आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध बौद्ध स्तूप स्थळ. ते कृष्णा नदीच्या तीरापासून जवळपास ६ किमी. अंतरावर गुंटूर जिल्ह्यात आहे. या स्तूपाच्या टेकाडाला स्थानीय भाषेत ‘लांजा डिब्बाʼ असे संबोधले जाते. या स्थळाचा शोध सतराव्या शतकात लागला. सर्वप्रथम सन १८७० मध्ये ब्रॉस्वेलने त्याच्या अहवालामध्ये येथील टेकाडांचा उल्लेख केला. नंतर १८७१ मध्ये सर वॉल्टर इलियट याने या स्तूपामधील विटा रस्त्याच्या बांधकामात, तर स्तूपाचे दगडी अवशेष कृष्णा कालव्याचा बांधकामात वापरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या अनुषंगाने सहायक अभियंता (इंजिनिअर) नॉरिस याने स्तूपाच्या परिसराची पाहणी करून शासनास अहवाल सादर केला.

महास्तूप, भट्टीप्रोलू, आंध्र प्रदेश.

नॉरिसच्या अहवालानुसार १८७४ पर्यंत या स्तूपाचे बरेच अवशेष रस्त्याच्या आणि कालव्याच्या बांधकामामुळे नामशेष झाले होते. नॉरिसच्या अहवालानुसार येथील तत्कालीन स्तूपाची उंची ४.२ मी. इतकी असून प्राचीन स्तूपाची एकंदरीत उंची संभवतः २० मी. इतकी असावी आणि भट्टीप्रोलू परिसरातील विखुरलेल्या अवशेषांनुसार स्तूपाचे क्रियाकलाप (activity area) क्षेत्र साधारणतः १५०० मी. इतके असावे, असे अनुमान केले होते. चार वर्षांनंतर रॉबर्ट सेवेल्लने या स्थळाची पुनःश्च पाहणी केली व त्याचा अहवाल मद्रास सरकारला सादर केला. सेवेल्लच्या १८७८ च्या पाहणीत तो नमूद करतो की, या स्तूपाच्या वरचा ३०-४० फुटापर्यंतचा भाग आणि दगडी वेदिकेचे अवशेष पूर्णपणे नामशेष झाले आहे. सेवेल्लला स्तूपाच्या मध्यभागी एक अस्थी करंडक देखील प्राप्त झाला होता, ज्यात शुभ्र हस्तिदंती चुनखडी दगडाच्या पात्रात अस्थी, स्फटिकाची कुपी, मणी व सुवर्णपत्रे होती; तथापि इंग्लडच्या प्रवासादरम्यान अस्थिकरंडक क्षतिग्रस्त झाल्याने, अस्थिकरंडकासह त्यामधील पूजनीय अवशेष फेकून देण्यात आले.

सन १८८२ मध्ये ॲलेक्झांडर री याने पुन्हा या स्थळाची पाहणी केली. या काळापर्यंत या स्तूपाचे मूळ स्वरूप नष्ट झाले होते आणि स्तूपाच्या पायाचे अवशेष अस्ताव्यस्त विखुरलेले होते. स्तूपाच्या मध्यभागी पूजनीय अस्थिकरंडक प्राप्त होतात, याची कल्पना री याला असल्याने त्याने या स्तूपाचे उत्खनन सुरू केले. उत्खननात री याला नामशेष झालेल्या स्तूपाच्या खाली त्यापेक्षाही प्राचीन स्तूपाचे अवशेष प्राप्त झाले, ज्यामध्ये मध्यभागी विविध स्तरांत तीन अस्थी करंडक आढळले.

स्तूपाच्या मध्यभागी, जमीन पातळीपासून ४.४ मी. खाली प्रथम करंडकाचे अवशेष प्राप्त झाले. गोलाकृती आकाराच्या काळ्या दगडात निर्मित या करंडकात ताम्र अंगुठी व छोटे तुकडे, माणिक, दोन पात्र, सुवर्ण पुष्प व मणी, चांदीचे २४ नाणी इत्यादी अवशेष प्राप्त झाले. करंडकावर आणि षट्कोनी मणक्यावर ब्राह्मी लिपीतील लेख उत्कीर्ण होते. प्रथम करंडकाच्या खालच्या स्तरात जमीन पातळीपासून ५ मी. खाली द्वितीय करंडक प्राप्त झाले. हा करंडक देखील दगडी असून यावर देखील लेख कोरलेला होता. या करंडकात आणखी एक करंडक असून यामध्ये सोन्याचे पुष्प-पाने व मणी, तांबे-चांदीचे माणके, अर्ध-मौल्यवान दगडी मणी इत्यादी अवशेष प्राप्त झाले.

उत्कीर्ण ब्राह्मी लेख, भट्टीप्रोलू स्तूप, आंध्र प्रदेश.

भट्टीप्रोलू स्तूपाच्या सर्वांत खालच्या स्तरातून प्राप्त करंडक संपूर्ण दक्षिण भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सदर (तृतीय) करंडक स्तूपाच्या जमीन पातळीपासून साधारणतः ५.५ मी. खालच्या स्तरातून प्राप्त झाला. स्फटिक दगडाच्या या करंडकावर आठ ओळीचा प्राचीन लिपीतील लेख उत्कीर्ण असून याच्या आत एक अस्थिकरंडक होते. या पात्राच्या आत भगवान बुद्धांचे शरीरधातू (अस्थी-अवशेष), त्रिरत्न,  सुवर्णपत्रे, अर्ध-मौल्यवान दगडी मणी, बौद्ध धार्मिक प्रतीकचिन्हे इत्यादी महत्त्वपूर्ण अवशेष प्राप्त झाले.

भट्टीप्रोलू स्तूपामध्ये प्राप्त तृतीय करंडकावरील उत्कीर्ण लिपीचे वाचन केले असता, करंडकातील अस्थी अवशेष तथागत गौतम बुद्धांच्या आहेत, असे निष्पन्न झाले. या लेखाची लिपी प्राचीन तमिळ-ब्राह्मी प्रकारातील आहे. येथील लिपी आंध्र प्रदेशातून प्राप्त लिपीचा आजवरचा सर्वांत प्राचीन पुरावा असून संपूर्ण दक्षिण भारतामधील प्राचीन लिपींपैकी एक आहे. त्याचप्रमाणे येथील करंडकावरील लिपी दक्षिण भारतातील स्वतंत्र द्रविडी लेखन परंपरेच्या प्राचीन प्रमाणापैकी एक असून विद्वानांनी याचा काळ साधारणतः इ.स.पू. तिसरे शतक इतका निर्धारित केला आहे. सदर लिपी आणि तथागतांच्या अस्थी-अवशेषांवरून मौर्य सम्राट अशोकाच्या-पूर्व दक्षिण भारतातील भट्टीप्रोलू येथे बौद्ध धर्माचे आगमन झाले होते, हा महत्त्वपूर्ण पुरावा हाती आला आहे.

उत्खननांती येथील स्तूपाचा व्यास अमरावतीच्या महास्तूपापेक्षा अधिक असल्याने हा स्तूप एक ‘महास्तूपʼ होता हे स्पष्ट होते. उत्खननामध्ये स्तूपाच्या सभोवताल प्रदक्षिणापथ, दगडी वेदिकेच्या पायाचे अवशेष, अलंकृत स्तंभ, स्तूपाच्या छत्रयष्टीचे अवशेष इत्यादी प्राप्त झाले. येथील अलंकृत दगडी शिल्पांचे अंकन अमरावती शैली प्रकारातील असून, प्राचीन काळात भट्टीप्रोलू महास्तूप शिल्प पट्टांनी अलंकृत असावा, असे निदर्शनास येते. येथील महास्तूपातून प्राप्त चार करंडक वैशिष्ट्यपूर्ण असून यामुळे हा महास्तूप संपूर्ण भारतात अद्वितीय ठरतो. त्याचप्रमाणे विविध स्तरांतून प्राप्त करंडक स्तूपाचा विविध काळातील विकास आणि संभवत: पुनर्निर्माणाचे टप्पे  दर्शवितो. एकंदरीत भट्टीप्रोलू हा महास्तूप दक्षिण भारतातील सर्वांत प्राचीन स्तूप असून, हा संपूर्ण परिसर बौद्धधर्मीय वास्तू अवशेषाने परिपूर्ण होता. या उत्खननामुळे मौर्य-पूर्व काळापासून आंध्र प्रदेश आणि पूर्व-समुद्रकिनाऱ्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता, हे स्पष्ट होते. सद्यस्थितीत भट्टीप्रोलू येथील अस्थी-करंडक एग्मोर संग्रहालय, चेन्नई, तमिळनाडू या संग्रहालयात आहेत.

संदर्भ :

  • Rea, Alexander, South Indian Buddhist Antiquities: Stupas of Bhattiprolu, Gudivada, and Ghantashala and ancient Remains, Archaeological Survey of India, New Imperial Series, Volume XV, New Delhi, 1894.
  • Fleet, J. F., ‘The Bhattiprolu Inscription No.1.Aʼ, The Journal of Royal Asiatic Society of Great Britain and Ireland, Cambridge University Press, 1908.

                                                                                                                                                                                 समीक्षक : मंजिरी भालेराव