आकाशातून विमाने वा तत्सम आकाशस्थ यंत्रणेद्वारे होणाऱ्या शत्रूच्या हवाई हल्ल्याचा बचाव करणारी यंत्रणा वा व्यवस्था म्हणजे हवाई सुरक्षा होय. संरक्षणाची कृती दोन प्रकारची असते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष हवाई सुरक्षेत क्रियाशील प्रतिकार असून हल्ल्याला हल्ल्याने उत्तर देणे अभिप्रेत असते. हल्ला करणाऱ्या शत्रूच्या विमानांचा नाश करण्यासाठी किंवा ती निष्प्रभ बनविण्यासाठी हवाई दलाने केलेली प्रत्यक्ष कारवाई असते. यात शत्रूच्या विमान दलाचा किंवा क्षेपणास्त्रे यांचा हल्ला मोडून काढणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे यांचा समावेश होतो. कधीकधी अशा शत्रूच्या हल्लेखोर विमानांना पळवून लावणे वा त्यांचा रोख बदलणे, हाही हेतू असतो. त्यांचा हल्ला कसा चुकविता येईल, हेही पाहिले जाते. तिला अप्रत्यक्ष वा क्रियाशील प्रयुक्ती म्हणतात. त्यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाची ठिकाणे, संस्था किंवा लष्करी तळ, शस्त्रास्त्रनिर्मितीचे कारखाने आणि प्रमुख शस्त्रसाठे यांच्या रक्षणासाठी हवाई सुरक्षिततेची उपाययोजना करणे आणि शत्रूची विमाने किंवा क्षेपणास्त्रे यांच्या हल्ल्याचा प्रभाव कमी करणे, यांचा समावेश होतो. प्रत्यक्ष वा क्रियाशील हवाई संरक्षणात अभिज्ञान (Detection), अभिनिर्धारण (Identification), आंतर-छेद ग्रहण (Interception) आणि संहार यांचा विमान हल्ल्याच्या संदर्भात विचार केला जातो. लष्कराची ही कारवाई हवाई यंत्रणेकडून आणि रडार स्थानकांतून मिळालेल्या संदेशांद्वारे पार पाडली जाते. हवाई वाहतुकीवरील नियंत्रण वगैरे काही अप्रत्यक्ष हवाई धोरणे लष्करी व नागरी हवाई प्रतिनिधींद्वारे संयुक्त रीत्या पार पाडली जातात. इतर अप्रत्यक्ष हवाई सुरक्षिततेत निर्वासने, परिक्षेपण, छद्मावरण आणि सुरक्षित जागी आसरा घेणे यांचा अंतर्गत होतो. या हवाईसंबंधित संरक्षणाच्या नागरी सुविधा होत. हवाई सुरक्षिततेसाठी लष्करी व नागरी या दोन्ही संघटनांच्या परस्परसहकार्याची आवश्यकता असते.

हवाई हल्ल्यांपासून महत्त्वाच्या केंद्रांचे आणि लष्करी तळांचे रक्षण करण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणा युद्धाच्या आणि शांततेच्या काळातही कायम सिद्ध ठेवावी लागते. शत्रूच्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळाल्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हवाई संरक्षण यंत्रणा प्रभावीपणे शत्रूचा मुकाबला करू शकते. असे निर्धारण झाले की, संहार करणाऱ्या यंत्रणेस माहिती पुरविली जाते. तेव्हा त्या अस्त्रांचा विनाश करणारी यंत्रणा सज्ज होते. शिवाय शत्रूच्या हवाई हालचालींबाबत गुप्तचर यंत्रणांकडून योग्य वेळी आणि अचूक माहिती मिळण्यावरच कोणत्याही हवाई कारवाईचे यश अवलंबून असते. शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती, आपल्या यंत्रणांना प्रतिहल्ला करण्यास मिळणारा कालावधी आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या यंत्रणा आणि शस्त्रास्त्रे सज्ज ठेवण्याचे कौशल्य या गोष्टी अशा कारवाईत अतिशय महत्त्वाच्या ठरत असतात. अखेर नाश करणारी संहारयंत्रणा त्या अस्त्रांचा वापर करून शत्रूचे अस्त्र नष्ट करते. असा नाश शक्यतो शत्रूच्या प्रदेशात व्हावा, हे अधिक श्रेयस्कर ठरते. हवाई संरक्षणाच्या संदर्भात एखाद्या यंत्रणेला गृहीत धरणे, तिच्यावर विसंबून राहणे किंवा अशी यंत्रणा अथवा शस्त्रप्रणाली यांचा वापर न करणे या गोष्टी अतिशय गंभीर व धोकादायक मानल्या जातात.

प्रभावी हवाई संरक्षणासाठी चार प्रमुख गोष्टींची गरज असते ‒ 

  • संपूर्ण क्षेत्राची टेहळणी आणि नियंत्रणक्षमता.
  • राष्ट्रीय हवाई क्षेत्राच्या आणि सीमेलगतच्या प्रदेशाच्या नियंत्रणाची व संरक्षणाची क्षमता.
  • शत्रूवर जोरदार हल्ला करण्याची क्षमता.
  • अत्याधुनिक यंत्रणांच्या उपकरणांचा पुरेसा साठा. युद्धात ही उपकरणे नष्ट झाली, तर तातडीने ती बदलली जायला हवीत.

टेहळणी आणि नियंत्रणक्षमता : ही जबाबदारी नियंत्रण आणि संदेशवहन यंत्रणेकडे सोपविलेली असते. हवाई सुरक्षायंत्रणा यशस्वी होण्यासाठी आपल्या हवाई हद्दीची आणि जिथे सैन्य तैनात आहे, त्या ठिकाणची गस्त आणि टेहळणीचे काम अहोरात्र करणे आवश्यक आहे. अभिज्ञान वा निरीक्षण, दृष्टिक्षेप या गोष्टी ‘रडार’द्वारे केल्या जातात. त्यासाठी ज्या ‘लहरी’ निर्माण कराव्या लागतात, त्यांचे प्रक्षेपण डोंगरमाथ्यावरून केले जाते. सद्य:स्थितीत उपग्रहांद्वारे अशा प्रकारच्या लहरी प्रक्षेपित केल्या जातात व शत्रुप्रदेशात कोणत्याही स्थळावर त्या पोहोचू शकतात. त्या परावर्तित होऊन येतात, तेव्हा त्या ‘ग्रहण’ करण्यासाठी तशाच प्रकारची यंत्रणा असावी लागते. त्यासाठी आवश्यकतेनुसार विमाने निरंतर आकाशात भ्रमण करीत ठेवावी लागतात. अशा परावर्तित लहरी ग्रहण केल्यावर संगणकाच्या मदतीने त्यांचे विश्लेषण करून त्यांतील धोकादायक वस्तू व एखादे अस्त्र आपल्या देशाच्या दिशेने डागले गेले असल्यास त्याचा वेग, आकार, उंची, दिशा, स्थान, वेळ इ. निश्चित करता येते. हवाई क्षेत्रातील सर्व हवाई हालचाली शोधून काढण्यासाठी रडार किंवा इन्फ्रा रेड यंत्रणेमार्फत ही माहिती मिळविली जाते. त्याचबरोबर गस्त घालणाऱ्या आणि टेहळणी करणाऱ्या सैनिकांकडूनही ही माहिती मिळविली जाते. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे जमिनीवरून, विमानातून किंवा उपग्रहांच्या मदतीने ही टेहळणी केली जाते. तसेच शत्रूची हवाई हालचाल स्वक्षेत्रात आढळून आली, तर ती माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला तातडीने कळविली जाते. प्रभावी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून ही माहिती विनाविलंब पोहोचविली जाते. ती माहिती एअरक्राफ्ट ट्रान्सफॉर्मर्ससारख्या यंत्रणेद्वारे घेतली जाते.

या गोष्टींसाठी स्वयंचलित आणि संगणकीय साधनांची मदत घेतली जाते. हवाई क्षेत्रात होत असलेली हालचाल नेमकी काय आहे आणि कुणाकडून होत आहे, हे निश्चित करण्यासाठी अशी मदत घेणे आवश्यक असते. टेहळणीत आढळलेले विमान शत्रूचे असेल, तर त्याचा पाठलाग करून जबरदस्तीने त्याला खाली उतरण्यास भाग पाडावे किंवा हवेतच नष्ट करावे याचा निर्णय अधिकाऱ्याला क्षणार्धात घ्यावा लागतो. आपले नुकसान करायच्या आत ते नष्ट करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात तत्काळ निर्णय महत्त्वाचा असतो.

हवाई संरक्षणात प्रामुख्याने शत्रूच्या विमानावर हल्ला करणारे विमान, जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि विमानविरोधी तोफा या तीन यंत्रंणांचा वापर केला जातो. याला हवाई संरक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा म्हणतात. शत्रूच्या विमानांना देशातील महत्त्वाच्या केंद्रांपासून दूर अंतरावरच रोखण्यासाठी या विमानांचा वापर केला जातो. रडार यंत्रणेद्वारे किंवा विमानातील सूचना व नियंत्रण यंत्रणेद्वारे (AWACS) या विमानांना सूचना दिल्या जातात. काही वेळा गुप्त यंत्रणेमार्फत या सूचना दिल्या जातात. या विमानांवर हवेतून मारा करणारी क्षेपणास्त्रे व बंदुका बसविलेल्या असतात.

क्षेपणास्त्रांचा वापर : भारताने १९९५ मध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी एस‒३०० ही क्षेपणास्त्रे रशियाकडून घेतली. पुढे भारताने १९९८ मध्ये क्षेपणास्त्रांची निष्कास योजना कार्यवाहीत आणली. शिवाय भारताने क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्र यंत्रणेच्या कार्यक्रमास प्राधान्य देण्यासाठी सु. ४० खासगी व सार्वजनिक कंपन्यांना या उपक्रमाधिकारात सामील करून घेतले. अंतर्गामी ५००० किमी. वरील क्षेपणास्त्राचा आंतरच्छेद घेऊ शकेल, अशा क्षेपणास्त्रभेदी ‘पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी २००६ मध्ये झाली. त्यानंर ‘ॲडव्हान्स्ड एअर डिफेंस’ क्षेत्रणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आणि भारत हा क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात अमेरिका, रशिया व इझ्राएल यांच्या खालोखाल चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्यानंतर भारताने २००९ मध्ये आणखी एक परिरक्षक क्षेपणास्त्र बनविले. त्याने शत्रूच्या अंतर्गामी क्षेपणास्त्राचा आकाशात धुव्वा उडविण्यात यश मिळविले. याशिवाय २०१२ मध्ये ‘ॲडव्हान्स्ड एअर डिफेंस’ने १७० किमी. वर मारा करण्यात यश मिळविले. भारताने ‘सुपरसॉनिक ॲडव्हान्स्ड एअर डिफेंस’ आंतरच्छेद क्षेपणास्त्र बनविले असून ‘स्वोअर्डफिश रडार’चीही निर्मिती केली आहे. डीआरडीओ शास्त्रज्ञांचे प्रयत्न ‘स्वोअर्डफिश रडार’ची क्षमता वाढविण्यात यशस्वी झाले असून हवाई संरक्षणाचा एक प्रगत भाग म्हणून लेसरच्या अध:स्तरावरील महाप्रकल्प अस्त्र बनविण्याचा भारताचा प्रयत्न आहे. ते शत्रूच्या क्षेपणास्त्राचा आंतरच्छेद घेऊन नष्टही करेल.

संदर्भ :

  • Saxena, V. K. Ground Based Air Defence : Contemporary Issues, New Delhi, 2014.
  • Singh, Jasjit, Air power in Modern Warfare, New Delhi, 1985.

भाषांतरकार – भगवान दातार

                                                                                                                                                                      समीक्षक – शशिकांत पित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा