(८ नोव्हेंबर १९२२ — २ सप्टेंबर २००१).
साउथ आफ्रिकन हृद्य शल्यविशारद. त्यांनी सर्वप्रथम मानवी हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.
बर्नार्ड यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केप परगण्यातील (Cape Province) पश्चिम बोफर्ट (Beaufort West) येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बोफर्ट वेस्ट हायस्कूल येथून झाले (१९४०). केपटाउन विद्यापीठातून (University of Cape Town) पदवी शिक्षण (१९४५) झाल्यानंतर त्यांनी औषधनिर्माण शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. क्षयरोग आणि मेंदूदाह यांवरील प्रबंधामुळे त्यांना औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळाली (१९५३). नंतर लगेच अमेरिकेमधील मिनेसोटा विद्यापीठात हृदयउरोविकृतिचिकित्सा (कार्डिओथोरॅसिक Cardiothoracic) शस्त्रक्रियेतील प्रगत शिक्षणासाठी अभ्यासवृत्ती मिळाल्यानंतर त्यांचे जीवन बदलून गेले. हृदय प्रत्यारोपणातील शल्यक्रियातज्ज्ञ नॉर्मन शमवे (Norman Shumway) यांच्याशी त्यांचा संबंध आला. लहान आतड्याचा मार्ग बंद असण्याच्या जन्मजात कारणांवर त्यांनी केलेल्या शोधनिबंधासाठी त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली (१९५८). दक्षिण आफ्रिकेत परतल्यानंतर ते ग्रुटेश्हुर रुग्णालयात (Groote Schuur Hospital) हृदय-वक्ष शस्त्रक्रिया विभागामध्ये शल्यविशारद म्हणून रुजू झाले (१९५८).
रशियातील ओपनहायमर मेमोरियल ट्रस्टच्या रुग्णालयात बर्नार्ड यांना कुत्र्यावर डोके आणि हृदय प्रत्यारोपण करण्याची संधी मिळाली (१९६०). त्यानंतर त्यांना केपटाउन विद्यापीठात पूर्णवेळ व्याख्याता आणि शस्त्रक्रिया संशोधन विभागाचे संचालक नेमले गेले (१९६१). त्याच ठिकाणी त्यांचा भाऊ मॉरिस औषधनिर्माण विज्ञानाचे शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनामुळे हृदय शस्त्रक्रिया करण्याची त्यांची इच्छा वाढली. हृदयाच्या उजव्या अलिंद (Atrial) व निलयामध्ये (Ventricle) असणारी त्रिदली झडप जन्मजात कारणाने नीट न उघडण्याच्या दोषावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली.
अमेरिकेमधील मिशिगन येथील नॉर्मन शमवे या शल्यविशारदाने हृदय प्रत्यारोपण पद्धत विकसित केली असली तरी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने हृदय प्रत्यारोपणास अमेरिकेत परवानगी नाकारली होती. अशावेळी नॉर्मन शमवे यांच्या पद्धतीने बर्नार्ड यांनी मानवी हृदय प्रत्यारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया दक्षिण आफ्रिकेत १९६७ साली केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांचा पहिला रुग्ण अठरा दिवसांनी रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने मरण पावला. पण त्यांचा दुसरा रुग्ण एकोणीस महिने जगला. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर सर्वाधिक आयुष्य लाभलेला रुग्ण चक्क २३ वर्षे जिवंत राहिला. यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर बर्नार्ड यांच्याबद्दलचा आदर कैकपटीनी वाढला. ह्र्दय प्रत्यारोपण करताना उपलब्ध दात्याचे हृदय घेता व्यक्तीच्या महाधमन्या व हृदयाचा निरोगी भाग तसाच ठेवून प्रत्यारोपण केले तर यशस्वी प्रत्यारोपण होण्याची शक्यता वाढते असे त्याच्या लक्षात आले. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे हृदय मिळवून हृदय बिघाड झालेल्या व्यकीच्या शरीरात बसवण्यामध्ये कमीत कमी वेळ लागण्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.
स्वरोपण व स्वजातिरोपणाबरोबर हृदयाच्या झडपांचे भिन्न रोपण म्हणजे मानवेतर प्राण्यांच्या झडपांच्या रोपणाची पद्धत बर्नार्ड यांनी सुरू केली. सध्या डुकराच्या झडपांचे मानवी झडपांमध्ये रोपण सर्रासपणे करण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबरोबर वार्धक्य प्रक्रिया लांबवण्याच्या उपायावर त्यांचे संशोधन चालू होते. त्यासाठी त्वचेवर लावण्याच्या महागड्या क्रीम प्रचलित करण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्या कारकीर्दीस उतरती कळा लागली. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये मिलान इंटरनॅशनल प्राइझ फॉर सायन्स, केनेडी फाउंडेशन ॲवॉर्ड आणि एमेरिटस प्रोफेसरचे पद यांचा समावेश आहे. संधिवातामुळे शस्त्रक्रिया करण्यावर मर्यादा आल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ओक्लाहामा अवयव रोपण विभागात संशोधन प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांचे आत्मचरित्र ख्रिस्तियान बर्नार्ड : वन लाइफ (Christiaan Barnard: One Life;१९६९), द सेकंड लाइफ (The Second Life; १९९३) आणि यू डोंट हॅव टु डाय (You Don’t Have To Die) ही पुस्तके गाजली.
बर्नार्ड यांचे सायप्रस मधील पेफॉस या शहरात निधन झाले.
कळीचे शब्द : #हृदयप्रत्यारोपण #पहिलीयशस्वीशस्त्रक्रिया #शल्यविशारद.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Christiaan_Barnard
- https://www.thefamouspeople.com/profiles/christiaan-barnard-428.php
समीक्षक – मोहन मद्वाण्णा