आंद्रे, सालूमॉन आउगस्ट (Andree, Salomon August) : (१८ ऑक्टो १८५४ – ? ऑक्टो १८९७). स्वीडिश विमानविद्या अभियंता, भौतिकीविज्ञ आणि ध्रुवीय प्रदेशाचा समन्वेषक. त्यांचा जन्म  स्वीडनमधील ग्रेना या शहरात झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर आईच त्यांच्या निकट होती. स्टॉकहोम (Stockholm) येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून १८७३ मध्ये त्यांनी यंत्र अभियांत्रिकीची पदवी घेतली. एका कारखान्यात काम केल्यानंतर १८७६ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फिलाडेल्फिया येथील सेंटेनिअल एक्झिबिशन या जागतिक प्रदर्शनात एक स्विडिश प्रदर्शनक म्हणून आंद्रे उपस्थित होते. तेथील वास्तव्यात त्यांनी व्यापारी वाऱ्यांवरील एक पुस्तक वाचले. तेथे जॉन वाइझ या अमेरिकी वातयान (Balloon) तज्ज्ञाला ते भेटले. या भेटीमुळे त्यांना वातयान उड्डाणाविषयी गोडी निर्माण झाली आणि त्याच्याशीच त्यांचे आयुष्य जोडले गेले.

स्वीडनला परत आल्यानंतर आंद्रे यांनी एक यंत्रांचे दुकान टाकले; पण त्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी १८८० ते १८८२ या काळात रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्वीडनच्या स्पिट्सबर्गेन (Spitsbergen) येथील केंद्राकडे १८८२-८३ मध्ये गेलेल्या निल्स एकहोम याच्या आंतरराष्ट्रीय ध्रुवीय वैज्ञानिक सफरीत विद्युत निरीक्षणाची जबाबदारी आंद्रे यांच्यावर होती. ते १८८५ मध्ये स्वीडिश पेटंट विषयक कार्यालयात पहिला अभियंता म्हणून रूजू झाले. अखेरपर्यंत ते याच कार्यालयाच्या सेवेत राहिले. एक शास्त्रज्ञ म्हणून आंद्रे यांनी वायुविद्युत उष्णतेचे वहन आणि नवशोध या विषयी एक शोधनिबंध प्रकाशित केला. निसर्गविज्ञानात त्यांना खूप रस होता. तसेच औद्योगिक आणि तांत्रिक विकासाचा ते पुरस्कर्ते होते. वाऱ्याची दिशा, गती आणि इतर वातावरणीय घटकांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. वातयानाच्या साहाय्याने उत्तर ध्रुवावर सहज जाता येईल असा अंदाज त्यांनी आपल्या अभ्यासातून मांडला. तेथे जाण्यासाठी उन्हाळ्यातील वातावरणीय परिस्थिती आदर्श असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ध्रुवीय समन्वेषक मोहिमेला रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने पाठिंबा दिला, तर राजा दुसरा ऑस्कर आणि ॲल्फ्रेड नोबेल यांनी त्यांना आर्थिक मदत केली. ध्रुवीय समन्वेषण मोहिमेतून भौगोलिक उत्तर ध्रुवावर जाण्याची त्यांची ही एक धाडशी आणि देशाचा अभिमान वाढविणारी योजना होती.

आंद्रे यांचा वातयान उड्डाणाचा सराव १८९३ मध्ये सुरू झाला. फ्रेंच वातयान खरेदी करण्यासाठी अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी एकूण नऊ आरोहणे केली. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने आंद्रेच्या वातयानाद्वारे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर जाण्याच्या प्रस्तावाला १८९५ मध्ये मंजुरी दिली. त्यासाठी सज्ज केलेले ऑर्नेन (द इगल) हे वातयान त्या वेळेपर्यंत निर्माण केलेल्या सर्वांत मोठ्या वातयानांपैकी एक होते. पॅरिसच्या लाचंब्रे याने याची निर्मिती केली होती. त्यामध्ये हायड्रोजन भरला होता. व्हार्निश लावलेले रेशीम वापरून त्याची रबरी शिवण केली होती. त्याचे घनफळ १,७०,००० घनफूट होते. बर्फावरून चालणाऱ्या दोन स्लेज गाड्या, एक बोट आणि तीन महिने पुरतील एवढे खाद्यपदार्थ अशा साधनसामुग्रीने सुसज्ज असे या सफरीचे आयोजन केले होते. स्पिट्सबर्गेन या नॉर्वेच्या द्वीपसमूहातील ८० उ. अक्षांश आणि ११ पू. रेखांशावर असलेल्या डेन्स बेटाची निवड या वातयानाच्या उड्डानासाठी करण्यात आली होती.

उत्तर ध्रुवाकडील सफरीचा पहिला प्रयत्न १८९६ मधील उन्हाळ्यात केला होता; परंतु वाऱ्याच्या प्रतिकूलतेमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर ११ जुलै १८९७ रोजी करण्यात आलेल्या प्रयत्नात छायाचित्रकार निल्स स्ट्रिन्बेर्य आणि अभियंता क्नूत फ्रांकल या दोन सहकाऱ्यांसह आंद्रे यांनी ईशान्येच्या दिशेने उड्डाण केले. साधारण ६५ तासांचा प्रवास केल्यानंतर तीव्र हिमवादळामुळे त्यांच्या प्रवासात अडथळे येऊ लागले. वातावरणीय परिस्थितीनुसार त्यांच्या प्रवासाच्या दिशा बदलाव्या लागल्या. त्यांचा वातयानाचा प्रवास थांबला तेव्हा त्यांना जाणीव झाली की, आपण ध्रुवाजवळ पोहोचलेलो नाही. वातयानाचेही नुकसान झाले. त्याचे तीनपैकी दोन घसरते दोर खाली बर्फावर पडले असावेत. त्यांचे वातयान अपघाताने खाली कोसळले नसले, तरी त्यांचे वातयानावर नियंत्रणही राहिले नव्हते. नाईलाजाने त्या चमुला खाली बर्फावर उतरावे लागले. त्यानंतरच्या दोन महिन्यात स्लेजच्या साह्याने बर्फावरून प्रवास करत करत स्वालबर्डच्या पूर्वेस जवळच असलेल्या व्हाइट आयलंड येथे ते पोहोचले. तेथेच त्यांचा अकाली मृत्यू झाला; परंतु मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

बरोबर नेलेल्या कबुतरांमार्फत आंद्रे आपल्या प्रवासाचे ताजे संदेश पाठवीत असे. उड्डाणानंतर दोन दिवसांनी आंद्रेचा आलेला एक संदेश असा होता. ‘‘जुलै १३, दुपार १२.३०, ८२ २′ उ. अक्षांश, १५५’ पू. रेखांश, प्रवास चांगला चालू आहे. सर्व काही ठीक आहे’’. आंद्रेकडून आलेला हा शेवटचाच संदेश ठरला. आंद्रेच्या शोधार्थ अनेक मोहिमा काढण्यात आल्या; परंतु हाती काहीच लागले नाही. सीलच्या शिकारीसाठी गेलेल्या नॉर्वेच्या जहाजांच्या ताफ्यातील लोक आर्क्टिक प्रदेशाची सफर करीत असताना अचानकपणे ६ ऑगस्ट १९३० रोजी ८१ उ. अक्षांश व ३३पू. रेखांशावर असलेल्या व्हाइट आयलंड बेटावर त्यांना आंद्रे आणि स्ट्रिन्बेर्य यांचे मृतदेह आढळले. त्यानंतर फ्रांकलचाही मृतदेह सापडला. आंद्रे यांची दैनंदिनी आणि वातयानच्या प्रवासाचा रोजनामा त्यांच्या शर्टमध्ये व्यवस्थितपणे गुंडाळून ठेवलेला आढळला. छायाचित्रफितही (Photo Film) त्यांच्याजवळ मिळाली. या पुराव्यांवरून त्यांचा मृत्यू २ ऑक्टोबर १८९७ रोजी झाला असावा. ५ ऑक्टोबर १९३० रोजी अंत्यविधीसाठी त्यांचे मृतदेह आणि त्यांच्याबरोबरची इतर साधनसामुग्री स्टॉकहोम येथे आणण्यात आली.

आंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मृत्यूविषयी वेगवेगळे अंदाज वर्तविले जातात. त्यांच्याजवळ पुरेसे खाद्यपदार्थ आणि इंधनही सापडले. तरीही त्यांचा मृत्यू झाला. एका डॅनिश डॉक्टरने १९५२ मध्ये काढलेल्या अनुमानानुसार ध्रुवीय अस्वलाचे मांस खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा.

समीक्षक – अविनाश पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा