खाँ, खादीम हुसेन : (१९०७ – ११ जानेवारी १९९३). हिंदुस्थानी संगीतातील अत्रौली घराण्यातील एक अध्वर्यू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व, संगीतज्ञ व गायक. त्यांच्या जन्मतारखेचा तपशील उपलब्ध नाही. उत्तर प्रदेशातील अलीगढजवळील अत्रौली या गावात संगीतकारांच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अल्ताफ हुसैन खाँ हे जयपूर दरबारचे संगीतकार होते. त्यामुळे खाँसाहेबांचे बालपण जयपूर येथे गेले. अल्ताफ हुसैन खाँ हे अत्रौली घराण्याचे ख्यातकीर्त मेहबूब खाँ “दरस पिया” (१८४५–१९२२) यांचे पुतणे होते आणि त्यांची आई फैयाजी बेगम या नट्टन खाँ (१८४०–१९०१) यांच्या सुकन्या आणि आग्रा घराण्याचे कीर्तिवंत विलायत हुसैन खाँ “प्राण पिया” (१८९२–१९६२ ) यांची बहीण होती. यामुळेच हुसेन खाँ यांना आग्रा आणि अत्रौली घराण्याची सांगीतिक परंपरा वारसारूपाने मिळाली आणि कालमानपरत्वे ते या दोन घराण्यांच्या एकत्रीकरणाचे समन्वयक बनले. खाँसाहेब हे पाच भावंडापैकी सर्वांत ज्येष्ठ. त्यांचे दोन लहान भाऊ अन्वर हुसेन खाँ (१९१०–१९६६) आणि लताफत हुसेन खाँ (१९२०–१९८६) हे होत.

जयपूर संस्थानिकांच्या मर्जीतील आग्रा घराण्याचे कल्लन खाँ (१८३५–१९२५) हे खाँसाहेबांचे पहिले आणि मुख्य गुरू. त्यांनी खाँसाहेबांना वयाच्या नवव्या वर्षांपासून तालीम सुरू केली आणि पुढील १२ वर्षे त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने पारंपरिक “आग्रा” शैलीमध्ये तयार केले. या कालावधीत त्यांनी खाँसाहेबांना प्रचलीत तसेच अप्रचलित असे जवळपास ४०० राग आणि प्रत्येक रागांमधील अनेक बंदिशी शिकवल्या. आग्रा व अत्रौली घराण्यांतील इतर दिग्गज गुरू खाँसाहेब यांचे चुलते फैय्याज खाँ व मामा विलायत हुसैन खाँ तसेच चुलत आजोबा “दरस पिया” यांच्याकडून देखील त्यांनी तालीम घेतली.

खाँसाहेब वयाने सर्वांत मोठे असल्याकारणाने, त्यांच्या वडिलांच्या पश्चात संपूर्ण कुटुंबाची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पुढे १९२५ मध्ये ते मुंबईला आले आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वत: एक उच्च विद्याविभूषित प्रतिभावान कलावंत असतानादेखील विद्यादान हेच आपल्या नियमित उत्पन्नाचे स्थिर साधन बनवायचे त्यांनी निश्चित केले व पुढे जवळपास ६० वर्षे विद्यादानाचे कार्य केले. खाँसाहेबांनी संपूर्ण देशभरात स्वरसादरीकरण तर केलेच; पण वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत आपल्या भावमधुर आणि सुरेल आवाजाची नजाकत व स्वरांवरील त्यांचे प्रभुत्व कायम राहिले. थोड्याच काळात शास्त्रीय संगीतातील एक सद्गुणी गुरू अशी प्रतिष्ठा लाभल्यामुळे त्यांचा शिष्यवृंद खूप विस्तारला आणि त्यांपैकी बहुतेकजण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध कलाकार म्हणून नावाजले देखील गेले. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये त्यांचे कनिष्ठ बंधू लताफत हुसैन खाँ, वत्सला कुमठेकर, ज्योत्स्ना भोळे, कृष्ण उद्यावरकर, व्हायोलिनवादक श्रीधर पारसेकर, गोविंदराव अग्नी, प्रल्हाद गानू, मोहन चिकरमाने, सगुणा कल्याणपूरकर, बबनराव हळदणकर, ललित राव, पुतण्या गुलाम हुसैन खाँ यांचा समावेश आहे. काही काळाकरिता त्यांनी मुकेश, सुरैय्या, मधुबाला, सुरेंद्र इत्यादींसारख्या प्रसिद्ध चित्रपट गायकांना देखील मार्गदर्शन केले होते.

खाँसाहेबांकडे त्यांच्या गुरुंकडून प्राप्त झालेल्या अनेक रागरागिणी आणि त्या राग विस्तारातून निर्माण केलेल्या विविधांगी रचना व बंदिशी यांचे स्वरभांडार होते. आपल्याजवळील अमूल्य असे हे स्वरांचे आविष्कार त्यांनी अतिशय मन:पूर्वक, स्वेच्छेने आणि निरलसपणे आपल्या शिष्यवर्गाला देऊन सर्वार्थाने आग्रा-अत्रौली घराण्याची परंपरा कायमस्वरूपी टिकवली. खाँसाहेबांनी “सजन पिया” या टोपणनावाने काही बंदिशींची रचनादेखील केली. एक उत्तम संगीतज्ञ असण्याबरोबर अतिशय कनवाळू, स्वत:ची वैचारिक तसेच सांगीतिक मूल्ये व परंपरा अगदी मनापासून जपणारे अशी त्यांची ख्याती होती.

खाँसाहेब हसीना बेगम (“दरस पिया” यांच्या कनिष्ठ बंधूंच्या सुकन्या) यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले. उभयतांची कन्या झरीना बेगम हिचा विवाह खाँसाहेबांच्या बहिणीचे चिरंजीव व पं. रवीशंकर यांचे एक प्रमुख शिष्य सतारनवाज शमीम अहमद यांच्याशी झाला.

खाँसाहेबांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा मानसन्मान त्यांना केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७८), महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार (१९७८), भारत शासनाचा पद्मभूषण पुरस्कार (१९८२), मध्य प्रदेश सरकारच्या वतीने दिला जाणारा तानसेन सन्मान (१९८६) यांनी करण्यात आला.

खाँसाहेबांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  • http://www.itcsra.org/Celebrity.aspx?Celebrityid=8
  • Rao, N. Jayavanth, Sajan Piya :a biography of Ustad Khadim Husain Khan, 1981.

समीक्षक : सु. र. देशपांडे

मराठी भाषांतर : शुभेन्द्र मोर्डेकर