भारतीय कलेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड. इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस भारतातील प्राचीन मगध देशात मौर्य वंश उदयास आला. या वंशातील राजांनी इ. स. पू. ३२१ ते १८५ दरम्यान भारत खंडाच्या बहुतेक भागावर राज्य केले आणि प्रथमच एकछत्री अंमल प्रस्थापित केला. या काळाला मौर्य काल ही सर्वसाधारण संज्ञा देतात. या काळाशी संबंधित जे कलेचे प्रकार निर्मिले गेले, त्या कलाविष्कारांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मौर्य कलाʼ असे संबोधले जाते. या संबोधनाला राजकीय संदर्भासोबतच भौगोलिक पार्श्वभूमीसुद्धा आहे. या काळात कलेचे जे विविध प्रकार विकसित झाले, ते मोठ्या प्रमाणात गंगा-यमुनेच्या दोआबात पाहायला मिळतात. त्यासोबतच या कलेचा या प्रदेशाला लगत असलेल्या प्रदेशावरील आनुषंगिक प्रभाव समकालीन काळात आणि त्यानंतरच्या काळात अवशिष्ट स्वरूपात दृग्गोचर होतो. भारतीय कलेतिहासात हा कालखंड महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या काळातील कलाविष्कारांचा व कलात्मक उंचीचा संबंध द्वितीय नागरीकरणाशी (Second Urbanization) जोडला जातो. किंबहुना या दोन्ही गोष्टी परस्परसंबंधातूनच विकसित होत होत्या, असे विश्लेषण काही विद्वान करतात. या कलेची वैशिष्ट्ये सूक्ष्म निरीक्षणांती कलातज्ज्ञांनी निर्धारित केली आहेत. ही निर्धारित केलेली वैशिष्ट्ये ज्या कलावस्तूमध्ये याअगोदर आढळली किंवा आढळतात, त्या कलावस्तूंना मौर्यकालीन वा मौर्य काळाचा प्रभाव असलेल्या कलावस्तू असे वर्गित केले जाते.

मौर्य कला ढोबळमानाने मौर्यपूर्व काळ, विकसित मौर्य काळ आणि उत्तर मौर्य काळ अशा तीन कालखंडांत विभागली आहे. हा कालक्रम कलेच्या स्वरूपासोबतच तत्कालीन इतर पुराव्यांवर बेतलेला आहे. विशेषत: अभिलेख आणि साहित्यिक उल्लेख. तसेच या काळातील दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे या काळातील काही कलाप्रकार प्रत्यक्ष राजकीय पाठबळाने विकसित झाले. भारतीय कला-इतिहासात प्रत्यक्ष राजकीय सहभागाचा पुरावा मौर्य काळापासूनच पाहायला मिळतो. त्यामुळे राजकीय पाठबळाच्या माध्यमातून निर्मित झालेल्या कलावस्तू आणि इतर कलाप्रकार असे मौर्यकालीन कलेचे ढोबळ वर्गीकरण करता येते.

धौली येथील हस्तिशिल्प (ओडिशा).

या काळातील कलेचे मुख्यत: स्थापत्य, मृण्मय आणि  शिल्पकला असे प्रकार आढळतात. मौर्यकालीन कलावस्तू सापडलेल्या महत्त्वाच्या स्थळांमध्ये बुलंदी बाग, कुम्रहार, पाटना, राजगृह, वैशाली, कौशांबी, श्रावस्ती, सारनाथ, सांची, बोधगया, धौली, जौगढ, शिशुपालगढ, विदिशा इ. स्थानांचा उल्लेख करता येईल. यांव्यतिरिक्त बाराबर व नागार्जुनी ही दोन स्थळे. लेणीस्थापत्य, लौरीया अरराज, लौरीया नंदनगढ, सारनाथ, सांची, गोटीहवा, प्रयागराज (अलाहाबाद), वैशाली, रामपूर्वा, संकीसा, लुंबिनी, दिल्ली इ. ठिकाणी मौर्यकालीन स्तंभ (अशोकस्तंभ) आजही पाहायला मिळतात. यांतील काही स्तंभांवर मौर्य सम्राट अशोकाचे लेख आहेत, ज्यांना ‘स्तंभ लेखʼ म्हणून ओळखले जाते. सोबतच या स्तंभांच्या शीर्षस्थानी विविध प्राण्यांचे शिल्पांकन आढळते. अशाच प्रकारच्या शिल्पांकनातील सारनाथ येथे उत्खननात मिळालेले चार सिंहांचे शिल्प आणि त्यावरील चक्र भारतीय राज्यघटनेने भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून स्वीकारले आहे.

मौर्य काळामध्ये स्तंभ आणि त्यावरील शीर्ष प्राणिशिल्पांसाठी चूनार (उत्तरप्रदेश) येथील खाणींमधून विशिष्ट रंगछटेचा वालुकाश्म दगड मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. स्तंभ आणि त्यांवरील प्राणिशिल्पांकन एकाच ठिकाणी तयार करून हे शिल्पखंड गंगानदीच्या प्रवाहाच्या साहाय्याने एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जात असे.

वैशाली येथील अशोकस्तंभ (बिहार).

या काळातील शिल्पांवर एक विशिष्ट प्रकारची चकाकी आढळते. ही चकाकी प्रथमदृष्टीत धातुसदृश भासते. अशा प्रकारची चकाकी प्रामुख्याने मौर्य काळातील कलावस्तूंवर मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे दगडाला चकाकी देण्याचे तंत्र त्या काळी मोठ्या प्रमाणात विकसित झाले होते आणि त्यावर त्या काळातील कलाकारांचे प्रभुत्व होते, असे नमूद करता येते. या शिल्पकलेच्या सामान्य दृष्टीने दिसणाऱ्या वैशिष्ट्यांत शिल्पांची प्रमाणबद्धता, विशेषत: प्राण्यांच्या शिल्पांकनात, नजरेस भरते. ही प्रमाणबद्धता त्या त्या प्राण्यांचे वास्तव चित्र उभे करण्यास कारणीभूत आहे. त्यांतून दृष्टीस पडणारे भाव त्या त्या प्राण्यांच्या स्वभाववैशिष्ट्याला धरून असलेले दिसतात. उदा., सिंह, हत्ती, घोडा, बैल या प्राण्यांचे शिल्पांकन करताना शिल्पकाराने त्या प्राण्याच्या मूलभूत स्वभावाला गृहीत धरून आपल्या कलाविष्काराचा प्रारंभबिंदू ठरविला आहे. या प्राण्यांच्या शिल्पांकनात मौर्यकालीन कलेच्या उन्नयनाची स्वतंत्र प्रक्रिया अभ्यासकांनी निदर्शनात आणून दिली आहे. उदा., वैशाली येथील स्तंभशीर्षावरील सिंहप्रतिमा आणि सारनाथ येथील सिंहप्रतिमा यांची तुलना केली असता हा फरक आपल्याला अगदी स्पष्टपणे जाणवतो. हा तुलनात्मक फरक मौर्यकालीन शिल्पकलेच्या स्वतंत्र विकासाची प्रक्रिया नजरेसमोर उभी करतो.

प्राण्यांच्या शिल्पांसोबतच तत्कालीन मानवी शिल्पांकनातसुद्धा हे तत्त्व उतरलेले दिसते. उदा., दीदारगंज येथील चवरी ढाळत असलेली स्त्रीप्रतिमा (दीदारगंज येथील यक्षी), लोहानीपूर येथील खंडित शिल्प (तीर्थंकर), तसेच अन्य ठिकाणी मिळालेले खंडित शिल्पावशेष हे सर्व शिल्पांकन कलात्मक मूल्यांशी प्रामाणिक असलेले दिसते.

मौर्यकाळात बौद्ध स्थापत्यकलेने महत्त्वाचा आयाम घेतलेला आढळतो. विशेषतः ज्या ठिकाणी सम्राट अशोकाने आपले स्तंभ उभारले, त्या ठिकाणी बौद्ध स्तूप आढळतात. यावरून या काळात ‘स्तूपʼ स्थापत्यप्रकाराची प्रमुख लक्षणे आणि त्याची वैशिष्ट्ये विकसित झाली होती, असे उपलब्ध स्तूपांच्या आधारे सांगता येते. यांमध्ये सारनाथ (उत्तरप्रदेश), वैशाली (बिहार), बैराट (राजस्थान), कुशिनारा (बिहार), सांची (मध्य प्रदेश) इत्यादी स्तूपांचा उल्लेख करता येईल. यांतील काही स्तूप उत्खननात मिळाले, तर काही स्तूपांमध्ये मौर्य काळानंतर केलेली दुरुस्ती आणि त्यावर अधिकची भर घातलेली आढळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांची येथील महास्तूप, जो सम्राट अशोकाने निर्माण केला आणि अशोकानंतर शुंग आणि सातवाहन राजवंशांच्या काळात त्याची दुरुस्ती आणि विस्तार केला.

स्थापत्य आणि शिल्पकलेसोबतच या काळातील मृण्मय कलाही उल्लेखनीय होती. मौर्यपूर्व काळात अगदीच प्रारंभिक अवस्थेत असलेली ही कला मौर्य काळाच्या भरभराटीत एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेली दिसते. हा मृण्मय कलेचा विकास दोन अंगांनी पाहावयास मिळतो : एक, तंत्राच्या अंगाने आणि दुसरा, शिल्पांकनाच्या दृष्टीने. या काळातील मृण्मय शिल्पे प्रामुख्याने हाताने तयार केली जात असत. परंतु बुलंदी बाग येथील काही मृण्मय शिल्पांच्या अभ्यासावरून या मृण्मय शिल्पांच्या मुखाचा भाग हा साच्याद्वारा बनविल्याचे निदर्शनास येते. यावरून या कालखंडात साच्याचे आंशिक रूपात प्रयोजन प्रारंभित झाले असावे, असे विधान करता येईल. ही मृण्मय शिल्पे उत्कृष्ट मातीपासून तयार केली असून चांगल्या प्रकारे भाजलेली आढळतात आणि या शिल्पांवर कमीत कमी अलंकरण आढळते. या शिल्पांमध्ये मानव, प्राणी, पक्षी आणि मनोरंजन किंवा गृहसजावटीसाठीच्या कलात्मक वस्तू आढळतात. या मृण्मय कलेत, विशेषतः मानवी अंकनात कमालीची परिपूर्णता आढळते. लहान मुली किंवा लहान मुले यांच्या चेहऱ्यावरील बालसुलभ हास्य, खेळत असताना असलेले भाव, स्वत:च जर स्वत:ला गिरकी घेत असेल तर त्या वेळी असलेली शरीराची ठेवण, लकब, वस्त्रांची ठेवण इ. सर्व  बाबींचे अचूक अंकन या कलेत आढळते.

मौर्य कलेच्या उद्भव आणि विकासाच्या संदर्भात दोन सिद्धांत अभ्यासकांमध्ये प्रचलित आहेत. त्यांतील पहिला गट असे स्पष्ट करतो की, मौर्य कला पर्शियन व ग्रीक कलेच्या प्रभावातून विकास पावली आहे; तर दुसरा गट असे म्हणतो की, मौर्यकला आणि त्या काळातील विविध कलाविष्कार भारतीय परंपरेतूनच विकास पावले आहेत. या परस्परविरोधी दोन्ही मतांचे सिद्धांत या काळातील कलेचे विश्लेषण आणि त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अलीकडे मात्र परस्परप्रभाव, सांस्कृतिक आदानप्रदान आणि त्यातून विकसित झालेली त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये कलानिर्मितीच्या मुळाशी असावीत, असे सिद्धांतन केले जाते. भारतीय शिल्पकलेत भारतीयत्वाचे निदर्शक म्हणू असे जे विशेष आपल्याला आढळते, त्याचे मूळ मौर्य कलेत दिसते.

संदर्भ :

  • Agarwala, V. S. Chakradhwaja : The Wheel Flag of India, Varanasi, Prithivi Prakashan, 1964.
  • Agarwala, V. S. Studies in Indian Art, Varanasi, 1966.
  • Frederick, Asher & Spink, Walter ‘Maurya Figural Sculpture Reconsideredʼ, Ars Orientalis, Vol. 19, pp. 1-25. 1989.
  • Gupta, Swaraj Prakash, The Roots of Indian Art, B. R. Publishing, New Delhi, 1980.
  • Ray, Nihar Ranjan, Maurya and Sunga Art, Culcutta, 1945.

 

                                                                                                                                                                                                                       समीक्षक – श्रीकांत गणवीर

प्रतिक्रिया व्यक्त करा