आचारांगसूत्र : प्राकृत साहित्यातील अर्धमागधी आगम परंपरेमधील एक ग्रंथ. १२ आगम ग्रंथांमधील पहिला ग्रंथ असल्याने या ग्रंथाची भाषा आणि सूत्रशैली प्राचीन असून याचे आगम साहित्यात स्थान महत्त्वाचे आहे. याला सर्व अंगग्रंथांचे सार म्हटले जाते. याला “सामायिक” असे देखील म्हणतात. साधू आणि साध्वी यांच्या आचार-विचाराचे या ग्रंथामध्ये विस्ताराने वर्णन केले आहे. या ग्रंथाची विभागणी दोन श्रुतस्कंधांमध्ये केली आहे. पहिल्या श्रुतस्कंधाला बंभचेर अर्थात ब्रह्मचर्य असे म्हणतात. यामध्ये ९ अध्ययने आहेत. म्हणून या श्रुतस्कंधाला नवब्रह्मचर्य हे नाव प्रचलित आहे. यामध्ये ४४ उद्देशक आहेत. दुसऱ्या श्रुतस्कंधामध्ये १६ अध्ययने आहेत; जी चार चूलिकांमध्ये विभागलेली आहेत. दोन्ही श्रुतस्कंधाचे विषय, वर्णन शैली यांचा विचार केला असता पहिला श्रुतस्कंध हा प्राचीन आहे. दुसरा श्रुतस्कंध नंतर चूलिका रूपात त्याला जोडला आहे. हे सूत्र गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारचे आहे. काही गाथा अनुष्टुभ छंदात रचलेल्या आहेत. “एवं मे सुयं” (असे मी ऐकले आहे) अशी यातील प्रत्येक विषयाची सुरुवात होते. तसेच “त्ति बेमि” (असे मी सांगतो) असा प्रत्येक उद्देशकाचा शेवट होतो. अशाप्रकारची रचना ही भाषेची प्राचीनता दर्शवते.

कल्पित चित्र

प्रथम श्रुतस्कंधातील पहिले अध्ययन “शस्त्रपरिज्ञा” असून त्यात हिंसेचा निषेध केला आहे. या मध्ये सात उद्देशक आहेत. पृथ्वीकाय इत्यादी सहा जीवनिकायांच्या सरंभ-समारंभ-आरंभ यांची चर्चा या अध्ययनात केली आहे. दुसऱ्या “लोकविजय” नावाच्या अध्ययनात सहा उद्देशक असून त्यामध्ये अप्रमाद, अज्ञानी, धनसंग्रहाचे परिणाम यांचे वर्णन आहे. लोकविजय म्हणजे या लोकांवर अर्थात संसारावर विजय प्राप्त करणे. संसाराचे मूळ कारण असणाऱ्या क्रोध, मान, माया, लोभ या चार कषायांवर विजय मिळवणे. या अध्ययनाचा मुख्य उद्देश वैराग्य तसेच संयम दृढ करणे, उपभोगाची आसक्ती कमी करणे, हिंसेचा त्याग करणे असा आहे.

“शीतोष्णीय” नावाच्या तिसऱ्या अध्ययनात चार उद्देशकांमध्ये विरक्त मुनींचे स्वरूप, सम्यकदर्शी याचे लक्षण, कषायांचा त्याग यांचे वर्णन आहे. शीत म्हणजेच शीतलता, सुख त्याचा त्याग करणे आणि उष्ण म्हणजे परीषह, दुःख हे सहन करण्याबद्दलचा उपदेश आहे. त्यामुळे अध्ययनाला हे नाव सार्थ आहे. “सुत्ता अमुणी, सया मुणिणो जागरंति” – अमुनी हे निद्रिस्त असतात आणि मुनी सदा जागृत असतात. “सम्यक्त्व” नावाच्या चौथ्या अध्ययनामध्ये चार उद्देशक असून त्यामध्ये अहिंसा, देहदमन, संयम इ. चे विवेचन आहे. हा अध्याय सम्यक्त्व म्हणजेच श्रद्धा प्राप्त करण्यास मदत करणारा आहे. आत्म्याला संयमात स्थिर करण्याचा उपदेश ह्या अध्ययनातून मिळतो.

“लोकसार” नावाचे पाचवे अध्ययन सहा उद्देशकांनी युक्त आहे. यामध्ये हिंसा करणारे, अहिंसेचे पालन करणारे, परिग्रह करणारे, अपरिग्रह करणारे यांचे वर्णन आहे. बाह्य शत्रूंपेक्षा आतील शत्रूंचा विनाश करणे महत्त्वाचे सांगितलेले आहे. इंद्रियांना उत्तेजना देणारा आहार वर्ज्य करण्यास तसेच इंद्रियांवर ताबा राहत नसेल तर आहाराचा संपूर्णपणे त्याग करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर स्त्रियांपासून लांब राहण्याचा उपदेश केला आहे.

“धूत” नावाच्या सहाव्या अध्ययनात पाच उद्देशक असून तृष्णा नष्ट करण्याबद्दल यामध्ये उपदेश केला आहे. देहासंबंधी उपभोगांबाबत जी तृष्णा व त्यावरील उपाय तसेच ती नष्ट करण्याबद्दल या अध्ययनात विवेचन केले आहे. “महापरिज्ञा” नावाचे सातवे अध्ययन आता उपलब्ध नाही. पण यावरील निर्युक्ती उपलब्ध आहे. “विमोक्ष” नावाचे आठवे अध्ययन मोठे असून त्यात आठ उद्देशक आहेत. विमोक्ष म्हणजे मोहापासून किंवा लोभापासून वेगळे होणे. ज्या साधूंचा आचार आपल्या आचाराशी जुळणारा नाही त्याची संगत सोडणे व आहार, पाणी, वस्त्र इ. दूषित असेल तर त्याचा त्याग करण्यास सांगितले आहे. संलेखना विधी, समाधिमरण यांचे वर्णन या अध्यायात केले आहे.

या श्रुतस्कंधातील नववे “उपधानश्रुत” हे अध्ययन खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये भगवान महावीर यांच्या कठोर तपश्चर्या आणि साधनेचे वर्णन आहे. उपधान म्हणजेच तप. यामध्ये चार उद्देशक असून पहिल्या उद्देशकामध्ये महावीरांनी दीक्षा घेतल्यानंतर त्यांना काय काय सहन करावे लागले याचे वर्णन केले आहे. कुत्र्यांनी महावीरांची लचके तोडले, तीन तीन महिने ध्यानस्थ बसल्यामुळे किड्यांनी त्यांच्या अंगावर वारूळ तयार केले. लोकांनी महावीरांना खूप त्रास दिला. दुसऱ्या आणि तिसऱ्या उद्देशकामध्ये महावीर कुठे कुठे राहिले, तेथे त्यांना काय त्रास झाला याचे वर्णन केले आहे. महावीर निर्जन स्थानी आणि कोणत्या उपाश्रयांमध्ये राहिले यांचे वर्णन आहे. चौथ्या उद्देशकामध्ये महावीरांच्या साधनेच्या काळातील आहार, विहार, आचार यांचे वर्णन आहे.

दुसऱ्या श्रुतस्कंधात पाच चूलिका असून त्यापैकी चार चूलिका आचारांग सूत्रामध्ये समाविष्ट केल्या आहेत आणि पाचवी चूलिका निशीथसूत्र नावाने प्रसिद्ध आहे. या पाचव्या चूलिकेला आचारकल्प अथवा आचारप्रकल्प असेही म्हणतात. यामध्ये साधू-साध्वी यांचा आहार, वसती, गमनागमन, भाषा, वस्त्र, पात्र यासंबंधी विवेचन आहे. तसेच स्वाध्यायाच्या जागेसंबंधी, मल-मूत्र त्यागसंबंधी नियमांचा विचार आहे. याचसोबत महावीरांचे चरित्र आणि महाव्रताच्या पाच भावना यांचे विवेचन आहे. विमुक्ती नावाच्या चूलिकेमध्ये मोक्षाचे पद्यात विवरण आहे.

“अंगाणं किं सारो ? आयारो” – आचारांग याला अंगांचे सार म्हटले आहे. इतके महत्त्वाचे सूत्र असल्यामुळे ह्यावर तेवढ्याच प्रमाणात वृत्ती, टीका, भाष्य लिहिले गेले आहे. त्यापैकी आज उपलब्ध साहित्यामध्ये आचारांगसूत्रावर भद्रबाहू यांची निर्युक्ती, जिनदासगणींची चूर्णी व शीलांक यांची टीका उपलब्ध आहे. शीलांक यांच्या टीकेमध्ये नागार्जुन यांनी केलेली वाचना तसेच इतर झालेल्या वाचनांतील पाठभेदांचा उल्लेख केलेला आहे. हर्मन याकोबी यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला आहे.  सेक्रेड बुक्स ऑफ द इस्ट  या ग्रंथमालेतील २२व्या भागामध्ये आचारांगसूत्राचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला आहे.  तसेच हिंदी, गुजराथी व पंजाबी या भारतीय भाषांमध्येदेखील भाषांतर झाले आहे.

संदर्भ :

  • जैन, जगन्नाथ ; मेहता, मोहनलाल, जैन साहित्यका बृहद् इतिहास – भाग १, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९६६.
  • मुनी नथमल (संपा), अंगसुत्ताणि – भाग १, आगम और साहित्य प्रकाशन, जैन विश्वभारती, १९७४.

समीक्षक : कमलकुमार जैन