इसाउ, कॅथरिन : ( ३ एप्रिल, १८९८ – ४ जून, १९९७ )

कॅथरिन इसाउ यांनी मास्कोतील शेतकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. एक वर्षानंतर बोल्शेविक क्रांतीमुळे जर्मनीमध्ये जाऊन तेथील शेतकी महाविद्यालयामधून त्यांनी अभ्यास पूर्ण केला. मग त्या कॅलिफोर्नियामध्ये गेल्या. तेथे कॅथरिनने स्प्रेकेल्स साखर कंपनीमध्ये साखरेच्या बीटवरील कर्ली टोप विषाणूच्या प्रतिकारक्षमतेवर काम केले. त्यांनी पुढे डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली. त्याच विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त होईपर्यत नोकरी केली.

वनस्पती शारीर (Plant Anatomy) आणि आवृत्तबीजी वनस्पती  शारीर (Anatomy of Seeds Plants) ही त्यांची दोन पुस्तके गेली कित्येक दशके रचनात्मक जीवशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध आहेत. विषाणूचा वनस्पती ऊती आणि त्यांच्या विकासावर होणारा परिणाम यावर त्यांचे मूलभूत संशोधन आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डेव्हिस येथे त्यांनी हे काम केले . तेथेच शिक्षिका व प्राध्यापक म्हणून नोकरी केली. या काळात त्यांनी आपले संशोधन विषाणूंचा अधोवाही ऊतीवर होणारा परिणाम यावर केले. ‘अधोवाही ऊती’ हा त्यांचा प्रबंध जर्मन भाषेत पाच भागामध्ये प्रसिद्ध झाला. त्यांना अमेरिकन कला आणि शास्त्र ॲकेडमीने फेलो म्हणून निवडले. त्यांनी वर्मान चिडेल (Vemon Cheadle) या वनस्पतीशास्त्रज्ञासोबत अधोवाही ऊतीवर (Phloem) अधिक संशोधन केले. त्यांना नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेसचे सभासदत्व मिळाले. हा बहुमान मिळविणाऱ्या त्या सहाव्या महिला होत. त्या विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर सांता बार्बरा येथील शाखेत रुजू झाल्या. त्यांनी आपले संशोधन वयाच्या ९० वर्षांपर्यत चालू ठेवले. या कालावधीमध्ये त्यांची पाच पुस्तके आणि १६२ शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी नॅशनल मेडल ऑफ सायन्सेस देऊन त्यांचा गौरव केला. दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ बॉटनीकल सोसायटी ऑफ अमेरिकेतर्फे जीवशास्त्रामधील सर्वोत्कृष्ट शोध निबंध लिहिणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्याला कॅथरीन इसाउ पुरस्कार दिला जातो.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा