धार्मिक श्रमण काव्य-ग्रंथ. अर्धमागधी प्राकृत भाषेमध्ये रचलेल्या या ग्रंथाचा समावेश आगम ग्रंथांमधील मूलसूत्रांमध्ये होतो. महावीरांनी आपल्या जीवनाच्या उत्तरकाळात निर्वाणाच्या आधी जो उपदेश केला, त्याचे संकलन या ग्रंथात केले आहे अशी मान्यता आहे. उत्तराध्ययन हा शब्द उत्तर-अध्ययन-सूत्र या तीन शब्दांपासून तयार झाला आहे. उत्तर शब्दाचे तीन अर्थ आहेत – प्रधान, पश्चाद्भावी आणि प्रश्नाचे उत्तर.पहिल्या अर्थानुसार ज्याचे अध्ययन उत्तरोत्तर प्रधान (श्रेष्ठ) आहे तो ग्रंथ उत्तराध्ययन होय. दुसऱ्या अर्थानुसार आचारंगादी अंगांनंतर वाचला जाणारा हा उत्तराध्ययन ग्रंथ होय. न विचारलेल्या प्रश्नांचेही उत्तर देणे हा तिसरा अर्थ होय. या तीनही अर्थांपैकी दुसरा पश्चाद्भावी हा अर्थ जास्त योग्य वाटतो. एक मान्यता अशी पण आहे की या ग्रंथाची रचना आचारंगादी नंतर केली गेली म्हणून या ग्रंथाचे नाव उत्तराध्ययन आहे. अध्ययन शब्दाचा अर्थ अभ्यास करणे असा असला तरी उत्तराध्ययन या ग्रंथामध्ये तो परिच्छेद (प्रकरण/अध्याय) या अर्थाने वापरला आहे. या ठिकाणी सूत्र हा शब्द गाथा या अर्थाचाच सूचक आहे. या ग्रंथामध्ये एकूण ३६ अध्ययन आहेत. या अध्ययनांच्या विषयानुसार या ग्रंथाची  तीन भागांमध्ये विभागणी केली जाते. – १) सैद्धांतिक/आचार २) नैतिक / सुभाषितात्मक ३) कथात्मक.

१) सैद्धांतिक – समिती (सम्यक रूपाने प्रवृत्ती करणे), लेश्या (जी कर्माला आत्म्याशी लिप्त करते) ब्रह्मचर्य, प्रमादस्थान, तपश्चरण, सम्यग्दर्शन, मोक्षमार्ग, जीवाजीवाचे विभाजन, चर्याचे नियम, समाधी, स्वाध्याय अशा अनेक सैद्धांतिक विषयांचा समावेश या ग्रंथातील अध्ययनांमध्ये केलेला दिसून येतो. आंतरिक संवेदना आणि बाह्य संयोग-वियोगामुळे निर्माण झालेले सर्व प्रकारचे कष्ट व दु:खे समतापूर्वक सहन करणे म्हणजे परीषह होय. परीषह २२ प्रकारचे आहेत. याचे वर्णन परीसहा (परिषहा) या दुसऱ्या अध्ययनामध्ये केलेले दिसून येते. कम्मपयडी (कर्मप्रकृति:) या अध्ययनामध्ये कर्माच्या ८ प्रकारांचे अर्थात ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय कर्म यांचे वर्णन येते. २) नैतिक / सुभाषितात्मक – या विभागामध्ये विनय, श्रद्धा, मनुष्यता, पवित्रता, सुसंस्कृत जीवन, यज्ञाची अहिंसात्मक व्याख्या, कर्तव्यकार्य तसेच धर्माचरण यांचा समावेश होतो. विनयसुत्तामध्ये नैतिकतेविषयी एक सुंदर गाथा आली आहे ती अशी – नापुट्ठो वागरे किंचि पुट्ठो वा नालियं वए | कोहं असच्चं कुव्वेज्जा धारेज्जा पियमप्पियं || १.१४. अर्थात विचारले नसताना काहीही बोलू नये किंवा विचारले असता खोटे बोलू नये. क्रोध आल्यास त्याला निष्फळ करावे व प्रिय आणि अप्रिय गोष्टी सहन कराव्यात. ह्या गाथेतून केवळ मुनिंसाठी उपदेश दिला आहे असे नाही तर सामान्य माणसालाही हा उपदेश लागू पडतो. अशा अनेक गाथा/सुभाषिते विनयश्रुत, चतुरंगीय, असंस्कृत, एलक, यज्ञीय, सामाचारी आणि खलुङ्कीय या अध्ययनांमध्ये आलेले दिसून येतात. ३) कथात्मक – कपिलमुनी, नेमी, हरिकेशी, चित्तसंभूती, इषुकार, संयती, मृगापुत्र, समुद्रपालित, रथनेमी तसेच केशी-गौतम यांच्या कथा अनुक्रमे पुढील अध्यायांमध्ये आलेल्या दिसून येतात – कापिलिक, नमिप्रव्रज्या, हरिकेशीय, चित्तसंभूतीय, इषुकारीय, संयतीय, मृगापुत्रीय, महानिर्ग्रंथीय, समुद्रपालीय, रथनेमीय आणि केशिगौतमीय. या कथांच्या आणि संवादाच्या माध्यमातून धार्मिक आणि दार्शनिक विषय समजून सांगितले आहेत, जसे – इंद्र-नमी संवादामध्ये प्रव्रज्येच्या वेळी निर्माण होणाऱ्या अंतर्द्वन्द्वाचे समाधान, हरिकेशी आणि ब्राह्मणाच्या संवादामध्ये यज्ञाची अध्यात्मिक व्याख्या, मृगापुत्र आणि त्याचे माता-पिता यांच्यात होणाऱ्या संवादातून साधूंच्या आचाराचे  प्रतिपादन इ. काही संवाद समाजोपयोगी आणि प्रभावशाली आहेत, जसे – अनाथी मुनी आणि राजा श्रेणिक यांच्यामध्ये झालेला अनाथ विषयक संवाद, भ्रगुपुरोहित आणि त्याचे दोन पुत्र यांच्यामध्ये झालेला आत्म्याच्या अस्तित्व विषयक संवाद, भ्रगुपुरोहित आणि त्याच्या पत्नीमध्ये झालेला दीक्षा विषयक संवाद, केशी आणि गौतमामध्ये झालेला पतिव्रतानारी विषयक संवाद.

काव्याच्या दृष्टीने उत्तराध्ययन या ग्रंथामध्ये  उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अर्थान्तरन्यास या अलंकारांचा वापर झालेला दिसतो, जसे –

दुम पत्तय पंडुयए जहा निवडइ राइगणाण अच्चए |एवं मणुयाण जीवियं समयं गोयम ! मा पमायए || १०.१

“ज्याप्रमाणे अनेक रात्री निघून गेल्यावर झाडावरील पिकलेले पान गळून पडते, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनाचा शेवट होतो, म्हणून हे गौतमा, क्षणभर सुद्धा निष्काळजी राहू नकोस.” या गाथेमध्ये पिकलेल्या पानाची उपमा मनुष्याच्या जीवनाला देऊन मनुष्याच्या जीवनाची नश्वरता सांगितली आहे.

उत्तराध्ययन या ग्रंथाचे दार्शनिक महत्त्व जाणून या ग्रंथावर अनेक टीकाही लिहलेल्या आहेत. सर्वप्रथम भद्रबाहू द्वितीय (वीरनिर्वाण ६ वे शतक ) यांची टीका निर्युक्ती आहे तर जिनदासगणी महत्तर (ई. स.६ वे शतक) यांची चूर्णी आहे. याशिवाय वादिवेताल शान्तिसूरी (११वे शतक) यांनी  शिष्यहिता- टीका बृहद्-वृत्ती नावाची टीका लिहिली आहे तर नेमिचन्द्राचार्य (११वे शतक) यांनी सुखबोधा-टीका किंवा वृत्तिची संस्कृत-गद्य रचना केली आहे. याशिवाय लक्ष्मीवल्लभ, जयकीर्ती, कमलसंयम, भावविजय, विनयहंस, हर्षकुल इ. अनेक विद्वानांनी या ग्रंथावर टीका लिहलेल्या आहेत. अशा प्रकारे उत्तराध्ययन या ग्रंथावर लिहिल्या गेलेल्या या विपुल टीकासाहित्यावरून उत्तराध्ययन या ग्रंथाचे महत्व आणि लोकप्रियता अधोरेखित होते.

उत्तराध्ययन या काव्याचे जर्मन, इंग्रजी, हिन्दी, गुजराती, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले दिसते. शार्पेन्टियर( इंग्रजी), याकोबी (जर्मन भाषांतरांचा इंग्रजी अनुवाद), आर. डी. वाडेकर,एन. व्ही. वैद्य, भोगीलाल सांडेसरा (गुजराती अनुवाद), आत्मारामजी, आचार्य तुलसी (हिन्दी अनुवाद), आल्सडोर्फ इत्यादी तज्ञांचे त्याकामी योगदान आहे.

संदर्भ :

  • जैन, डॉ. सुदर्शनलाल  सोहनलाल (संपा), उत्तराध्ययन-सूत्र : एक परिशीलन, मोहनलाल मेहता, जैनधर्म प्रचारक समिती, अमृतसर, १९७०.
  • नेमिचंद्रशास्त्री, प्राकृत भाषा और साहित्य का आलोचनात्मक इतिहास, तारा बुक एजेन्सी, वाराणसी, १९८८.

समीक्षक – कमलकुमार जैन

प्रतिक्रिया व्यक्त करा