भगवान बुद्धांनी वेळोवेळी प्रसंगानुरूप उद्गारलेल्या प्रीतिवाचक व उत्स्फूर्त वचनांचा संग्रह. त्रिपिटकातील (बौद्धांचे पवित्र पाली ग्रंथ) सुत्तपिटकामध्ये खुद्दकनिकाय या संग्रहाचा समावेश आहे. त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या पंधरा ग्रंथांपैकी उदान हा एक ग्रंथ होय. उदान या शब्दाचा अर्थ बाहेर अथवा वर जाणारा वायू.

उदान  हा वचनसंग्रह पुढील आठ वग्गांमध्ये (संस्कृत – वर्ग) विभागला आहे.

१) बोधिवग्ग, २) मुचलिन्दवग्ग, ३) नन्दवग्ग, ४) मेघियवग्ग, ५) सोणत्थेरस्सवग्ग, ६) जच्चन्धवग्ग, ७) चूलवग्ग, ८) पाटलिगामियवग्ग. या प्रत्येक वग्गामध्ये दहा सूत्ते (सूत्रे) आहेत. सातव्या चूलवग्गामध्ये मात्र ९ सूत्ते आहेत.

उदानातील या आठ वग्गांमध्ये भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या काही सूत्तांचा आशय असा :

(१) बोधिवग्ग – भगवान बुद्धांचे सम्बोधि प्राप्तीनंतरच्या काही सप्ताहांतील जीवनवर्णन. तसेच त्यांचे अनुलोम व प्रतिलोम प्रतीत्यसमुत्पाद-चिंतन. ब्राह्मण कोणाला म्हणावे यासंदर्भात उपदेशवचन.

(२) मुचलिन्दवग्ग – मुचलिन्द नावाच्या सर्पाची कथा; कोलिय कन्या सुप्रवासा हीची प्रसव कथा. तिला बुद्धांकडून मिळालेले आशीर्वाद. तसेच आर्य संगाम कथा व निवृत्तिपरायण उपदेश वचने.

(३) नन्दवग्ग – भगवान बुद्ध यांचे मावस भाऊ नन्द याची कथा. बुद्धांच्या उपदेश प्राप्तीनंतर विलासी असलेल्या नन्दास वैराग्य कसे प्राप्त झाले याचे वर्णन असून अनासक्ती हाच मुक्तिमार्ग होय, असे बौद्धवचन सांगितले आहे.

(४) मेघियवग्ग – मेघिय नावाच्या भिक्षूची  योगसाधनेसंदर्भातील कथा असून भगवान बुद्धांनी त्यास ध्यानसाधनेसंदर्भात उपदेश केला आहे. भिक्षूंविषयक अन्य कथा व उपदेश वचनेही आढळतात.

(५) सोणत्थेरस्सवग्ग – शोण नावाच्या भिक्षूचा संघप्रवेश; कोसलराज प्रसेनजित यांचे बुद्ध दर्शनासाठी जेतवन-आराम येथे जाणे ;इत्यादी वर्णन .

(६) जच्चन्धवग्ग – जन्माने अंध असलेल्या पुरुषांना हत्ती दाखविण्याची कथा. ही कथा बौद्ध साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध पावली. अंधगज-न्याय  या नावाने संस्कृतमध्येही ती विख्यात आहे. सर्व-धर्म-समन्वय साधण्याच्या दृष्टीने या कथेतील दृष्टांत अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

(७) चूलवग्ग – लकुंटक भद्दिय नावाच्या भिक्षूस सारिपुत्त यांचा उपदेश व त्यास समाधिप्राप्ती (७/५). कौशाम्बी राजा उदयन याच्या अंतःपुरातील अग्निकांड कथा (७/९).

(८) पाटलिगामियवग्ग – निर्वाणविषयक प्रवचने.

भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणुकीचा सारांश उदानातील वग्गामधून आढळतो. शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन मुलभूत बौद्ध शिकवणुकीशी संबंधित उदाने प्रामुख्याने त्यात आहेत. दुःख, क्लेश ह्यांची कारणे; कुकर्माचे दुष्परिणाम, संसारचक्रातून मुक्ती, इंद्रिसंयम व मनाची एकाग्रता, समाधि प्राप्ती अशा गोष्टींचा ऊहापोह या उदानांमध्ये आहे. तात्त्विक उपदेशांखेरीज उदानांच्या गद्यभागातील संदर्भगोष्टींमधून बौद्धकालीन समाजव्यवस्था, राजकीय व्यक्तिविशेष, भौगोलिक परिस्थिती तसेच बौद्ध संघातील भिक्षू, त्यांचा आपसांतील आणि संसारी उपासकांशी असलेला संबंध, संघातील घडामोडी इत्यादी बाबींवरही प्रकाश पडला आहे.

उदानातील काही सूत्ते ही ऐतिहासिक संदर्भात उच्चारली गेली असावीत; तर काही सूत्ते मात्र एखाद्या उदानाला संदर्भगोष्ट पुरविण्यासाठी रचली असावीत. या संग्रहात आलेली काही उदाने त्रिपिटकामध्ये अंतर्भूत असलेल्या अन्य ग्रंथांमध्ये संदर्भगोष्टींसह किंवा त्यांशिवाय सापडतात.

भगवान बुद्धांच्या वचनांचे नऊ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यांपैकी उदान हा एक प्रकार होय.

संदर्भ :

  • उपाध्याय, भरतसिंह, पालि साहित्य का इतिहास, प्रयाग, १९६३.

प्रतिक्रिया व्यक्त करा