नागरी किंवा औद्योगिक वातावरणात नेहमीच एकापेक्षा जास्त वायुप्रदूषके असतात. त्यांचे एकत्रित परिणाम वनस्पतींवर कसे होतात याबद्दलची उपलब्ध माहिती क्षेत्र पहाणीवर आधारित आहे. प्रयोगशाळेत कृत्रिम रीत्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषक वायू निरनिराळ्या प्रमाणात मिसळून किंवा एकानंतर एक असे वनस्पतींवर सोडून त्यांचे परिणाम अभ्यासले गेले आहेत. हे प्रयोग जास्तकरून सल्फर आणि नायट्रोजन यांची ऑक्साइडे, सल्फर डाय-ऑक्साइड आणि ओझोन, सल्फर डाय-ऑक्साइड आणि फ्ल्युओराइड (आणि इतरही) अशा मिश्रणाचे मका, जव, टोमॅटो, कपाशी यांसारख्या पिकांवर परिणाम अभ्यासले गेले आहेत. हे परिणाम दोन्ही प्रदूषकांच्या परिणामांची बेरीज (Additive), बेरजेपेक्षा जास्त (Synergistic) आणि क्वचित प्रसंगी बेराजेपेक्षा कमी (Antagonistic) प्रमाणात आढळले आहेत. वनस्पतींतील चयापचय आणि जीवरासायनिक क्रिया, रन्ध्रांचे कार्य, प्रकाशसंश्लेषण क्रिया, वायूंची अदलाबदल, जलसंबंध, विकरांचे (एंझाइमांचे) कार्य यांवर प्रदूषक मिश्रणांचा दुष्परिणाम होताना आढळला आहे. हवेतील प्रदूषकांच्या मिश्रणामुळे होणारे पिकांवरील दुष्परिणाम या प्रयोगांद्वारे अधोरेखित झाले आहे.

कार्बन डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण आणि सल्फर डाय-ऑक्साइड यांच्या मिश्रणात  वेगळीच गोष्ट दिसून आली.एका प्रयोगात सोयाबीनच्या दोन जाती कार्बन डाय-ऑक्साइडच्या नैसर्गिक प्रमाणापेक्षा जवळजवळ दुप्पट, म्हणजे प्रतिलिटर ६०० मायक्रोलिटर प्रमाण ठेवलेल्या खोलीत वाढविल्या. त्यांना दररोज ८ तास प्रतिलिटर ०.०६ मायक्रोलिटर सल्फर डाय-ऑक्साइडची मात्रा दिली असता प्रदूषकामुळे होऊ शकणारे नुकसान वाढविलेल्या कार्बन डाय-ऑक्साइडमुळे कमी झाले, सोयाबीनच्या वाढीत भर पडली आणि प्रदूषकाचा विषारीपणा कमी होण्यास मदत झाली.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे  वाढत चाललेल्या हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण आणि त्याच वेळी वाढणाऱ्या प्रदूषणामुळे पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम यांची सांगड घालणे, या भविष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या विषयांवर बरेच संशोधन सुरू आहे.

संदर्भ :

  • Singh, D.S.,  Agrawal, M. Influence of elevated CO2 on the sensitivity of two soybean cultivars to sulphur dioxide; Environmental and Experimental Botany, 46: 81-91. Elsevier Publ., 2001.
  • Runeckles, V.C. Impact of Air Pollutant Combinations on Plants, In: Treshow, M. Air Pollution and Plant Life. John Wiley & Sons Ltd. Pp. 239-258., 1985.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा