कंसवहो : (कंसवध). राम पाणिवादरचित प्राकृत खंडकाव्य. त्याच्या नावावरूनच ते कृष्णचरित्रातील कंसवध या घटनेवर आधारित असल्याचे लक्षात येते. रामपाणिवाद यांच्यामध्ये शैव आणि वैष्णव या पंथाचा मिलाफ दिसतो. कारण रामपाणिवाद यांचे वडील शंकराच्या देवळात पुजारी होते, तर त्यांचे गुरू वैष्णव संप्रदायी होते. रामपाणिवाद हे  संस्कृतज्ञ  होते; तथापि त्यांनी प्राकृत भाषेमधूनही काही रचना केल्या.

कंसवहो या काव्यातील घटनाक्रम महाभारताप्रमाणेच आहे, पण महाभारताइतके सविस्तर वर्णन या काव्यात राम-पाणिवाद यांनी केलेले नाही.घटनावर्णनांमध्ये काही ठिकाणी महाभारताशी साम्य,तर काही ठिकाणी भेद दिसून येतो; पण भागवताशी मोठ्या प्रमाणात साम्य आढळते. या काव्यात एकूण चार सर्ग असून पहिल्या तीन सर्गांमध्ये कंसवधाचे वर्णन आहे आणि चौथ्या सर्गामध्ये कृष्णाच्या बाललीला वर्णिल्या आहेत. या बाललीला अक्रूर वसुदेव-देवकीला सांगतो.

कंसवहो या काव्यामध्ये – सुरुवातीला अक्रुराने गोकुळात धनुर्यज्ञाचे निमंत्रण घेऊन येणे, बलराम-कृष्णांनी अक्रूरासह गोकुळातून मथुरेत जाणे, वाटेतील रजकाचा (धोब्याचा) कृष्णाने वध करणे, कुब्जेला सुंदर करणे, कृष्णाने धनुर्यज्ञाच्या धनुष्याचे तुकडे करणे, धनुर्यज्ञाच्या जागी कुवलयापीड हत्तीचा वध करणे, अनेक मल्लांचा पराभव करून वध करणे आणि नंतर कंसवध करणे, कृष्णाने कारागृहातून माता-पित्यांना मुक्त करणे ह्या घटना आहेत; पण यांचे वर्णन मात्र कवीने संक्षिप्त स्वरूपात केलेले दिसते. घटना जरी त्याच असल्या तरी काही ठिकाणी वर्णनामध्ये फरक आढळतो. कवीने स्वकल्पनेने काही घटनाप्रसंग चितारले आहेत.

अक्रूर कृष्णादी सर्वांना भेटून नंदाच्या सभेत जातो आणि कृष्णाची स्तुती करतो. पण त्यानंतर बलरामाच्या मनात गोकुळात जाण्याविषयी द्वंद्व निर्माण होते. बलरामाच्या मनातील द्वंद्व ही रामपाणिवाद यांनी नवीन कल्पना मांडली आहे. नंतर कृष्ण-बलराम मथुरेतील रस्त्यांवरून फिरत असताना त्या दोघांना एक धोबी भेटतो. तो कृष्णाला उडवा-उडवीची उत्तरे देतो. म्हणून कृष्ण त्या धोब्याच्या हातातून वस्त्रे हिसकावून घेतो. त्यामुळे धोबी चिडतो व कृष्णाशी वाद घालायला लागतो. त्या वादात कृष्ण त्या धोब्याचा वध करतो.

यानंतर कृष्णाला वाटेत एक कुब्जा स्त्री भेटते. कृष्णाने तिला बरे केल्यावर मदनाने व्यथित झालेली ती स्त्री कृष्णाला थांबण्याची विनंती करते. त्यावर कृष्ण तिला परत भेटण्याचे आश्वासन देतो. त्यानंतर कंसाच्या आयुधागारातील धनुष्य कृष्ण रागाने तोडतो. अशाप्रकारे नवनवीन कल्पना मांडून कवीने आपल्या प्रतिभेचे दर्शन वाचकांना घडविले आहे. कृष्णाने ठार केलेल्या प्रसिद्ध अशा चाणूर-मुष्टिक या मल्लांची नावे मात्र कंसवहोमध्ये दिसत नाहीत. अनेक मल्लांना ठार केल्यानंतर कृष्ण कंसाला मारतो असे वर्णन आढळते. या ग्रंथात कवीने कृष्णाच्या आठ भावांचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख श्वेतांबर जैन अर्धमागधी आगमांमध्येही आढळतो.

हिंदू धर्मासोबतच जैन धर्माचाही पगडा रामपाणिवाद यांच्यावर दिसतो. कंसवध ही घटना महाभारतातील असली, तरी भागवतातील व जैन आगमग्रंथांमधील घटनाही कंसवहोमध्ये दिसून येतात.मथुरेचे वर्णन; धनुष्यभंगाच्या आवाजाने, अशुभाच्या कल्पनेने कंसाचा डावा डोळा लवणे अशा घटना कवीने स्वकल्पनेने अधिक रंगतदार केल्या आहेत.  कुब्जेचा प्रसंग, धोब्याचा प्रसंग असे काही प्रसंग चित्रण कवीच्या उत्कृष्ट प्रतिभेचे दर्शन घडवितात.

कंसवहो हे काव्य शौरसेनी आणि माहाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे. हे खंडकाव्य असल्यामुळे दोन सर्ग न जोडणारे वाक्य किंवा प्रसंग यांचे वर्णन कवी करीत नाही. एका घटनेने एका सर्गाचा शेवट होतो; पण नवीन सर्गात आधीच्या सर्गातील कथावस्तू अथवा पार्श्वभूमी कोणत्याही वाक्याद्वारे कवीने दिली नाही. कृष्णाची स्तुती करणे हेच उद्दिष्ट असल्यामुळे अशा गोष्टींकडे कवीने लक्ष दिले नसावे. या काव्यात कवीने अनेक वृत्तांचा वापर केला आहे. शार्दूलविक्रीडित,उपजाति, उपेंद्रवज्रा, वसंततिलका, वंशस्थ या प्रसिद्ध वृत्तांसोबतच शालिनी, स्वागता, रथोद्धता, प्रहर्षिणि त्यांमध्ये या वृत्तांचाही समावेश आहे. तसेच वर्णन करताना उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांत, रूपक असे विविध अलंकार योजलेले आहेत.

कंसवहोमध्ये रामपाणिवाद यांचा प्रचंड शब्दसंग्रह आढळतो. त्यांची भाषा अत्यंत साधी, सोपी असून संवाद, वर्णने या स्वरूपात त्यांनी विषयमांडणी केली आहे. काही ठिकाणी मोठे समास केले असून, त्यातून त्यांचे भाषाप्रभुत्व लक्षात येते. रामपाणिवाद यांची काव्यशैली फार सुंदर नसली तरी ती सामर्थ्यवान आहे.

कंसवहोतील कथानकाची उत्तम मांडणी, विषय हाताळण्याची सचोटी, भाषाप्रभुत्व तसेच उत्तम सादरीकरण यांमुळे रामपाणिवाद यांना आपल्या आधीच्या प्रवरसेन, वाक्पतिराज, राजशेखर इत्यादी श्रेष्ठ कवींच्या पंक्तीत आदरणीय स्थान प्राप्त झाले आहे.

संदर्भ :

  • उपाध्ये ए. एन., संपा., कंसवहो, हिंदी ग्रंथ रत्नाकर कार्यालय, मुंबई.

समीक्षक – कमलकुमार जैन

Close Menu
Skip to content