आहेत ती अशी : आळीपाळी (turn-taking), दुरुस्ती (repairs), संभाषणातील कृती ( Action on interaction) आणि भाषा-कृतींचा अनुक्रम (action sequencing). त्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे.
१) आळीपाळी: संभाषणाची सुरवात वेगवेगळ्या पद्धतीनी होऊ शकते. कधी ‘अरे!’ , ‘अगं’ अशा संबोधनांनी, ‘ऐक ना’, ‘तुला माहित आहे का?’ अशा वाक्यांनी किंवा कधी ‘शुभ प्रभात!’, ‘कशी आहेस?’, ‘काय म्हणतेस?’ अशा अभिवादनांनी. प्रारंभीच्या उपचारानंतर जी व्यक्ति संभाषण सुरु ठेवते तिला बोलण्याची पहिली संधी किंवा पाळी मिळते. सॅक्स, शेग्लॉफ आणि जेफर्सन (१९७४) या भाषावैज्ञानिकांच्या मते बोलण्याची पाळी ही तीन प्रकारे नियंत्रित होते:
एक : वर्तमान वक्ताच पुढच्या वक्त्याची निवड करतो. त्यासाठी तो त्याने निवडलेल्या वक्त्यासाठी संबोधन-संज्ञा वापरतो, त्याच्याकडे सूचक दृष्टीक्षेप टाकतो किंवा विनंती/आमंत्रणवाचक शब्द वापरतो. उदा. जेवणाच्या टेबलावर घडणारा हा संवाद :
क्ष – ‘अनुष्का, मिठाचं भांड सरकवतेस जरा इकडे?’
इथे वक्ता अनुष्काला प्रत्यक्ष संबोधून विनंती करतो. अनुष्का त्याला सकारात्मक (हो!) किंवा नकारात्मक (तुझं तू घे ना!) प्रतिसाद देत बोलण्याची पुढची पाळी स्वीकारू शकते.
दोन : वर्तमान वक्त्याने पुढील वक्त्याची निवड केली नाही तर संभाषणातील कुठलाही सहभागी आत्म-निवड करून बोलायला सुरवात करू शकतो.
तीन : वरीलपैकी कुठल्याच प्रकारे पाळी-निश्चिती झाली नाही तर वर्तमान वक्ताच पुन्हा बोलणे चालू ठेवतो.
पाळी-वाटप पद्धतीमुळे संभाषणात खंड पडत नाही किंवा परस्परांच्या बोलण्यावर आक्रमणही घडत नाही.आळीपाळीची संरचना ही अशी मुख्यत: दोन घटकांवर उभी असते : वर्तमान वक्ता व पाठोपाठचा/पुढचा वक्ता. विद्यमान वक्त्याला बोलण्याची फक्त एकच पाळी घेता येते. त्याच्या अपेक्षित पाळी-पूर्तीनंतर पाळी दुसऱ्या वक्त्याकडे संक्रमित होते. कुणीही सहभागी वक्ता ठराविक मर्यादेपलिकडे आपली पाळी लांबवू शकत नाही. सॅक्स इ. (१९७०) या भाषावैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे संभाषण-पद्धती ही एखाद्या स्प्रिंगसारखी असते. कितीही ताणले तरी वेटोळे शेवटी मूळ स्थितीलाच परतते त्याप्रमाणे अंतर्गत नियमांना बांधील असलेल्या संभाषणातील पाळ्या या मर्यादित लांबीच्याच राहतात.
२) दुरुस्ती (Repair) : संभाषणाच्या ओघात कधी कधी भाषण, श्रवण किंवा आकलन यांच्या संबंधात काही समस्या उद्भवू शकतात. असे गैरसमज किंवा अडथळे सामान्यतः पार करून संभाषण पुढे चालू ठेवले जाते. या प्रक्रियेत कोणत्या युक्त्या-प्रयुक्त्या वापरल्या जातात त्यांचा अभ्यास हे संभाषण विश्लेषणाचे दुसरे उद्दिष्ट आहे.
संभाषणातील चुकीच्या/अयोग्य किंवा दुरुस्ती करण्यालायक भागाला उद्देशून ‘त्रासोत्पादक’ (trouble source) किंवा ‘दुरुस्तीपात्र’ (repairable) अशा संज्ञा वापरल्या जातात. चुकीची दुरुस्ती ही स्वत: दुरुस्तीपात्र भाषिताच्या वक्त्याकडून, श्रोत्याकडून किंवा तिसऱ्या एखाद्या संभाषण-सहभागी कडून होऊ शकतो. पारिभाषिक शब्द वापरायचे झाल्यास दुरुस्ती ही अशी ‘स्वयं-कृत’ किंवा ‘पर-कृत’ असू शकते. उदा. ‘क्ष’ आणि ‘य’ यांच्या संवादातील ‘क्ष’चे खालील भाषित:
क्ष- तू शुक्रवारी_ _ _ नाही, नाही_ _ रविवारी माझ्याकडे किती वाजता येणार आहेस?
या भाषितात ‘शुक्रवारी’ हा शब्द चुकीचा असून ‘दुरुस्तीपात्र’ आहे. वक्ता ‘क्ष’ स्वतःच दुरुस्तीकर्ता आहे आणि एकाच वाक्यात चूक घडतेही आणि दुरुस्तही केली जाते. दुरुस्तीकर्ता जर श्रोता असेल तर त्याच्याकडून ‘काय म्हणालास?’, ‘कोण?’, ‘कुठे?’ असे प्रश्नार्थक शब्द संदर्भानुसार वापरले जातात किंवा प्रश्नार्थक पद्धतीने वक्त्याच्या भाषकातील आवश्यक शब्दांची पुनरावृत्ती केली जाते.
३) संवादांतर्गत कृती (Action in Interaction) : समाजातील प्रत्यक्ष भाषाव्यवहारांचा अभ्यास करणाऱ्या भाषावैज्ञानिक प्रणालीनुसार एखाद्या व्यक्तीचे ‘भाषित’ हे वस्तुतः एक ‘भाषिक कृती’च (Speech Act) असते. काहीतरी ‘म्हणणं’ हे काहीतरी ‘करण्या’मध्येच परिणत होत असतं. भाषा अभ्यासक जॉन सर्ल यांच्या सिद्धांतानुसार संभाषणे या कृतीच असतात. श्रोता हा वक्त्याच्या बोलण्यातून प्रतीत होणाऱ्या कृतींचे (जसे की शुभेच्छा देणे, विनंती करणे, तक्रार करणे, आमंत्रण देणे इ.) धागेदोरे शोधतो व त्या ओळखून त्यावर प्रतिक्रिया देतो. कृती आणि प्रतिसाद यामध्ये सामान्यतः खंड पडत नाही; किंबहुना बऱ्याच वेळा ते एकमेकांत मिसळूनही जातात.
संवादगर्भ कृतींचे सूचन हे संभाषणाच्या काही ठळक वैशिष्ट्यांद्वारे केले जाते. भाषा अभ्यासक लेविन्सनच्या मते पाळी-निहाय संभाषणांची दोन वैशिष्ठ्ये भाषिक कृती ओळखण्यास सहाय्यभूत ठरतात.एक : बोलण्याच्या ओघात वक्त्याकडून घडणाऱ्या क्रिया उदा. आवाजातील चढउतार, त्याची नजर आणि ‘ओऽ!’, ‘ठीक आहे!’, ‘हे पहा_ _’ या सारखे सूचक उद्गार. दोन : भाषावैज्ञानिक वैशिष्ट्ये. उदा. भाषिताचे व्याकरणिक स्वरूप. यात शब्दातून मिळणारे अर्थसंकेत (‘भंकस व्याख्यान!’ – तिरस्कार सूचक), वाक्यव्यत्त्यास (येणारच ते निवडून!), आज्ञार्थक रूपे इ.चा समावेश होतो.
४) भाषाकृतींचा क्रम/अनुक्रम (Action Sequencing) : संभाषणात भाषिक कृतींचे संयोजन हे अनुक्रम पद्धतीनेच केले जाते. कृती-क्रमवारीचे अगदी प्राथमिक उदाहरण म्हणून ‘प्रश्न-उत्तर’ या दोन भाषिक कृतींचा उल्लेख करता येईल. संभाषणाची सुरूवात प्रश्नाने झाल्यास तो प्रश्नच अपेक्षित आणि त्याच्याशी सुसंबद्धित अशा उत्तराचा क्रम ठरवतो. प्रश्न-उत्तर यासारख्या एकामागोमागच घडणाऱ्या सर्व भाषिक-कृती-जोड्यांना उद्देशून निकटवर्तिय युग्म (adjecency pair) ही पारिभाषिक संज्ञा वापरली जाते.संभाषणात अटळपणे घडणारी क्रिया-ते-प्रतिक्रिया (stimulus-plus-response) ही क्रमवारी येथे अपेक्षित आहे.
संभाषणाची सुरूवात, ओघ आणि शेवट या क्रियांत निकटवर्तिय युग्मांचे महत्त्वाचे स्थान आहे. दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकमेकांना भेटणे, शुभेच्छा देणे, संवादाचा विषय बदलणे व शेवटी एकमेकांची रजा घेणे या सर्व कृतींसाठी निकटवर्तीय युग्मांच्या स्वरुपात काही भाषिक प्रथांचे अस्तित्त्व जाणवते. या सर्व कृतिदर्शक भाषितांमध्ये एक संकेतात्मक सुसंबद्धता असते.अशा संकेतात्मक सुसंबद्धतेमुळे पहिले भाषित घडल्यास दुसरे भाषित आपोआपच अपेक्षिले जाते. प्रश्न-उत्तर या निकटवर्तिय युग्मात प्रश्नानंतर नेहमीच उत्तर येते असे नाही. पण प्रश्नाने क्रियाशील केलेल्या ‘संकेतात्मक सुसंबद्धते’मुळे प्रश्नानंतर येणारी प्रतिक्रिया ही प्रश्नाचे उत्तर म्हणूनच स्वीकारली जाते. उदा. शाळेच्या परिसरात घडलेले पुढील संभाषण :
क्ष – प्राचार्य आज आलेत का?
य – अंऽऽऽ! बघून येऊ का?
प्रस्तुत संभाषणात ‘य’चे प्रतिक्रियात्मक उत्तर हे ‘युग्मा’तील अपेक्षित उत्तर नसले तरी ते प्रश्नाशी सुसंबद्धच मानले जाते.
भाषा अभ्यासक शेग्लॉफ आणि सॅक्स यांनी निकटवर्तिय युग्माची चार वैशिष्ट्ये सांगितली आहेत: १) सामिप्य २) वेगवेगळ्या वक्त्यांकडून त्यांचे उच्चारण ३) युग्मातील प्रथम व द्वितीय अशी त्यांची क्रमवारी ४) निकटवर्तीय युग्मातील संकेतात्मक सुसंबद्धता.
संभाषणे ही अशा रीतीने सुरचित असतात. त्यांचा आरंभ-शेवट, सहभागींची बोलण्याची आळीपाळी, सामाजिक संदर्भानुसार औपचारिक-अनौपचारिक भाषेचा वापर या सर्वामागे प्रचलित भाषिक आणि सामाजिक प्रथांचे भान गृहीत धरलेले असते. अर्थात् संभाषण ही भाषिक तसेच सामाजिक घटना असल्याने वेगवेगळ्या समाजानुसार या प्रथा बदलू शकतात.
संदर्भ : 1.Couper-Kuhlan, E. and Selting, M. Interactional Linguistics: Studying language in social interaction, Cambridge, U.K.,2017. 2.Sacks, H.;Schegloff, E.A.; Jefferson, G.,A simplest systematics for the organization of turn taking for conversation, Language, 50 (4) 596-735, 1974. 3.Sidnell ,N.J.and Stivers T.(Edi.), The handbook of conversation analysis, Wiley Blackwell,UK,2013.
Keywords : #Pragmatics/ Conversational Analysis, #Turn-Taking, Repair, #Action in Interaction, #Action Sequencing.