संगणकात माहिती आणि प्रोग्रॅम यांची साठवण करावी लागते. साठवण करण्याच्या घटकांना मेमरी किंवा स्मृती किंवा स्टोरेज सिस्टीम असे म्हणतात. इनपूट साधनांद्वारे मिळालेल्या सूचनांनुसार या साठविलेल्या माहितीवर संस्करण केले जाते व संस्करीत माहिती आऊटपूट साधनांकडे पाठविली जाते. मूळ माहिती मात्र आहे त्याच ठिकाणी मेमरी चिप्सवर साठवून ठेवली जाते. या स्टोरेज सिस्टीमची वैशिष्टये खालीलप्रमाणे –

1)सहजप्राप्त – कमीतकमी वेळात स्टोरेज सिस्टीममधील माहिती वापरता आली पाहिजे.

2)पुरेशी मोठी – माहिती एका ठिकाणी साठवणे शक्य होते.

3)स्वस्त – या मेमरीची किंमत स्वस्त असावी. जेणेकरून त्याची खरेदी करणे शक्य होते.

4)सुरक्षित व विश्वसनीय – साठवलेली माहिती सुरक्षित राहणे आवश्यक आहे. ती नाहीशी न होण्याची     हमी असली पाहिजे यालाच सुरक्षितता असे म्हणतात. याचबरोबर ज्या पध्दतीची माहिती साठवलेली असते त्याच स्वरूपात संपूर्ण माहिती उपलब्ध झाली पाहिजे. यालाच विश्वसनीयता असे म्हणतात.

मेमरी किंवा स्टोरेज क्षमता ही बाईट या एककात मोजतात. बाईट हे एकक खूपच लहान असलेले किलोबाइट, मेगाबाइट व गेगाबाइट या एकाकांचा वापर करून मेमरी सांगितली जाते. त्याचे परस्पर रूपांतर खालीलप्रमाणे –

1 किलोबाइट =1024 बाईट

1 मेगाबाइट =1024 किलोबाइट

1 गेगाबाइट =1024 मेगाबाइट

संगणकात प्रामुख्याने दोन प्रकारच्या मेमरी वापरण्यात येतात.  1)प्रायमरी मेमरी,       2)सेकंडरी मेमरी

1)प्रायमरी मेमरी -(Primary memory)

प्रायमरी किंवा इंन्टरनल मेमरी ही संगणकाच्या मदर बोर्डवर बसवलेली असते. ही मेमरी मध्यवर्ती प्रक्रिया विभाग (CPU) च्या जवळ असून ती सहज प्राप्त होते. काही मर्यादेपर्यंत ही मेमरी वाढवता येते. प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार असतात.

(अ) तात्पुरती माहिती संग्रहण/ रॅम(RAM)

यालाच रॅम असे देखील म्हणतात. यामध्ये मध्यवर्ती प्रक्रिया विभाग (CPU) प्रक्रिया करीत असलेला डेटा असतो. याचा वापर तात्पुरत्या माहिती संग्रहणासाठी होतो. कोणतीही माहिती टाईप केली की ती सुरवातीला रॅम मध्ये संग्रहीत होते आणि हे काम चालू असताना वीजपुरवठा खंडित झाला तर डेटा नाहीसा होतो. हा धोका टाळण्यासाठी डेटा सेकंडरी मेमरीमध्ये वारंवार सेव करावा लागतो. रॅममधील माहिती केव्हाही पुसता अथवा लिहिता येते. याचबरोबर रॅमच्या चीपवर लिहिता किंवा वाचता येते.

(ब) कायमस्वरूपी माहिती संग्रहण/ रॉम (ROM)

यालाच Read Only Memory (रॉम)देखील म्हणतात. याचा कायमस्वरूपी माहिती संग्रहणासाठी वापर केला जातो. ही माहिती सहसा बदलता येत नाही. अगदी खास परिस्थितीत ही माहिती बदलता येते. यातून माहिती फक्त वाचता येते. यात माहिती लिहिता येत नाही. संगणक वापराच्या संदर्भातील विशेष सूचना रॉम चिप्समध्ये असतात. म्हणजेच संगणकाने कार्य करावे याबद्दलच्या विशेष सूचना रॉम चिप्समध्ये असतात.

2) सेकंडरी मेमरी -(Secondary memory)

या मेमरीमध्ये साठवलेली माहिती कायमस्वरूपी असते. संगणक बंद केला किंवा वीज खंडित झाली तरीही यावरील माहिती पुसली जात नाही. एका संगणकातील माहिती दुसऱ्या संगणकात पाठविण्यासाठी या प्रकारच्या मेमरीचा उपयोग केला जातो. यासाठी विविध प्रकारची उपकरणे वापरली जातात. ती खालीलप्रमाणे आहेत –

(अ) फ्लॉपी डिस्क –(Floppy disk)

फ्लॉपी डिस्क ही प्लॅस्टिकची पातळ गोलाकार फिल्म असते. ज्यावर मॅग्नेटिक मटेरियलचा थर दिलेला असतो. ती खराब होऊ नये म्हणून चौकोनी आकाराच्या आच्छादनात ठेवलेली असते. फ्लॉपी डिस्क वर्तुळावर 80 ट्रॅक असतात. या ट्रॅकना छेदणारे उभे 8 सेक्टर्स असतात. मधोमध एक गोलाकार जागा असते ज्यामुळे फ्लॉपी आतल्याआत गोल फिरवता येते. तसेच एक आयताकृती खिडकी असते जिचा उपयोग माहिती वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी केला जातो. जर डिस्कवर लेखन प्रक्रियेला प्रतिबंध करायचा असेल तर ही खिडकी/फट बंद करण्यासाठी एका बटणाची व्यवस्था केलेली असते. ही फट बंद केल्यास संगणकाला माहिती फक्त वाचता येते. त्यावर लिहिता येत नाही.

(ब) कॉम्पॅक्ट डिस्क ( सीडी ) (Compact disc)

फ्लॉपी डिस्कमध्ये 1.44 मेगाबाइट इतकी माहिती साठवता येते तर कॉम्पॅक्ट डिस्क मध्ये 650 मेगाबाइट इतकी महिती म्हणजे 450 पटीने जास्त माहिती साठविता येते. ही एक पातळ गोलाकार चकती असते. या डिस्कचा उपयोग सिनेमाची दृष्य व ध्वनी यांच्या रेकॉर्डींगसाठी केला जातो. डिस्कवरील माहिती प्राप्त करण्यास कमी वेळ लागतो. त्याचबरोबर क्रमानेच माहिती घेतली पाहिजे अशी अट नसते. उदा.आपणांस सीडी वरचे 105 नंबरचे गाणे ऐकायचे असल्यास ते आपण कोणत्याही वेळी ऐकू शकतो. लेसर किरणांच्या साहाय्याने धातूच्या पृश्ठभागावरील मजकूर नोंदविला व वाचता येतो. सीडीची संग्रहणक्षमता खूपच आहे त्यामानाने त्या स्वस्त आहेत.

(क) यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह –(USB flash drive)

यालाच पेन ड्राइव्ह असेही म्हणतात. याचा आकार लहान पेनासारखा असतो. ही एक पोर्टेबल मेमरी असून ती संगणकाच्या यूएसबी पोर्टमध्ये प्लग करता येते. एका संगणकातील माहिती दुसऱ्या संगणकात ने-आण करण्यासाठी खूपच सोईस्कर असते. याचा खिशात घालून सहजपणे इकडून तिकडे नेण्यासाठी वापर करता येतो. याचे आयुष्य खूप जास्त असते कारण याचा वापर करताना प्रत्यक्ष संगणकात याचा कोणताही भाग फिरत नाही अथवा हलत नाही. सध्या या उपकरणाचा सर्रासपणे वापर केला जातो. यासाठी संगणकाला यूएसबी पोर्ट असणे मात्र आवश्यक असते.

समीक्षक रत्नदीप देशमुख

प्रतिक्रिया व्यक्त करा