राळ (रेझीन), श्लेष्मल द्रव्य, म्युसिलेज, सुगंधी तेले, मकरंद, क्षीर अक्षिर व तत्सम पदार्थांच्या स्रवणाशी प्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या पेशीसमूहाला स्रावी ऊती म्हणतात. असे पेशीसमूह वनस्पतीच्या कोणत्याही भागात एकलपणे किंवा सुसंघटित अवयव रूपात आढळतात. यात दोन प्रकारांच्या ऊतींचा अंतर्भाव होतो. क्षीरयुक्त ऊती आणि ग्रंथीय ऊती

क्षीरयुक्त ऊती : अनेक सपुष्प वनस्पतींच्या खोड व मुळातील वल्कुटात शाखित नलिकांची पद्धती आढळते. या नलिकांत दुधासारखा पदार्थ भरलेला असतो. या रसाला क्षीर असे म्हणतात. क्षीर पिवळ्या रंगाचा किंवा रंगहीनदेखील असतो. यात दोन प्रकार आढळतात.

क्षीरयुक्त पेशी: रुई
क्षीरयुक्त वाहिन्या: पपई

(अ) क्षीरयुक्त पेशी : भ्रूण अवस्थेमध्ये ऊतीकर पेशी म्हणून या उत्पन्न होतात. वनस्पतीच्या वाढीबरोबर या पेशी लांब व शाखित होतात.  या पेशी बहुकेंद्री असतात. एकाच पेशीच्या वाढीने तयार होत असलेल्या शाखांचे जाळे मात्र तयार होत नाही. या पेशी सर्व अवयवांत दिसतात. कण्हेर, रुई, उंबर, पिंपळ, युफोर्बिया इ. वनस्पतींत अशा पेशी आढळतात. काही वनस्पतींत या पेशी शाखित होत नाहीत. उदा., सदाफुली.

(आ) क्षीरयुक्त वाहिन्या : या ऊती भ्रूणावस्थेत अनेक ऊतीकर पेशींपासून निर्माण होतात. पेशी लांब होतात व वाढ होताना त्यांच्यामधील अनुप्रस्थ भित्ती नष्ट होतात. अशा प्रकारे अनेक पेशींपासून तयार होणाऱ्या नलिकांना शाखा फुटतात. या शाखा विविध अवयवात परस्परांशी मिसळून एक प्रकारचे जाळे तयार करतात. याही बहुन्यष्ठीय असतात. पॅपॅव्हरेसी  कुलातील अफू व पिवळा धोतरा या वनस्पतींत तसेच पपई, केळी, रबर इ. वनस्पतींत त्या आढळतात. हेव्हिया  झाडातील क्षीरापासून रबर तर पपईच्या क्षीरापासून पेपेन हे विकर (एंझाइम) तयार करतात.

समीक्षक बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा