शेवटचा रूपकप्रकार. सर्व रसांच्या लक्षणांनी समृद्ध,तसेच तेरा अंगांनी युक्त आणि एक अंक असलेली तसेच एका पात्राने किंवा दोन पात्रांनी अभिनीत करावयाची,अशा प्रकारची वीथीची रचना असते. वीथी सर्व रसांच्या लक्षणांनी युक्त असते. यात एकच अंक आणि एक अथवा दोनच पात्रे असतात. एकच पात्र असेल तेव्हा आकाशभाषिताद्वारे संवाद म्हटले जातात. वीथीत उत्तम, मध्यम आणि अधम अशा तीनही प्रकृती असतात असे भरताने म्हटले आहे. त्याचे अभिनवगुप्ताने असे स्पष्टीकरण केले आहे की, वीथीचा नायक उत्तम, मध्यम किंवा कनिष्ठ ह्या तिन्हींपैकी कोणत्याही प्रकृतीचा असू शकतो. पण वीथीचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे वीथीत आवश्यक मानली गेलेली तेरा अंगे. या तेराही अंगांच्या व्याख्या भरताने नाट्यशास्त्रात दिल्या आहेत व अभिनवगुप्ताने त्यांची उदाहरणे दिली आहेत.ही उदाहरणे रत्नावली, वेणीसंहार इत्यादी इतर रूपकप्रकारांमधून घेतलेली आहेत.उद्घात्यक,अवलगित, अवस्पन्दित,नाली किंवा नालिका,असत्प्रलाप,वाक्केली, प्रपञ्च, मृदव, अधिबल, छल, त्रिगत, व्याहार आणि गण्ड ही वीथीची तेरा अंगे आहेत.
ज्यात मनुष्य अर्थ स्पष्ट नसलेल्या शब्दांचा संबंध आदराने दुसऱ्या शब्दांशी जोडतात त्याला उद्घात्यक असे म्हणतात. ह्यात प्रश्न विचारणाराच उत्तरातील वैचित्र्य लक्षात घेऊन प्रश्न विचारतो आणि उत्तर देणाऱ्याला उचित असे शब्द बोलतो. त्याचे ते उत्तर म्हणजे उद्घात्यक होय.ज्यात एका कार्यात समावेश करून दुसरे कार्य साध्य केले जाते ते अवलगित होय.कोणता तरी शुभसूचक किंवा अशुभसूचक अर्थ निर्दिष्ट झाला असता खुबीने त्याचा दुसरा अर्थ सांगितला जातो तेव्हा ते अवस्पन्दित होते.हास्य उत्पन्न करणारा अर्थ असलेली जी उक्ती तिला नालिका म्हणतात.जिच्यात दोन प्रश्नांचे एकच उत्तर असते ती वाक्केली.ज्यामध्ये विद्वान मनुष्य मूर्ख लोकांच्या समोर हितकर असे वचन बोलतो आणि त्याच्या त्या वचनाचा अर्थ समजत नाही तेव्हा तो असत्प्रलाप होय.
ज्यात खरी नसलेली,स्तुतिपूर्ण आणि दोघांपैकी एकाचे मनोरथ पूर्ण करणारी वचने परस्परांत उच्चारली जातात तो हास्य उत्पन्न करणारा प्रपंच होय. ज्याच्यामध्ये विवादाच्या प्रसंगाने गुणांना दोषांचे किंवा दोषांना गुणांचे स्वरूप दिले जाते तो मृदव होय.ज्यात दोन पात्रांमधील संवाद परस्परांच्या अर्थामध्ये उत्तरोत्तर विशेषता निर्माण करतात ते अधिबल होय.दुसऱ्याच अर्थाने वापरलेले वाक्य संबंधानुसार हास्यकर किंवा रोषकर होते तो छल.प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींविषयीचा थोडासा हास्यकारक अर्थ तो व्याहार.ज्यामध्ये शब्दसादृश्यामुळे एका वचनात पुष्कळ अर्थ युक्तिपूर्वक ग्रथित केले जातात – मग ते हास्यकर असोत अथवा नसोत – ते त्रिगत होय.गडबड व गोंधळ यांनी युक्त, विवाद असलेले तसेच निंदेने युक्त,पुष्कळ वचनांचा आक्षेप करणारे जे वचन त्याला गंड असे म्हणतात.वीथ्यंगांचा इतर रूपकप्रकारांतही विशेषतः प्रहसनात उपयोग करावा असे भरताने नाट्यशास्त्रात सांगितले आहे.
दशरूपकात धनंजयाने असे म्हटले आहे की,वीथीची रचना कैशिकी वृत्तीत केली जाते.मुख आणि निर्वहण हे दोन संधी असतात.मुख्य रस शृंगार असून इतर रसांनाही स्पर्श केलेला असतो.वीथीच्या ह्या तेरा अंगांची उदाहरणे रत्नावली,वेणीसंहार इत्यादी रूपकप्रकारांमधून घेतलेली आहेत.वास्तविक ती कोणत्यातरी वीथीमधूनच उद्धृत करणे योग्य ठरले असते. त्यामुळे वीथीची उदाहरणे अभिनवगुप्ताला उपलब्ध नव्हती असे वाटते. सध्याही वीथीचे उदाहरण उपलब्ध नाही.
संदर्भ :
- कंगले र.पं.(भाषांतरकार),दशरूप-विधान,महा.राज्य साहित्य संस्कृती मंडळ.मुंबई ,१९७४.
- https://sreenivasaraos.com/tag/dasarupaka/
समीक्षक – अंजली पर्वते