अमीरखाँ : (१५ ऑगस्ट १९१२ – १३ फेब्रुवारी १९७४). विसाव्या शतकातील ख्यातकीर्त भारतीय ख्यालगायक. उस्ताद अमीरखाँ हे इंदूर घराण्याचे प्रवर्तक म्हणून सुविख्यात आहेत. त्यांचा जन्म अकोला येथे झाला आणि त्यांचे पालनपोषण इंदूर येथे झाले. आजोबा छंगेखाँ व वडील शाहमीरखाँ यांच्याकडून संगीताचा वारसा त्यांना वंशपरंपरेने लाभला. त्यांचे पूर्वज हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील कलनौर येथील मूळ रहिवासी होते. आजोबा छंगेखाँ हे मोगल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या दरबारात गायक होते, तर वडील शाहमीरखाँ हे इंदूर येथे होळकरांच्या दरबारात सारंगी व बीन वादक म्हणून काम करत. अमीरखाँ यांचे धाकटे भाऊ बशीरखाँ हेदेखील सारंगी वादक होते. अमीरखाँ नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले.
शाहमीरखाँ यांनी अमीरखाँ यांस वयाच्या दहाव्या वर्षापासून गायनाची तालीम देण्यास आरंभ केला. खंडमेरू पद्धतीने स्वरांचे ५०४० प्रस्तार, रागांची विस्तृत आलापचारी, तानक्रिया, बोल बांधण्याची पद्धत, विविध रागांतील ख्याल व सरगम या सर्वांची तालीम अमीरखाँना वडिलांकडू मिळाली. आवाज फुटण्याच्या वयात अमीर खां काही काळ सारंगीही शिकले. त्यांचे दोन मामा मोतीखाँ आणि रहमानखाँ यांच्याकडून त्यांनी तबला आणि लयतालाचेही शिक्षण घेतले. याशिवाय धृपद गायक अल्लाबंदे जाकीरूद्दिनखाँ, नसीरुद्दिनखाँ डागर, ख्याल गायक रजब अलीखाँ, इंदूर येथील गायक बुद्दूखाँ, कृष्णराव आपटे, बीनकार मुरादखाँ, सारंगिये बुंदूखाँ अशा दिग्गजांच्या श्रवणातूनही त्यांचे सांगीतिक व्यक्तित्त्व घडत गेले. अमीरखाँ यांच्या तानक्रियेवर उस्ताद रजब अलीखाँ यांचा, तर सरगम, बोलबनाव व कर्नाटक पद्धतीने राग गायकीवर उस्ताद अमान अलीखाँ यांचा प्रभाव होता. वडिलांच्या निधनानंतर (१९३७) किराणा घराण्याचे उस्ताद बहिरे वहीदखाँ यांच्या झूमरा तालातील विलंबित गायकीचाही ठळक प्रभाव अमीरखाँ यांनी अंगिकारला.
अमीरखाँ यांनी नाथद्वारा, कांकरोली, किशनगढ येथे काही काळ दरबार गायक म्हणून काम केल्यानंतर १९३४ ते साली मुंबईस आले. त्याचवर्षी कोलंबिया कंपनीने त्यांच्या पूरियाकल्याण, सुहा सुघराई, तोडी (तराना), अडाणा व काफी या रागांतील ध्वनिमुद्रिका वितरीत केल्या. मध्य प्रदेशातील रायगढ संस्थानात एक वर्ष (१९३६) राजगायक म्हणून काम केल्यावर ते पुन्हा मुंबईस आले. याचकाळात त्यांना अमान अलीखाँ यांची तालीम मिळाली. १९४० मध्ये ओडिअन रेकॉर्ड कंपनीने त्यांची पूरियाकल्याण व पटदीप तर १९४१ साली फ्रान्सच्या जोनोफोन रेकॉर्ड कंपनीने हंसध्वनी व मुलतानी या रागांची ध्वनिमुद्रिका वितरीत केली. पुढे दिल्ली व कोलकाता येथे वास्तव्य करून १९५१ साली ते पुनश्च मुंबईस आले. त्यांच्या गायकीस मुख्यत: कोलकाता, मुंबई, जालंधर, दिल्ली येथे मोठा श्रोतृवर्ग लाभला व त्यांची गायकी या भागातील रसिकांत लोकप्रिय झाली, तिचा अंगीकार अन्य कलाकारांनीही केला. १९६९ साली अमीर खाँ यांनी कॅनडा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दौरा करून तेथे गायन सादर केले.
अमीरखाँ यांची स्वत:ची खास वैशिष्ट्यपूर्ण गायकी ‘इंदूर घराण्याची गायकी’ म्हणून प्रस्थापित झाली. स्वरविस्ताराच्या दिशा व शक्यता मोठ्या प्रमाणात असलेलेच राग ते प्रामुख्याने पेश करत. हिंडोलबसंत, हिंडोलकल्याण, बसंतबहार, बागेश्रीकानडा, काफीकानडा, कौशीकानडा इ. मिश्ररागही त्यांनी कौशल्याने गायले असून पारंपरिक रागांखेरीज कर्नाटक पद्धतीतील रामप्रिय मेल अथवा प्रियकल्याण, हंसध्वनी, बसंतमुखारी, अभोगी, चारुकेशी इ. अनेक राग त्यांनी पेश केले. मैफलीत केवळ ख्याल गायन प्रस्तुत करणे, मध्ये न थांबता सलगपणे एका रागातून दुसऱ्या रागाचे गायन सुरू करणे, ठुमरी व भैरवी न गाणे अशीही काही वैशिष्ट्ये त्यांनी अंगिकारली होती.
अतिविलंबित लयीतील विशेषत: झूमरा तालातील बडा ख्यालाची प्रदीर्घ पेशकश, मंद्र-मध्य सप्तकांत काहीशी संथ वा रेंगाळणारी वाटावी अशी पण स्वरवाक्यांची सूक्ष्म बांधणी असलेली बढत अंगाची व खंडमेरूयुक्त आलापचारी, लघु-गुरू भेदांनी लयीस काटणारी व तीनही सप्तकात विहार करणारी जटील बांधणीची तानक्रिया, सरगमचा लालित्यपूर्ण – मात्र नखरेल न वाटावा असा – वापर, मुरकी व खटका यापेक्षा मींड, गमक व स्वरकणांनी स्वरोच्चार करणे, स्वरवाक्यांच्यामध्ये योजलेले बोलके विराम, गाताना शारीर हालचालींचे अत्यल्प प्रमाण, तालाशी लढंत-भिडंत न करता, अवाजवी तिहाया व लयकारी टाळून केवळ सूक्ष्म स्तरावरील लयदारी राखणे इत्यादी वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या प्रस्तुतीचा एकंदर परिमाण हा अंतर्मुख एकाग्रतेचा असे.
‘तराणा’ (तराना) ही केवळ निरर्थक शब्दांची रचना नसून सूफी परंपरेतील सार्थ शब्दांची परमतत्त्वास साद घालणारी रचना आहे, असे अमीरखाँ यांचे मत होते. तसेच अनेक पारंपरिक तरान्यांत त्यांना फारसी शेर गुंफलेले आढळले. त्याच नमुन्यावर त्यांनी हंसध्वनी, चंद्रकंस, अभोगी, शुद्धकल्याण, जोग, सुहा, दरबारी, मेघ इ. रागांत अनेक रुबाईदार तरान्यांची स्वतंत्र रचनाही केली. अमीरखानी, चंद्रमधुसारखे नवीन रागही त्यांनी निर्माण केले.
गुजरी तोडी (मन के पंछी भये बावरे), बैरागी (मन सुमिरत निसदिन तुमारो नाम), मारवा (गुरुबिन ग्यान), मालकंस (जिनके मन राम बिराजे), दरबारी कानडा (किन बैरन कान भरे), शहाना कानडा (सुंदर अंगना बैठी), मेघ (ए बरखा रितु आई), रामदासी मल्हार (छाये बदरा कारे), अभोगी (लाज रख लीजो मोरी) या रागांतील त्यांनी रचलेल्या बंदिशी प्रचलित झाल्या आहेत. काही बंदिशींत त्यांनी ‘सूररंग’ ही नाममुद्रा वापरलेली आहे.
अमीरखाँ यांनी अनेक चित्रपटांमध्ये रागदारी चिजांचे पार्श्वगायन केले. यामध्ये क्षुधित पाषाण (१९५२) हा बंगाली, बैजू बावरा (१९५२), शबाब (१९५४), झनक झनक पायल बाजे (१९५५), रागिणी (१९५५), गूंज उठी शहनाई (१९५९) हे हिंदी व ये रे माझ्या मागल्या (१९५५) या मराठी चित्रपटाचा समावेश होतो. तसेच जय श्रीकृष्ण आणि राधा पिय प्यारी या दोन चित्रपटांसाठी दरबारी कानडा रागातील ‘ए मोरी आली जबसे भनक पडी’ ही एकच चीज त्यांनी त्रिताल व झपताल अशा दोन वेगळ्या तालांत गायली. मिर्झा गालिब या लघुचित्रपटासाठी ‘रहिये अब ऐसी जगह’ ही गझल त्यांनी गायली.
अमीरखाँ यांनी गायलेल्या व एच. एम. व्ही. कंपनीने वितरीत केलेल्या रामदासी मल्हार रागातील ‘छाये बदरा कारे’, शहाना कानडा रागातील ‘सुंदर अंगना बैठी’ या बंदिशी व चंद्रकंसमधील तराना (१९६०), मारवा व दरबारी (१९६०), ललित व मेघ (१९६८), हंसध्वनी व मालकंस (१९७०) या ध्वनिमुद्रिका रसिकप्रिय ठरल्या. त्यांच्या मृत्यूनंतरही विविध ध्वनिमुद्रणांतून त्यांचे मैफिलीतील गायन रसिकांना उपलब्ध झाले.
अमीरखाँ यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांमध्ये अफगाणिस्तानच्या बादशाहाकडून उस्ताद-ए-मशरीक हा किताब (१९५४), बिहार संगीत नाटक अकादमीतर्फे तराना गायन प्रकारावरील संशोधनांसाठी पाठ्यवृत्ती (१९५७), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६७), राष्ट्रपती सन्मान (१९७१), पद्मभूषण (१९७१), सूर सिंगार संसदतर्फे स्वरविलास किताब (१९७१) इ. चा समावेश होतो. १९६४ साली इस्ट-वेस्ट कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारतीय संगीताचे प्रतिनिधित्व केले. १९७० साली फिल्म्स डिव्हीजन ऑफ इंडियाने अमीरखाँ यांच्यावर लघुपट तयार केला.
अमीरखाँ यांच्या प्रथम पत्नीचे नाव झीनत असून त्यांना फहमिदा ही कन्या आहे. त्यांच्या द्वितीय पत्नी गायिका मुन्नीबाई अथवा खलिफन या होत. त्यांना इकरमखाँ हा पुत्र आहे. १९६६ साली अमीरखाँ यांनी तिसरा विवाह हैदराबाद येथील रईसा बेगम यांच्याशी केला. त्यांचा पुत्र हैदर अली ऊर्फ शाहबाजखाँ अभिनेता आहे.
त्यांच्या गायकीचा वारसा अमरनाथ, ए. टी. कानन, तेजपाल सिंह व सुरिंदर सिंह, श्रीकांत बाकरे, कंकणा बॅनर्जी इत्यादी शिष्यांनी पुढे चालविला असून मुनीरखाँ (सारंगी) व मुकुंद गोस्वामी (वीणा) आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनीही काही काळ त्यांची तालीम घेतली. तसेच गायक भीमसेन जोशी, जसराज, रसिकलाल अंधारिया, प्रभा अत्रे, गोकुलोत्सव महाराज, राशीदखाँ, सतारीये विलायतखाँ व निखिल बॅनर्जी, सारंगीये सुलतानखाँ इत्यादी कलाकार अमीरखाँ यांच्या गायकीने प्रभावित झाले.
अमीरखाँ यांचा कोलकाता येथे कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
संदर्भ :
- तेजपाल सिंग व प्रेरणा अरोडा, संगीत के देदिप्यमान सूर्य उस्ताद अमीरखाँ : जीवन एवं रचनाएं, दिल्ली, २००५.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.