उत्सृष्टिकांक : एक रूपकप्रकार. त्यास ‘अंक’ असेही म्हटले आहे. उत्सृष्टिकांक ह्या शब्दाची व्युत्पत्ती पुढील प्रकारे सांगितली गेली आहे – सृष्टि म्हणजे प्राण, आणि ते प्राण ज्यांच्यातून उत्क्रमण करण्याच्या म्हणजे बाहेर पडण्याच्या बेतात आहेत, त्या उत्सृष्टिका. म्हणजेच शोक करणाऱ्या स्त्रिया. त्यांचे चित्रण असलेला तो उत्सृष्टिकांक. दुसरी व्युत्पत्ती अशी सांगतात की, जिथे सृष्टीच्या विरुद्ध सृष्टी निर्माण केली जाते तो उत्सृष्टिकांक.
यात करुणरसाला प्राधान्य असते, त्यामुळे स्त्रियांचे विलाप, निर्वेदयुक्त वचने इ. गोष्टी यात प्रामुख्याने असतात. उत्सृष्टिकांकात साधारणपणे प्रसिद्ध कथानक असते. क्वचित प्रसिद्ध नसलेले कथानकही आढळते. प्रसिद्ध कथानक असले तरी, कवीने त्यात आपल्या मनाप्रमाणे फेरफार करावेत, असे धनंजयाने दशरूपकात म्हटले आहे.कथेचा नायक हा कोणी सामान्य पुरुष असतो.विविध प्रकारच्या व्याकुळ हावभावांनी युक्त असतो. व्याकुळ हावभाव म्हणजे जमिनीवर पडणे, लोळणे इत्यादी. यात सात्त्वती, आरभटी व कैशिकी ह्या वृत्ती नसाव्यात. यात मुख आणि निर्वहण हे दोन संधी असतात. यात पात्रांमधील वाग्युद्ध व त्यांचा जय-पराजय दाखवावा.
संस्कृत वाङ्मयात एक अंकी रूपके अनेक आहेत; पण भरताने निर्देशिलेली वैशिष्ट्ये त्यांत क्वचितच आढळतात. त्यामुळे उत्सृष्टिकांकाचे नेमके उदाहरण देणे कठीण आहे.
संदर्भ :
- धनंजय, दशरूपक ,चौखम्भा विद्याभवन, वाराणसी.