लेव्हेनहूक, आंतॉन व्हान : (२४ ऑक्टोबर १६३२ — २६ ऑगस्ट १७२३).
डच सूक्ष्मदर्शकीविज्ञ व जीववैज्ञानिक. सूक्ष्मदर्शकाचा वापर करून त्यांनी सर्वप्रथम जीवाणू (Bacteria) आणि प्राेटोझोआ (Protozoa) पाहिले असल्याचे श्रेय जाते. त्यांच्या सूक्ष्म प्राण्यांच्या संशोधनामुळे नवपिढीने मांडलेल्या संशोधनाला नाकारले आणि त्यांच्या निरीक्षणामुळेच जीवाणुशास्त्र (Bacteriology) आणि प्रोटोझोऑलॉजी (Protozoology) या शास्त्रांचा पाया रचला गेला.
लेव्हेनहूक यांचा जन्म डच रिपब्लिकमधील डेल्फ्ट (Delft) या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वॉर्मोंड (Warmond) या गावी झाले. ते पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. नंतर ते काही काळ काकांकडे वाढले. काका व्यवसायाने वकील होते. वयाच्या सोळाव्या वर्षी ते अॅम्स्टरडॅमला एका कापड व्यापाराकडे मुनीम म्हणून उमेदवारी करू लागले. तिथे त्यांनी भिंग प्रथमच पाहिले. व्यापारी माणसे भिंगाचा वापर कापडाची वीण आणि पोत तपासण्यासाठी करत. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते डेल्फ्टमधे परत आले (१६५४) आणि त्यांनी स्वतःचा कपडेपटाचा व्यवसाय सुरू केला. १६६० मध्ये त्यांना डेल्फ्टमध्येच प्रशासनात आर्थिक बाबी हाताळण्याचे पद देण्यात आले. सदर पद त्यांनी जवळपास ४० वर्षे सांभाळली. अशापद्धतीने त्यांचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित झाल्याने त्यांनी त्यांचा बहुतांश वेळ भिंग तासणे या छंदाकरिता आणि सूक्ष्म प्राणी-जीवजंतू अभ्यासण्यास घालविला. त्यांनंतर हॉलंडच्या न्यायालयाने त्यांची भूमी सर्वेक्षणकर्ता म्हणून नेमणूक केली (१६६९). सोबतच डेल्फ्ट मधील दारू आयात आणि कर आकारणीसाठी प्रशासनातील वाईन-गॉगर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. लंडनमधे असताना त्यांनी रॉबर्ट हुक (Robert Hook) यांनी लिहिलेले मायक्रोग्रॅफिया हे पुस्तक पाहिले (१६६८). त्या पुस्तकात हुक यांनी दोन भिंगाच्या सूक्ष्मदर्शकाची माहिती देऊन दिसलेले कीटक व त्यांचे अवयव दाखवले होते. हे पुस्तक त्या काळात खूप गाजले होते. त्या पुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून लेव्हेनहूक यांनी सूक्ष्मदर्शक यंत्र तयार केले.
लेव्हेनहूक यांचे सूक्ष्मदर्शक यंत्र एका भिंगाचे आणि साडे सात ते साडे बारा सेंमी. लांबीचे होते. नमुना निरीक्षणासाठी ते डोळ्यांना अगदी धरून पहावे लागे. तांबे किंवा चांदीच्या पट्टीमधे असलेल्या अती सूक्ष्म छिद्रात भिंग बसवलेले असे आणि सूर्याच्या दिशेने या भिंगातून पहावे लागे. भिंगाच्या पलिकडल्या बाजूला एका सुईच्या टोकावर नमुना (सँपल; sample) ठेवला जाई. नमुना बारकाव्यांसहित पहाता यावा यासाठी स्क्रूच्या साहाय्याने पुढे मागे केला जाई. त्यातून नमुना दोनशे ते तीनशे पट मोठा दिसे. हुक यांच्या सूक्ष्मदर्शकाची वर्धनक्षमता (magnifying power) वीस ते तीस पट होती. लेव्हेनहूक यांनी विविध वर्धनक्षमतांचे दोनेकशे सूक्ष्मदर्शक तयार केले.
लेव्हेनहूक यांनी १६७३पासून पुढील पन्नास वर्षें आपली निरीक्षणे लंडनच्या रॉयल सोसायटीला पाठवली. लेव्हेनहूक यांचे विद्यापीठीय शिक्षण झालेले नसल्याने त्यांना लॅटिन भाषा येत नव्हती. ते त्यांची निरीक्षणे डच भाषेत लिहीत. रॉयल सोसायटी त्यांचे इंग्रजी व लॅटिनमधे भाषांतर करीत असे. ती निरीक्षणे‘ फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स ऑफ रॉयल सोसायटीमध्ये प्रसिद्ध झाली. रॉबर्ट हुक यांनी पाहिलेले मधमाशीची नांगी, बुरशी, पिसवा यांचे नमुने लेव्हेनहूक यांनी पुन्हा निरीक्षण केले. या खेरीज पाण्यातले जीवाणू, तलावातील स्पायरोगायरा शैवाल, आदिजीव, मातीतले जीवाणू, स्नायूंच्या उती, वनस्पतींचे भाग, दातावरचे टार्टर, लाल रक्तपेशी असे अनेक नमुने त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले. त्या नमुन्यांची हालचालही त्यांनी पाहिली. या जीवाणू-आदिजीव अशा सूक्ष्मजीवांना त्यांनी छोटे प्राणी (Animalcule) असे नाव दिले. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलेल्या नमुन्यांचे अचूक, यथार्थ वर्णन ही त्यांची खासियत होती. सुरुवातीला लेव्हेनहूक यांनी केलेल्या वर्णनांवर सर्वत्र अविश्वास दाखवण्यात आला, जाहीर थट्टा आणि टिंगलही करण्यात आली. लेव्हेनहूक यांच्या आग्रहाखातर रॉयल सोसायटीने मान्यवर व्यक्तींना त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन निरीक्षणांचा खरेखोटेपणा तपासायला सांगितले. अखेर १६७७मध्ये रॉयल सोसायटीने त्यांच्या या अभ्यास निरीक्षणांना मान्यता दिली. १६८० मध्ये रॉयल सोसायटीने त्यांना मानद सदस्यत्व दिले. आपल्याला रॉयल सोसायटीने वैज्ञानिक मानले आहे असे मानून लेव्हेनहूक समाधान पावले.
लेव्हेनहूक यांचे स्नायू अनैच्छिकरीत्या आखडत असत. ही एक अत्यंत क्वचित आढळणारी व्याधी होती. या व्याधीची लक्षणे आणि निरीक्षणे लेव्हेनहूक रॉयल सोसायटीला इतक्या नेमकेपणाने कळवली की या रोगाला रॉयल सोसायटीने लेव्हेनहूक व्याधी हे नाव दिले.
लेव्हेनहूक यांचे डेल्फ्ट येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #भिंग #सूक्ष्मजीवशास्त्रजनक #रॉबर्टहुक #लेव्हेनहूकसूक्ष्मदर्शक
संदर्भ :
Stainer, R. Y., Adebers, E. A., Ingraham, J.J., The microbial world 4th edition.
समीक्षक – रंजन गर्गे