हळदणकर, बबनराव : (२९ सप्टेंबर १९२७ – १७ नोव्हेंबर २०१६). एक बुजुर्ग महाराष्ट्रीय शास्त्रीय संगीत गायक, संगीतज्ञ व संगीत बंदिशकार. मूळ नाव श्रीकृष्ण; पण बबनराव हळदणकर या नावाने अधिक परिचित. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील सावळाराम हळदणकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण शारदा विद्यामंदिरामधून झाले आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात बी. एस्सी. (टेक) ही पदवी घेतली. रसायन उद्योगामध्ये संशोधन व विकास अधिकारी म्हणून त्यांनी १९८५ पर्यंत काम केले. नंतर मात्र त्यांनी पूर्णवेळ संगीतकलेला वाहून घेतले.

बबनरावांचे वडील कलाक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे घरात अनेक कलाकार येत असत व गायनाचे कार्यक्रम होत असत. यांमधून उच्च दर्जाच्या गायनाचे संस्कार त्यांच्यावर झाले. १९५० ते १९५५ या काळात गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडून जयपूर घराण्याची भरीव तालीम त्यांना मिळाली. दीर्घ दमसास, चपखल अस्ताई अंतरे, गायनातील अतूटपणा ही मूल्ये त्यांच्यात रुजली. शिवाय मोगूबाईंनी त्यांचा आवाज घडविण्याचे कामही केले. पुढे आग्रा घराण्याचे खानदानी गायक उ. खादीम हुसेनखाँ यांची १९६० ते १९७५ या प्रदीर्घ काळात नियमित तालीम व खाँसाहेबांच्या निधनापर्यंत (१९९३) त्यांचे मार्गदर्शन बबनरावांना लाभले. अनेक आम व अनवट राग, वैविध्यपूर्ण बंदिशी, गायकीची अठरा अंगे, ढंगदार बोलबनाव, ख्याल, धमार, ठुमरी अशा विविध गायन शैलींची परिपूर्ण तालीम त्यांना खाँसाहेबांकडून मिळाली. उ. फैय्याझखाँ व केसरबाई केरकर यांचाही प्रभाव त्यांच्या गायनामध्ये दिसून येतो. नोमतोमचे नादसौंदर्य, लडिवाळ बोलबनाव, लयकारी व तिहायांवर असामान्य प्रभुत्व, आम रागांची अनोखी मांडणी व अनवट रागांमधील सहज संचार ही बबनरावांच्या गायकीची वैशिष्ट्ये होत.

हळदणकर एक श्रेष्ठ रचनाकारही होते. प्रचलित व अप्रचलित रागांमध्ये त्यांनी ‘रसपिया’ या नावाने अनेक बंदिशी रचल्या आहेत. ‘चांदनी मल्हार’, ‘कौंसी जोग’ अशी काही नवीन रागरूपेही त्यांनी तयार केली असून भूपनट, ललत पंचम, कामोद नट या रागांची तर्कशुद्ध अशी वेगळी रूपे त्यांनी मांडली. ते आकाशवाणीचे ‘अ’ श्रेणीचे कलाकार होते. एच.एम.व्ही. या कंपनीने त्यांची ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ज्यामध्ये दरबारी कानडा, आग्रा घराण्याचा चंद्रकंस व ललत अंगाचा भटियार हे राग समाविष्ट आहेत; ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर द आर्टस्’ या संस्थेने त्यांची ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ज्यामध्ये बहादुरी तोडी, लाचारी तोडी, कुकुभ बिलावल, रामगौरी असे दुर्मीळ राग समाविष्ट आहेत.

हळदणकर यांनी शास्त्रीय संगीतावर महत्त्वपूर्ण लेखनही केले आहे. आग्रा व जयपूर गायकीच्या सौंदर्यतत्त्वांची चर्चा करणारा जुळु पाहाणारे दोन तंबोरे हा त्यांचा ग्रंथ अनेक दृष्टींनी प्रशंसनीय असून यातील समीक्षा समतोल व शास्त्रीयदृष्ट्या सौंदर्यतत्त्वांच्या निकषांना प्राधान्य देणारी आहे. या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला (१९९७). मिलनोत्सुक दो तानपुरे या नावाने त्याचा हिंदी अनुवादही झाला. रसपिया बंदिशे या पुस्तकाद्वारे ध्वनिफितीसह त्यांच्या बंदिशी प्रकाशित झाल्या आहेत (२००१). यातील रचनांमध्ये त्यांचा खास ठसा दाखवणारे वेगळ्या धाटणीचे तराणे व सरगमगीतेही समाविष्ट आहेत. अत्यंत आव्हानात्मक व सौंदर्यपूर्ण अशा या बंदिशी अनेक नामवंत कलाकार आपल्या मैफिलीत आवर्जून पेश करतात. यानंतरच्या काळातही त्यांनी अनेक रचना केल्या. त्या रचना रसपिया बंदिशे याच नावाच्या दुसऱ्या पुस्तकात ध्वनिफीतीसह प्रकाशित झाल्या (२०१७). घराण्यांची वाटचाल (२००३) हे पुस्तक त्यांनी संपादित केले असून त्यात किराणा व भेंडीबाजार या घराण्यांवर डॉ. नीला भागवत, सुहासिनी कोरटकर, सुलभा ठकार प्रभृती मान्यवरांनी लेखन केले आहे. रागोंके रंग आगरेके संग (Ragas as sung in Agra Gharana) या पुस्तकात प्रदीपकी, बरवा, खेमकल्याण यांसारख्या आग्रा घराण्यातील खास रागांची अन्य रागांच्या संदर्भातील तौलनिक चर्चा आहे. यामुळे बबनरावांचे लेखनकार्यही संगीतक्षेत्रात लक्षवेधी ठरले. संगीतातील श्रुती यावर त्यांनी नवा विचार मांडला. प्राचीन संगीतज्ञांनी स्वरांच्या २२ श्रुती मांडल्या आहेत; पण हळदणकरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमित मिश्रा या बंगाली संगणक तज्ञांच्या सहकार्याने निरनिराळ्या रागांतील स्वरांचे दर्जे स्पष्ट करणाऱ्या २१ कंपनसंख्या निश्चित केल्या. त्यात प्रचलित १२ स्वर मिळविल्यास एकंदर श्रुतींची संख्या ३३ होते, अशा निष्कर्षाप्रत ते आले.

गोवा कला अकादमी येथे संगीत विभागाचे संचालक असताना १९८५ ते १९९३ दरम्यान त्यांनी अनेक शिष्य तयार केले. तसेच देशभरातील विद्वानांना पाचारण करून ५४ रागांची रूपे निश्चित करणारा ‘रागोंका प्रमाणीकरण’ हा प्रकल्प यशस्वीपणे पार पाडला.

हुबळी येथील ‘गंगूबाई हनगल संगीत अकादमी’ येथे २०११-१२ या काळात विद्यादानाचे कार्य केले. मुंबई विद्यापीठ, इंदिरा कला विश्वविद्यालय, खैरागढ येथील संगीतविभागामध्ये परिसंवाद, कार्यशाळा भरवून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले.

हळदणकरांच्या भारतात व परदेशात अनेक मानाच्या व्यासपीठांवर मैफिली झाल्या. परदेशातील त्यांचा शिष्यपरिवारही मोठा आहे. त्यांच्या भारतातील शिष्यपरिवारात अरुण कशाळकर, शुभदा पराडकर, राम देशपांडे, चंद्रशेखर महाजन, पौर्णिमा धुमाळे, कविता खरवंडीकर, संध्या काथवटे, अश्विनी चांदेकर, स्मिता वाघ, कमलाकर नाईक, प्रचला आमोणकर, गौरी भट, हिमांशु, वीणा व मानस विश्वरूप, विश्वजित बोरवणकर, वृंदा मुंडकूर, स्वरदा साठे, गायत्री आठले, योगेश आघारकर, सुजित जोशी, विकास भावे, शशिकांत तातू, शशांक गुणे इत्यादींचा समावेश आहे. तसेच मंजिरी आलेगावकर, देवकी पंडित, रत्नाकर गोखले, हेमंत पेंडसे, रविंद्र घांगुर्डे, सुरेश बापट, शरद करमरकर अशा अनेक नामवंत कलाकारांनीही नियमितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे.

हळदणकरांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. त्यांपैकी भारत गायन समाज पुणेतर्फे माणिक वर्मा पुरस्कार (२००३), संगीतक्षेत्रातील लेखनासाठीचा काका हाथरसी पुरस्कार (२००३), प्रभा अत्रे फाउंडेशन पुरस्कार (२००४), संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार (२००७), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२), शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी चतुरंग पुरस्कार आदी काही प्रमुख होत.

श्रीमती उषा हळदणकर या त्यांच्या पत्नींची त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जीवनभर साथ लाभली. त्यांना गौतम, अद्वैत हे दोन पुत्र व आसावरी ही कन्या आहे.

समीक्षक : सु. र. देशपांडे