खंडान्त उताराच्या मर्यादेपलीकडचा जास्त खोली असलेला महासागरातील हा जैव भौगोलिक प्रदेश असून महासागराचा हा सर्वांत खोल भाग आहे. याची खोली सु. २,००० ते सु. ६,००० मी. असते. खंदकाच्या बाबतीत प्रकाश न पोचू शकणारा हा भाग आहे. या क्षेत्रविभागाची व्याख्या तेथील अतिशय एकसारख्या पर्यावरणीय परिस्थितीनुसार करतात. या परिस्थितींचे प्रतिबिंब त्या अधिवासात राहणाऱ्या वेगळ्या जीवांच्या प्रकारांत उमटलेले दिसते. हा क्षेत्रविभाग व त्याच्या वरचा गभीर क्षेत्रविभाग यांच्या वरच्या मर्यादेची (खोलीची) सोयीस्कर व्याख्या पुढीलप्रमाणे देतात. ज्या खोलीवर पाण्याचे तापमान ४° से. आहे, ती खोली ही मर्यादा दर्शविते. ही खोली १,००० ते ३,००० मी. दरम्यान असते. परिस्थिति वैज्ञानिकांनी ६,००० मी.पेक्षा खोल पाण्याला खंदकीय प्रदेश असे स्वतंत्र नाव दिले आहे.

अगाधीय प्रदेश हा पृथ्वीवरील जीवनाशी निगडित असलेला सर्वांत मोठा पर्यावरणीय विभाग आहे. त्याने ३० कोटी चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ६०% आणि महासागर व समुद्र यांच्या एकत्रित क्षेत्रफळाच्या ८३% इतके आहे.

अगाधीय पाणी ध्रुवीय प्रदेशांत मुख्यत: अंटार्क्टिक ध्रुवीय प्रदेशात हवा-समुद्र या आंतरपृष्ठालगत निर्माण होते. तेथील थंड जलवायुमानामुळे समुद्री बर्फ व अवशिष्ट खारे पाणी (मिठवणी) तयार होतात. उच्च घनतेमुळे खारे पाणी खाली जाते व समुद्रतळावरून सावकाशपणे विषुववृत्ताकडे वाहत जाते. अगाधीय प्रदेशातील लवणतेची कक्षा बरीच कमी म्हणजे दर हजार भागांमध्ये ३४.६ ते ३५ भाग एवढी असते आणि तापमान बहुधा ०° ते ४° से. दरम्यान असते. दर दहा मीटर खोलीमागे दाब १ वातावरणीय दाबाएवढा वाढतो. अशा प्रकारे अगाधीय दाब २०० ते ६०० वातावरणीय दाबांदरम्यान असतो; तथापि या दाबामुळे अगाधीय जीवांसमोर काही थोड्या अडचणी उद्भवतात; कारण त्यांच्या शरीरामधील दाब त्यांच्या शरीराबाहेरच्या दाबाएवढाच असतो.

अगाधीय पाण्यातील नायट्रोजन फॉस्फरस व सिलिका यांच्या पोषक लवणांचे प्रमाण (संहती) एकसारखे असते आणि हे प्रमाण त्याच्या वरील भागात असलेल्या प्रमाणापेक्षा पुष्कळच अधिक असते; कारण अगाधीय व खंदकीय प्रदेशांतील पाणी हे या लवणाचा साठा (साठवण) आहे. विघटित जैव द्रव्यांपासून तयार होणारी ही लवणे वरच्या क्षेत्रविभागांतून खाली येतात व निवळून या साठ्यात स्थिरावतात. तसेच सूर्यप्रकाश नसल्याने ती प्रकाशसंश्लेषणात सहभागी होऊ शकत नाहीत.

ध्रुवीय प्रदेशात अगाधीय पाण्यात विरघळणारा ऑक्सिजन आणि प्रकाशसंश्लेषणाचा अभाव या दोन गोष्टींवर अगाधीय पाण्यातील ऑक्सिजनाचे प्रमाण पूर्णपणे अवलंबून असते. प्रकाशसंश्लेषणाच्या अभावामुळे खोल भागातील पाण्यात ऑक्सिजन समाविष्ट होण्यास प्रतिबंध होतो. अगाधीय पाण्यात दर एक लिटरमध्ये अनेक घ. सेंमी. ऑक्सिजन वायू विरघळलेला असतो. जीवांची संख्या तेथे अत्यल्प असल्याने पाण्यात समाविष्ट होणाऱ्या ऑक्सिजनापेक्षा कमी गतीने तो वापरला जातो; तथापि अगाधीय जीवन समुद्रतळाशी एकवटलेले असतात आणि समुद्रतळालगतच्या पाण्यात ऑक्सिजनाचे प्रमाण हमखास कमी झालेले आढळते.

अगाधीय प्रदेश वादळांपासून फार दूर असल्याने अतिशय शांत असते. हवा-समुद्र यांच्या आंतरपृष्ठालगत वादळामुळे महासागर खळबळवला जातो. या कमी ऊर्जेच्या आविष्काराचे पडसाद अगाधीय अवसादाच्या गुणवैशिष्ट्यांवर पडलेले दिसतात. म्हणजे या गुणवैशिष्ट्यांतील कमी ऊर्जेचा प्रत्यय त्याच्यातून येतो. अगाधीय प्रदेश बहुधा जमिनीपासून पुरेसा दूर असतो. त्यामुळे तेथील गाळ मुख्यत: त्याच्या वर असलेल्या पाण्यातील अन्नसाखळीत निर्माण झालेले प्लवकांचे सूक्ष्म अवशेष असतात व ते तेथून खाली आलेले असतात. अगाधीय गाळ विषुववृत्तीय ते समशीतोष्ण प्रदेशांतील ४,००० मी.पेक्षा कमी खोलीतील फोरॅमिनीफेरा प्राणिप्लवक व कोकोलिथोफोरांसारखे वनस्पतिप्लवक यांची कॅल्शियमयुक्त कवचे असतात. ४,००० मी.पेक्षा अधिक खोलीवर कॅल्शियम कार्बोनेट विरघळू लागते व अवसादाचे मुख्य घटक उदी रंगाची मृत्तिका व रेडिओलॅरियन प्राणिप्लवक आणि डायटमासारखे वनस्पतिप्लवक यांचे सिलिकामय अवशेष असतात.

अगाधीय प्राणिजात अगदी अल्प असून त्यांच्या प्राणिजातीही अगदी थोड्याच असतात. त्यामंध्ये सर्व प्रमुख सागरी अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसणाऱ्या संघांचे प्रतिनिधी व अनेक प्रकारचे मासे असतात. तेथे हंगामी किंवा दैनिक बदल होत नाहीत. उच्च दाब, काळोख, शांत पाणी व मऊ अवसादी तळ या पर्यावरणाशी या जीवांनी जुळवून घेतलेले असते. करडा वा काळा रंग, नाजूक व प्रवाहरेखित नसलेली शरीररचना यांकडे त्यांची प्रवृत्ती असलेली दिसते. यांपैकी चलनशील प्राण्यांचे पाय लांब असून तळाला चिकटून राहणाऱ्या प्राण्यांना वृंत (देठ) असतात. त्यामुळे अगदी तळालगतच्या पाण्याच्या थराच्या वर ते येतात. तेथे ऑक्सिजन अगदी कमी असतो. अगाधीय कवचधारी (Crustacean) प्राणी व मासे अंध असू शकतात. वाढत्या खोलीनुसार मांसाहारी व अपमार्जक (गदळ, नकोसे, मागे राहिलेले) द्रव्यावर उपजीविका करणाऱ्या जिवांची संख्या चिखल व तरंगणाऱ्या द्रव्यांवर जगणाऱ्या जिवांपेक्षा कमी असते. अगाधीय प्राण्यांचे प्रजोत्पादन अतिमंदपणे होते, असे मानतात.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा