फिशर, एर्न्स्ट ओटो : (१० नोव्हेंबर १९१८ – २३ जुलै २००७).

जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी धातू आणि कार्बनी पदार्थ एकत्र करण्याची नवी पद्धत विकसित केल्यामुळे १९७३ सालातील रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जिऑफ्री विल्किन्सन यांच्यासोबत विभागून मिळाले. त्यांनी कोबाल्टोसीन (Cobaltocene), निकेलोसीन (Nickelocene) ही कार्बनी-धातू संयुगे तयार केली.

फिशर यांचा जन्म जर्मनीतील म्यूनिक येथे झाला. त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी म्यूनिक विद्यापीठात रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा असल्यामुळे त्यांना सैन्यात दोन वर्षे सक्तीची नोकरी करावी लागली. युद्ध संपल्यावर त्यांनी म्यूनिक विद्यापीठात पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. पुढे त्यांची म्यूनिक विद्यापीठातील अकार्बनी रसायनशास्र संस्थेमध्ये प्रा. वॉल्टर हायबर (Walter Hieber) यांचे वैज्ञानिक साहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फिशर यांनी डायथिओनाईटस (Dithionites) आणि सल्फॉक्झॅलेट (Sulfoxylates) या पदार्थांबरोबर कार्बन मोनॉक्साईडच्या निकेल-II क्षार यांच्यातील रासायनिक अभिक्रिया या विषयात विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली (१९५२). अकार्बनी रसायनशास्र संस्थेत फिशर यांनी संक्रामक मूलद्रव्ये (Transition Element) आणि कार्बनी-धातू रसायनशास्त्र (Organometallic Chemistry) या विषयांचा अभ्यास केला. या संस्थेत त्यांनी धातू संमिश्रे सायक्लोपेंटाडाईन आणि इंडेन्सिस (The metal complexes of cyclopentadienes  and Indenses) या विषयावर प्रबंध लिहिला.

फिशर यांनी धातू आणि कार्बनी पदार्थ एकत्र करण्याची नवी पद्धत विकसित केली. फेरोसीन [fe(C5H5)2] हे संयुग तयार केले. फेरोसीन संयुगाचे क्ष-किरणांच्या साहाय्यानी निरीक्षण करून सिद्ध केले की, या संयुगात सायक्लोपेंटाडाइन्सची (पंचकोनी आकाराची कार्बनची) दोन कडी लोहाच्या अणूंनी जोडलेली आहेत. अशाच प्रकारे त्यांनी कोबाल्टोसीन आणि निकेलोसीन ही धातू संयुगे तयार केली. या संयुगांना सँडविच संयुगे (Sandwich Compound) असे म्हणतात.

फिशर यांनी सायक्लोपेंटाडाइन आणि ऑलिफिन्स आयडिन्सची धातू संमिश्रे तसेच सहा कार्बनच्या वलयांची ॲरोमॅटिक्स, मोनो- आणि डाय- या संबधीच्या संशोधनावर आधारीत व्याख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हेनेझुएला, ब्राझील इत्यादी देशांत दिली.

फिशर यांना गटिंगेन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे रसायनशास्त्राचे पारितोषिक (१९५७), आल्फ्रेट-स्टॉक स्मृतिपदक (१९५९), म्यूनिक येथील बव्हेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासदत्व, निरनिराळ्या विद्यापीठांच्या डॉक्टरेट व डी. एस्‌सी. या सन्माननीय पदव्या तसेच अभ्यागत व सन्माननीय प्राध्यापक पदे, अमेरिकन केमिकल सोसायटीचे फेलो (१९७७), ऑस्ट्रियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९७६) व ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, गटिंगेन (१९७७) यांचे सदस्यत्व, तसेच अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेसचे सन्माननीय परदेशी सदस्यत्व (१९७७) इ. बहुमान मिळाले आहेत.

फिशर यांचे जर्मनीतील म्यूनिक येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक – श्रीराम मनोहर

प्रतिक्रिया व्यक्त करा