अर्थशास्त्रीय विचारप्रणाली विकसित करण्याबद्दल जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांचे नाव एक आघाडीचे अर्थशास्त्रज्ज्ञ म्हणून घेतले जाते. केन्स यांनी एकोणिसाव्या शतकात अर्थशास्त्र विषयात मोलाचे योगदान दिलेले आहे. केन्स यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केले. पैकी १९३६ मध्ये लिहिलेला दि जनरल थिअरी ऑफ एम्लॉयमेन्ट, इंटरेस्ट ॲण्ड मनी हा त्यांचा अर्थशास्त्रीय ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

केन्सपूर्वीच्या अर्थशास्त्रामध्ये देशात सर्वसाधारण समतोल नेहमी घडून येईल, अशी मध्यवर्ती संकल्पना होती. मंदी अथवा सार्वत्रिक बेरोजगारी अपवादानेच असेल, असे त्या वेळचे काही अर्थतज्ज्ञ मानित; पण विशेष करून १९२९ मध्ये सुरू झालेल्या आणि काही वर्षे टिकून राहिलेल्या जागतिक महामंदीने ही गृहीतकल्पना फोल ठरविली. मंदी व बेकारी हे आर्थिक घटनाक्रमाचे अविभाज्य भाग आहेत, अशी नवी भूमिका साहजिकच घ्यावी लागली. हा क्रांतिकारी विचार केन्स यांनी मांडला. मंदीशी मुकाबला करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी सरकारची काय भूमिका असायला पाहिजे इत्यादी नवविचार आणि सैद्धांतिक भाषेतील विवेचन मांडणारे ग्रंथ म्हणजे जनरल थिअरी होय.

पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आर्थिक महामंदीमुळे सर्वदूर अस्थिर परिस्थिती होती. याच काळात केन्स यांनी ट्रिटिज ऑफ मनी (१९३०) आणि जनरल थिअरी हे दोन ग्रंथ लिहिले. त्यांच्याजनरल थिअरी या ग्रंथाने आधुनिक स्थूल अर्थशास्त्राचा पाया रचला. काही तात्पुरते चढउतार वगळता पूर्ण रोजगारी निर्माण होण्याकडे अर्थव्यवस्थांचा कल असतो, अशी मांडणी त्यांनी या ग्रंथामध्ये केली आहे.

सनातनवादी अर्थतज्ज्ञांच्या विचारांना आव्हान देऊन उपभोगकार्य, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, परिणामकारक मागणीचे तत्त्व व रोखता अग्रक्रम इत्यादींबाबतच्या संकल्पना अधिक व्यापक दृष्टिकोनातून मांडल्या. उपभोगाविषयी (Consumption) असलेले सनातनवाद्यांचे विचार झुगारून त्यांनी नवीन मानसशास्त्रीय विचारप्रणाली त्यात मांडली. उपभोगखर्च व्याजदरावर अवलंबून नसून उत्पादन पातळीवर अवलंबून असतो. उत्पादन व व्याजदर यांमध्ये कार्यात्मक संबंध असतो व तो उपभोगफलनाद्वारे दर्शविला जातो. त्यांच्या उपभोगविषयक मानसशास्त्रीय नियमानुसार ज्या वेळी एखाद्या समाजाच्या एकूण वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होते, त्या वेळी त्या समाजाच्या एकूण उपभोगामध्येही वाढ होते; परंतु जेवढी वाढ उत्पन्नामध्ये होते, तेवढी वाढ उपभोगामध्ये झालेली दिसून येत नाही. केन्स यांचा हा नियम ‘उपभोगप्रवृत्तीʼ तसेच ‘उपभोगफलनʼ (Consumption Function) या नावानेही प्रचलित आहे.

भांडवलाची कार्यक्षमता व व्याजदर हे गुंतवणुकीवर परिणाम करणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्जाऊ रकमेला दिला जाणारा मोबदला म्हणजे व्याजदर. कर्जाऊ रकमेची मागणी व पुरवठा यांवरून व्याजदराची निश्चिती होते. गुंतवणूकदार नवीन गुंतवणूक करताना भांडवलाची सीमांत कार्यक्षमता व व्याजदर यांची तुलना करतात. जोपर्यंत व्याजदरापेक्षा भांडवलाची सीमांत कार्यक्षमता अधिक असते, तोपर्यंत गुंतवणूक केली जाते आणि जेव्हा व्याजदर व भांडवलाची सीमांत कार्यक्षमता समान होते, तेव्हा गुंतवणूक थांबवली जाते व त्या ठिकाणी गुंतवणुकीचा समतोल घडून येतो. केन्स यांनी व्याजदरापेक्षा भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेवर भर दिलेला असून त्यांच्या मते आर्थिक अरिष्टाचे कारण व्याजदरातील वाढ नसून भांडवलाची सीमांत कार्यक्षमतेतील अनपेक्षित घट हे असते.

व्याजदर हा केवळ चलनपुरवठा व चलनमागणी यांतून निश्चित होतो. त्यामुळे व्याज ही शुद्ध चलनजन्य घटना आहे. त्यांच्या मते, चलनाची मागणी ही दैनंदिन व्यवहारहेतू, दक्षताहेतू व सट्टेबाजीचा हेतू या तीन कारणांसाठी होते. व्यवहारहेतूंमध्ये चलनाची मागणी व्यक्ती अगर संस्थांमार्फत दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी केली जाते. व्यवहारहेतूसाठी असणारी चलनाची मागणी ही व्यवहारांचे प्रमाण, व्यवहारपद्धती, रोख व्यवहारांचे एकूण व्यवहारांवर होणारे परिणाम इत्यादी घटकांवर अवलंबून असते. दक्षताहेतूसाठी असणारी मागणी आर्थिक अडचणीच्या वेळी उपयोगी पडावी यासाठी केली जाते. भविष्यकाळातील आर्थिक बदलांचा लाभ उठवण्यासाठी चलनाची जी मागणी केली जाते, ती सट्टेबाजीसाठी असणारी असते. चलनपुरवठा हा देशातील मध्यवर्ती बँकेमार्फत निर्धारित होत असतो. मौद्रिक (Monitory) धोरणानुसार त्यामध्ये बदल केला जातो. चलनपुरवठा व्याजदराशी निगडित नसतो किंवा व्याजदरातील बदलांचा परिणाम म्हणून चलनपुरवठा बदलतो, तेव्हा व्याजदरात बदल होतो. केन्स यांनी हे सिद्ध केले की, चलनपुरवठ्यातील बदलाने व्याजदरात बदल करणे एका मर्यादेपर्यंत शक्य आहे; परंतु त्यानंतर चलनपुरवठ्यातील बदलाचा व्याजदरावर काहीही परिणाम होत नसल्याने चलनविषयक धोरण निष्प्रभ ठरू शकते. अशा परिस्थितीत राजकोषीय धोरणांचा अवलंब करणे योग्य ठरते. त्यांच्या मते, रोजगार हा प्रभावी मागणीवर अवलंबून असतो, तर प्रभावी मागणी ही उपभोग आणि गुंतवणूक यांवर आधारलेली असते.

केन्स यांनी जनरल थिअरी या ग्रंथात मांडलेले आर्थिक विचार आधुनिक स्थूल अर्थशास्त्राच्या केंद्रस्थानी मानले जातात. भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांच्या अर्थनीतीचा गौरव करताना ‘आता आपण सर्वजण केन्सियन (केन्सच्या विचाराचे) झालो आहोतʼ, असे म्हटले. केन्स यांच्या पश्चात त्यांच्या अर्थप्रणालीची समीक्षा केली गेली, तसेच काही विचारांना आव्हानही दिले गेले. २०११ साली प्रसिद्ध झालेल्या टाइम या विख्यात मासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० सर्वश्रेष्ठ ग्रंथांच्या यादीत जनरल थिअरी या ग्रंथाचा समावेश केला. यावरून या ग्रंथाचे महत्त्व व मोठेपण लक्षात येते. त्यांच्या आर्थिक विचारधारेवर मार्क्सवादी अर्थतज्ज्ञांनी टीका करताना म्हटले की, भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील आंतरविरोधामुळे केन्स यांचे विचार मार्गदर्शक असले, तरी अपुरे किंवा तुटपुंजे वाटतात. केन्स यांना अभिप्रेत असलेली पूर्ण रोजगारी ही संकल्पना वास्तवामध्ये अशक्यप्राय गोष्ट आहे. कोणतेही सरकार खर्चाचे प्रमाण वाढवून भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देवू शकेल हेही तितकेसे खरे नाही. सॅम्युल्सन यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी केन्स यांच्या जनरल थिअरी या ग्रंथाच्या मर्यादा तसेच उणिवा दाखवून दिलेल्या आहेत.

समीक्षक : संतोष दास्ताने