फ्लेमिंग, अलेक्झांडर  : (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५).

वैद्यक आणि जीवाणुशास्त्रज्ञ. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलीन (Penicillium) हे सूक्ष्म जीवाला मारणारे पहिले प्रतिजैविक (Antibody) ठरले. स्टॅफिलोकोकाय ऑरासखेरीज न्यूमोनिया (Pneumonia), घटसर्प (Diphtheria), स्कार्लेट ज्वर (Scarlet fever) यांचे रोगजीवाणूही पेनिसिलीन नष्ट करते असे त्यांनी सिद्ध केले. त्यांना पेनिसिलिनच्या शोधाबद्दल १९४५ साली शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक हॉवर्ड फ्लोरी (Howard Florey) आणि एर्न्स्ट बोरिस चेन (Ernet Boris Chain) यांसाेबत देण्यात आले.

फ्लेमिंग यांचा जन्म लाँचफील्डफार्म, स्कॉटलँड (Lochfield Farm, Darvel, Ayrshire, Scotland) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाउडन मूर (Loudoun Moor) येथे झाल्यावर ते १८९४ साली  किल्मारनॉक ॲकॅडेमी (Kilmarnock Academy) येथे दाखल झाले. १९९५ साली लंडन येथे आपल्या मोठ्या भावासोबत राहण्याकरिता स्थलांतरित होऊन त्यांनी रिजंट स्ट्रीट पॉलिटेक्निक (Regent Street Polytechnic) मधून मूलभूत शिक्षण पूर्ण केले. काही काळ जहाजांवर नोकरी केल्यावर शिष्यवृत्ती आणि आपल्या काकांकडून मिळालेल्या आर्थिक साहाय्याने त्यांनी सेंट मेरीज मेडिकल स्कूल मध्ये १९०१ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यास सुरूवात केली. तेथूनच त्यांना १९०८ साली लंडन युनिव्हर्सिटीतील सर्वोत्तम वैद्यकीय विद्यार्थी म्हणून सुवर्ण पदकाचा बहुमान मिळविला. सुरुवातीला त्याना शल्यचिकित्सक व्हावयाचे होते, परंतु सेंट मेरीज हॉस्पिटलमधील रोगप्रतिबंधक विभागातील प्रयोगशाळांमधील तात्पुरती स्थितीमुळे त्याचे भविष्य जीवाणुशास्त्राच्या (बॅक्टेरियोलॉजी; Bacteriology) नवीन क्षेत्रात आहे याची खात्री पटली. तेथे त्यांना जीवाणुशास्त्रज्ञ आणि प्रतिरक्षाशास्त्रज्ञ (Immunologist) सर अल्मरोथ एडवर्ड राइटच्या (Sir Almroth Edward Wright) यांच्या लस उपचार पद्धतीची कल्पना वैद्यकीय उपचारात क्रांतिकारक दिशा देतात असे त्यांना आढळले. तिथे शिकवत असताना आणि रोग्यांवर उपचार करत असताना त्यांना असेही आढळले की, कित्येक रोगी औषधोपचार सुरू नसतांनाही बरे होत. यावरून फ्लेमिंग यांनी निष्कर्ष काढला की, माणसाच्या शरीरात काही रोगप्रतिकारकशक्ती नैसर्गिक रीत्याच असावी.

पहिल्या महायुध्दात (१९०४-०८) फ्लेमिंग सैन्याच्या वैद्यकीय तुकडीत काम पाहू लागले. त्या काळी सैनिकांच्या जखमांवर इलाज म्हणून बोरिक आम्ल (Boric Acid), कार्बॉलिक अम्ल (Carbolic Acid), हायड्रोजन पेरॉक्साईड (Hydrogen Peroxide) या रासायनिक द्रव्यांचा पूतिनाशक (अँटिसेप्टिक; Antiseptic) म्हणून उपयोग केला जाई. परंतु या रसायनांमुळे केवळ पृष्ठभागावरील जखमांवर परिणाम होत असे. खोलवर झालेल्या जखमांवर दुष्परिणाम होत असे. या रसायनांमुळे पांढऱ्या पेशी नष्ट होत असल्याने नैसर्गिक प्रतिकारक क्षमतेवर देखील दुष्परिणाम होत असे.

युद्धावरून परतल्यावर सेंट मेरीज मध्ये शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर फ्लेमिंग यांनी संशोधन सुरू केले. या संशोधनात पांढऱ्या  पेशींसारख्या नैसर्गिक घटकांवर दुष्परिणाम न करता जीवाणू नष्ट करतील अशा घटकांचा शोध त्यांनी सुरू केला. त्यांनी सर्दी झालेल्या व्यक्तीच्या नाकातील स्रावामधून मायाक्रोकॉकस ल्युटस (Micro coccus lutes)  हा जीवाणू प्रयोगशाळेत वाढवला. त्यानंतर काही काळाने पेट्री प्लेटमधील जीवाणूंच्या वाढीचे निरीक्षण करत असताना फ्लेमिंग यांच्या नाकातील शेंबूड (Mucous Mucous) प्लेटवर पडला. प्लेटवरील जीवाणूंच्या वसाहती त्यामुळे नष्ट झाल्या. या नंतर त्यांनी रक्तद्रव्य (Serum), लाळ, अश्रू यांच्यावर देखील अशा प्रकारचे प्रयोग केले. पेट्री प्लेटवर ज्या ठिकाणी या स्रावांचा थेंब पडत असे तिथे मायाक्रोकॉकस ल्युटसमुळे ती वाढ रोखली जात असल्याचे आढळून आले. या सर्व प्रकारच्या स्रावांमधे एक समाईक घटक आढळला. तो घटक म्हणजे लायसोझाइम (Lysozyme). हे वितंचक (एंझाईम; Enzyme) होते. अशा तऱ्हेने शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देणारा नैसर्गिक घटक सापडला. परंतु इतर अनेक प्रकारच्या रोगजीवाणूंना लायसोझाइम नष्ट करू शकत नसल्यामुळे औषध म्हणून लायसोझाइमचा उपयोग मर्यादित आहे असे फ्लेमिंग यांच्या लक्षात आले.

फ्लेमिंग यांनी रजेवर जाताना स्टॅफिलोकॉकस ऑरास (Staphylococcus aureus) या जीवाणूंची वाढ असलेली पेट्री प्लेट प्रयोग शाळेत ठेवली होती. रजेवरून परत आल्यावर त्यांना त्या पेट्री प्लेटवर बुरशीची वाढ झालेली आढळली. या बुरशीच्या भोवती स्टॅफिलोकॉकस ऑरासची वाढ झालेली नव्हती. दूरवरच्या पेशी मात्र वाढल्या होत्या. यावरून बुरशीतल्या काही घटकांमुळे स्टॅफिलोकॉकस ऑरासच्या पेशी नष्ट झाल्या होत्या असे अनुमान फ्लेमिंग यांनी काढले. बुरशीमधे असलेले द्रव्य म्हणजे  हेच ते पेनिसिलीन. पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात मिळवण्यासाठी तसेच त्याचे गुणधर्म टिकून रहावेत यासाठी फ्लेमिंग यांच्या प्रयोगशाळेत प्रयोग केले गेले, परंतु त्यात यश आले नाही. अखेर ऑक्सफर्ड विद्यापीठातील हॉवर्ड फ्लोरी आणि एर्न्स्ट बोरिस चेन यांच्या नेतृत्वाखालील चमूने पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात मिळवले. त्यानंतर पेनिसिलिनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले आणि दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना होणाऱ्या  जंतुसंसर्गावर  पेनिसिलिनचे यशस्वी  उपचार करण्यात आले.

अमेरिकन उद्योगांनी फ्लेमिंगना आमंत्रित करून १ लाख डॉलरची गौरव रक्कम दिली. त्यांनी ती रक्कम त्यांच्या सेंट मेरीज मेडिकल स्कूलला दिली. तीस यूरोपीय आणि अमेरिकन विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली. टाईम साप्ताहिकानं त्यांची गणना विसाव्या शतकातल्या शंभर थोर वैज्ञानिकांत केली. त्यांची १९४३ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली व १९४४ मध्ये त्यांना सर हा किताब प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेले मानसन्मान पुढीलप्रमाणे : फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (इंग्लंड, १९०९) फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स (लंडन, १९४४) हंटेरियन प्राध्यापक (१९१९) सन्माननीय सुवर्णपदक, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (१९४६) कॅमरन पारितोषिक, एडिंबरो विद्यापीठ (१९४५) मॉक्सन पदक, रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स (१९४५) सुवर्णपदक, रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन (१९४७). त्यांनी सूक्ष्मजंतुशास्त्र, प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) व रासायनी चिकित्सा या विषयांवर वैद्यकीय व वैज्ञानिक नियतकालिकांतून अनेक निबंध लिहिले.

फ्लेमिंग यांचे निधन लंडन येथे झाले

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे